Divorce  Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

अर्ध्यावर डाव का मोडतो?- एक विचारमंथन

Divorce Rates in Goa 2026: लग्न कधी करता? असे विचारणारे बरेच जण असतात; पण त्या नात्यातील आपली भूमिका काय, ते नाते कसे टिकवायचे आणि खुलवायचे याबाबत मार्गदर्शन मात्र क्वचितच मिळते.

गोमंतक ऑनलाईन टीम

गोव्यात पाच वर्षांत २,१३५ जोडप्यांनी लग्नबंधनातून कायदेशीररीत्या मुक्तता करून घेतली, हे सरकार दरबारी नोंद झालेली आकडेवारी सांगते. कुठे मोबाइलच्या स्क्रीनआडून झालेली दिशाभूल घात करते, तर कुठे घरातील मंडळींचा पती-पत्नीच्या नात्यातील अतिहस्तक्षेप नात्यांचे बंध विस्कळीत करतो. दोन भिन्न संस्कारांत वाढलेल्या व्यक्ती जेव्हा सहजीवनाची स्वप्ने रंगवतात, तेव्हा त्यांच्या मनावर झालेले संस्कार, विचार आणि नीतिमूल्ये यांचा ताळमेळ बसतो का? हा विचार क्वचितच केला जातो. काही भौतिक गोष्टी आणि इकडची-तिकडची जुजबी माहिती यांवर रोवलेली मुहूर्तमेढच संसाराची डळमळीत सुरुवात ठरते.

पैसा-अडका, नोकरी, रूप, उंची, कूळ-मूळ या सगळ्या अनुरूपतेची शिस्तीत, खोलात जाऊन जुळवाजुळव केली जाते; पण सर्वात महत्त्वाची भावनिक सुसंगती जुळते का? हे जाणून घेण्याची तसदी मात्र कोणी घेत नाही. काही नाती जुळतानाच ती दीर्घकाळ टिकतील का? अशी साशंकता जाणवते; मात्र ठरलेले लग्न मोडले तर लोकांना काय तोंड दाखवायचे, या दबावामुळे अनिच्छेने लग्नबंधनात अडकावे लागते. ही डळमळीत सुरुवात पुढे नाते टिकू देत नाही; आणि लोकलज्जेमुळे ते टिकवले, तरी कटुता कायम राहते.

आमचे-तुमचे हा वाद प्रेमविवाह केलेल्या जोडप्यांतही दिसून येतो. कधी दागिन्यांवरून, कधी चालीरीतींवरून, तर कधी घेण्या-देण्यावरून वाद होतात. ती घरात नवीन असते; सगळेच नवखे असते. तिला कुणीतरी आपल्याला समजून घ्यावे, अशी अपेक्षा असते; तिच्या मनात बरेच काही साचत राहते. तिकडे सासरच्या मंडळींना तिच्या मनाचा ठाव लागत नाही. सगळे एकत्र असताना ती मात्र त्या सगळ्यात आपली जागा शोधत असते. नवरा आपला म्हणावा, तर तोही फार सांभाळून वागतो. ज्याच्याकडून पाठबळाची अपेक्षा असते, तोच अनोळख्यासारखा वागू लागला की तिला एकटे पडल्यासारखे वाटते.

तो दोन्ही बाजू कशा सांभाळाव्यात, या संभ्रमात असतो. बायकोची बाजू घ्यावी, तर ‘बायको आली आणि हा बदलला’ असे म्हणतील, याची भीती; आणि घरच्यांना सांभाळून घ्यावे, तर ती रुसते. हा तिढा दिवसेंदिवस अधिक गुंतत जातो. सुनमुख पाहण्याआधी घर सुरळीत चाललेले असते; प्रत्येकजण आपापली कामे नेमाने करत असतो. ती आल्यावर मात्र तिने सगळी जबाबदारी घ्यावी, अशी अपेक्षा ठेवली जाते-अगदी नोकरी सांभाळूनही. तिची भूमिका कायम स्कॅनरखाली असते. ती काय करते किंवा काय करत नाही, यावरून तिच्यासमोर किंवा मागे कुरबुर सुरू होते.

नवऱ्याकडच्या मंडळींचे वर्चस्व आणि नवरीकडच्या मंडळींनी नमते घेणे ही जणू जनरीतच झाली आहे. मान-सन्मान, हेवेदावे, घेणेदेणे या जात्यात नाते भरडले जाते.

आर्थिक विषमता आणि राहणीमान यांसारख्या महत्त्वाच्या बाबी प्रेमाच्या आणाभाका घेताना दुर्लक्षित केल्या जातात. आम्ही कोंड्यामांड्याचा संसार करू असे लग्नापूर्वी लाडीगोडीने सांगणाऱ्या प्रेमीयुगुलांनाही महिनाअखेरीस खर्च करताना हात आखडता घ्यावा लागतो तेव्हा विफलतेची भावना निर्माण होऊन चिडचिड वाढते.

यात लपवाछपवीची भर पडली, तर परिस्थिती अधिक कठीण होते. व्यसनाधीनता, मानसिक किंवा शारीरिक व्यंग, आजार, लैंगिकता अशा महत्त्वाच्या बाबींविषयीची वस्तुस्थिती नीट सांगितली जात नाही किंवा हेतुपूर्वक लपवली जाते. लग्न झाल्यावर सगळे नीट होईल ही खोटी आशा वास्तव समोर आल्यावर मावळते.

आभासी जगाने विवाहबाह्य संबंधांना घातलेले खतपाणी हे घटस्फोटामागचे एक नवीन कारण ठरत आहे. विरंगुळा किंवा टाइमपास म्हणून सुरू झालेले चॅटिंग हळूहळू मनातील पोकळी भरू लागते, आणि त्यात वाहवत गेलेली व्यक्ती हे विसरते की ती आपल्या नात्याशी प्रतारणा करत आहे.

आपल्या इच्छा, आकांक्षा आणि वासनापूर्तीसाठी संपूर्ण कुटुंबाची फसवणूक केली जाते. त्या आगीत आपली होरपळणारी नाती दिसू नये एवढी आप्पलपोटी विचारसरणी घेऊन ही व्यक्ती वावरते. हव्यासापोटी दोन होड्यांवर ठेवलेला पाय अखेर उभा संसार बुडवतो.

‘स्वयंपाक नीट झाला नाही’, ‘भांडी कोणी घासावीत?’, ‘देण्याघेण्यात राहिलेली कसर’, ‘तू फार बोलतेस’, ‘माझ्या घरच्यांशी नीट वागत नाहीस’ अशी कारणे कौटुंबिक हिंसेपर्यंत पोहोचतात. यात कधी मारहाण, तर कधी मानसिक छळ होऊन परिस्थिती इतकी बिघडते की माणसे एकमेकांच्या जिवावरही उठतात.

तुटणारा संसार फक्त दोन व्यक्तींना घेऊन कोसळत नाही; त्यात पती-पत्नी, त्यांची मुले आणि दोन्ही कुटुंबे यांचीही फरफट होते. माणसाने माणुसकी विसरून केलेले हे परस्परांतील मतभेद अनेक जीवनांना आयुष्यभराच्या यातना देतात. कोणतेही नाते परिपूर्ण नसते. लग्नबंधनासारख्या नात्यात दोन भिन्न स्वभावाच्या व्यक्ती आणि दोन संस्कृतींचा संगम होत असतो. तिथे एकमेकांना समजून घेणे, सामावून घेणे ही जबाबदारी पती-पत्नी आणि संपूर्ण कुटुंबाची असते.

नव्या नात्याकडून अपेक्षा असतात, त्याचबरोबर एकमेकांप्रति आदर, नात्यातील पारदर्शकता आपल्या जबाबदाऱ्यांचे भान हे प्रेमापेक्षाही लाखमोलाचे असते. लग्न कधी करता? असे विचारणारे बरेच जण असतात; पण त्या नात्यातील आपली भूमिका काय, ते नाते कसे टिकवायचे आणि खुलवायचे याबाबत मार्गदर्शन मात्र क्वचितच मिळते. यावर सर्व स्तरांवर विचार होणे कौटुंबिक स्थैर्यासाठी आणि समाजहितासाठी अत्यावश्यक आहे.

सुलक्षा मनेश गावस

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

सांगे येथील विस्मृतीत गेलेल्या दुव्यांचे संशोधन व्हावे

तरणे आणि तरंगणे- संपादकीय

गावठी लाल मिरची यंदा होणार अधिकच 'तिखट', बाजारात खातेय भाव; आवक कमीच, ग्राहकांना प्रतीक्षा 'जांबोटीच्या मिरची'ची

Goa Drug Case: 'PSI'ऐवजी कॉन्स्टेबलने झडती घेतल्याने आरोपीची निर्दोष मुक्तता, तपासातील त्रुटी ड्रग्स प्रकरणातील आरोपीच्या पथ्यावर

गौतम खट्टरच्या अटकेसाठी वास्को - मडगावात निदर्शने, अजामीनपात्र अटक वॉरंट जारी; माधवला 4 दिवसांची पोलिस कोठडी

SCROLL FOR NEXT