Srinivas Kulkarni Death Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Srinivas Kulkarni Death: मराठी साहित्यविश्वातील 'डोह' निमूटपणे विझला; श्रीनिवास कुलकर्णी काळाच्या पडद्याआड

Marathi Essayist Srinivas Kulkarni: श्रीनिवास कुलकर्णी यांचे लेखन महाराष्ट्रापुरतेच न राहता धारवाडपर्यंत कोलकातापर्यंत पोहोचले.

दैनिक गोमन्तक डिजिटल

मुकेश थळी

श्रीनिवास कुलकर्णी यांचे लेखन महाराष्ट्रापुरतेच न राहता धारवाडपर्यंत कोलकातापर्यंत पोहोचले. त्यांच्या साहित्याचा इंग्रजी अनुवाद झाला. ‘डोह’ या पुस्तकातील निबंधांनी परमोच्च कलात्मक शिखर गाठले, अशी पावती पसंती मराठी समीक्षकांनी दिली.

सिध्दहस्त अग्रगण्य ललित निबंधकार श्रीनिवास कुलकर्णी यांच्या निधनाची वार्ता दुपारी आली. त्यांच्या डोह (१९६५) या गाजलेल्या लोकप्रिय पुस्तकाची आम्ही पारायणे करत निबंधकार म्हणून घडलो. या पुस्तकाला मराठी साहित्य विश्वात भरघोस प्रतिसाद मिळाला. त्यांचे निबंध म्हणजे एक वस्तुपाठच.

कुलकर्णी यांच्या चार मुख्य साहित्यकृती आहेत. ‘डोह’ नंतरचं पुस्तक ‘सोन्याचा पिंपळ’. त्यात निसर्गाची विलोभनीय शब्दचित्रे आहेत. ‘पाण्याचे पंख’ या पुस्तकात लहान मुलांच्या भावविश्वाचे विलक्षण चित्रण समाविष्ट आहे. ‘कोरडी भिक्षा’ या पुस्तकात व्यक्तिचित्रणात्मक वर्णने आहेत. त्यांचे लेखन मोजके नेटके. मराठी साहित्यविश्वात त्याला मानदंड मानतात. श्रीनिवास कुलकर्णी यांचे लेखन महाराष्ट्रापुरतेच न राहता धारवाडपर्यंत कोलकातापर्यंत पोहोचले. त्यांच्या साहित्याचा इंग्रजी अनुवाद झाला.

‘डोह’ या पुस्तकातील निबंधांनी परमोच्च कलात्मक शिखर गाठले, अशी पावती पसंती मराठी समीक्षकांनी दिली. ‘मनातल्या उन्हात’ हा या पुस्तकातील निबंध मनात रूतणारा आहे. माझे सोलापूरचे कवी मित्र सुनील शिनखेडे म्हणाले, ‘कवी सुधांशु यांच्या पाठबळाने औदुंबर साहित्य संमेलन ही त्यांचीच प्रेरणा. ते शब्द फार काळजीपूर्वक तपासत. पत्रांतून कवितेवर मार्मिक चर्चा करत.

अशी काही पत्रं माझ्याकडे आहेत.’ श्रीनिवास कुलकर्णी आणि गोव्याचे कवी शंकर रामाणी यांच्यात पत्रमैत्र घनिष्ट होतं. मी बेळगांवला रामाणींकडे गेलो होतो, तेव्हा त्यांनी कुलकर्णींच्या पत्रांचा फोल्डर दाखवला. मी थोडी वाचली व दुसरा फोल्डर दळवींचा मागितला, कारण ती वाचण्याचं जास्त कुतुहल वाटलं. अनुभव संचिताच्या डोहाचा तळ, पारदर्शक मांडणी व कलात्मक उंची यामुळे त्यांच्या निबंधांची आशयघनता वाचकाला गुंग करते.

कवितेचं त्यांना अफाट प्रेम होतं. ते चौथीत असताना त्यांची बालकविता पां. ना. मिसाळ यांच्या ‘बालसन्मित्र’ मध्ये प्रकाशित झाली होती. बालकवींच्या प्रतिभेने कविता न लिहिता जर गद्य निवडले असते तर ते लेखन कुलकर्णींचे झाले असते, असे कवी मंगेश पाडगांवकर यांनी म्हटले होते ते सार्थ. श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांच्या साहित्याचे दर्शन कालदर्शिकेच्या माध्यमातूनही करण्यात आले.

प्रत्येक महिन्याला साजेसा कुलकर्णी यांच्या साहित्यातील सार्थ उतारा हिमांशु स्मार्त यांनी निवडला होता. श्रीनिवास कुलकर्णी यांचा जन्म २० नोव्हेंबर १९३६ ला सांगली जिल्ह्यातल्या औदुंबर गावी झाला. औदुंबरचे निसर्गदर्शन त्यांच्या साहित्यात आलं सातवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण अनाथ विद्यार्थी आश्रम संस्थेत राहून पूर्ण केले. श्रीनिवास यांचे आजोबा व वडील दोघेही चित्रकार होते.

कुलकर्णी यांनी सुरुवातीला साइन बोर्ड पेंटिंगचा व्यवसाय केला. तसेच ओगलेवाडीच्या काच कारखान्यात हिशेब खात्यात नोकरी केली. त्यानंतर ते ‘मौज’ या प्रकाशन विभागात संपादक म्हणून कार्यरत होते. कुलकर्णींचे निबंध वाचताना कविता वाचल्यासारखे वाटतात; शब्दांतून निसर्गाची आणि जीवनाची चित्रमय सृष्टी उभी राहते. लहान वाक्यांतून अर्थसघन आशय व्यक्त करण्याची ताकद.

निसर्गाच्या रूपकळेला नित्यनूतन शब्दकळेतून साकार करण्याची अद्वितीय प्रतिभा त्यांच्याठायी होती. ऋतू, वातावरण, निसर्गातील सूक्ष्म बदल यांचे संवेदनशील चित्रण त्यांनी छान केले आहे. काव्यात्मकता, तरल संवेदनशीलता आणि चित्रमय शैली ही कुलकर्णींच्या निबंधांची ठळक वैशिष्ट्ये.

निसर्गाशी तादात्म्य पावून त्यांनी शब्दांतून जीवनाचे सूक्ष्म अनुभव व्यक्त केले. लहान वाक्यांतून अर्थसघन आशय मांडण्याची ताकद, निसर्गाचे रूपक आणि मानवी भावविश्वाचे सूक्ष्म चित्रण ही त्यांची खासियत आहे. त्यांच्या निबंधांत कविता, चित्र आणि अनुभव यांचा सुंदर संगम दिसतो. त्या अनुभवनिधानाचा आवाका म्हणजे प्रचंड खोलीचा अनाकलनीय ‘डोह’. विनम्र नमन.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lessons from Animals: प्राण्यांकडूनही शिकता येतात जीवनाचे धडे! मुंग्यांची शिस्त, पक्ष्यांची मेहनत अन् निसर्गाची जादू

Bangladesh Resort Fire: बांगलादेशात रिसॉर्टला भीषण आग, 10 जणांचा होरपळून मृत्यू; जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही VIDEO

Trigrahi Yog 2026: ग्रहांच्या फेरबदलाचा मोठा चमत्कार! त्रिग्रही आणि बुधादित्य योगाच्या संयोगाने उजळणार 3 राशींचे भाग्य; होणार अफाट धनलाभ

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

SCROLL FOR NEXT