Student Mental Health: 'तू हरलास तरी मी पाठीशी आहे' म्हणणारं कुणी उरलंय का? शिक्षणाच्या बाजारात हरवलेली माणुसकी, विद्यार्थ्यांच्या आत्महत्येला जबाबदार कोण?

Student Suicides In Goa: ही प्रणालीच अशी आहे की जिथे फक्त जिंकणाऱ्याचा उदो उदो होतो. इथे हरणाऱ्याला कायम सांगितले जात की तू हरलास म्हणजे तुझं आयुष्य वाया गेले.
rising student suicides
rising student suicidesDainik Gomantak
Published on
Updated on

सुलक्षा मनेश गावस

पुन्हा गोव्याने दोन जीव गमावले. याची जबाबदारी कोण घेणार, हा माझा पहिला प्रश्न आहे? कारण या दोन्ही घटना बघता, आपले भविष्य घडवता घडवता आपली सगळी शक्ती पणाला लावून ही मुले काम करत होती आणि वर्तमान परिस्थितीने त्यांना इतके हतबल केले की त्यांनी प्राणत्याग करणे हा पर्याय निवडला. समाजातले ‘द सो कॉल्ड’ सर्वांत हुशार विद्यार्थी स्पर्धेच्या होळीत पेटले. शिक्षण क्षेत्रातील हे स्पर्धात्मक वातावरण आणखी पुढे किती बळी घेईल या विचारानेच काळीज पिळवटून निघते.

ही प्रणालीच अशी आहे की जिथे फक्त जिंकणाऱ्याचा उदो उदो होतो. इथे हरणाऱ्याला कायम सांगितले जात की तू हरलास म्हणजे तुझं आयुष्य वाया गेले. प्रयत्न करणारा जिद्दीने सर्वशक्तीनिशी आपले सर्वस्व पणाला लावतो आणि कोण कुठून येतो चार जास्त पैसे, एखादी सीट या हव्यासापोटी येऊन भ्रष्टाचार करतो आणि पुन्हा परीक्षा होणार असे फतवे निघतात. कल्पना करा अशावेळी स्पर्धेच्या अग्निदिव्यातून जाणाऱ्यांनी आत्ता कुठे मोकळा श्वास घेतला होता आणि पुन्हा असे फतवे काढून त्याच निखाऱ्यावर त्यांना चालायला सांगणे हे किती निर्दयी आहे, याची जाणीव तरी फतवे काढणाऱ्यांना होते का?

rising student suicides
Goa School Academic Calender: 'विद्यार्थ्यांनो लक्ष द्या'! गोव्यात 1 एप्रिलपासून वाजणार शाळेची घंटा; नवीन शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक जाहीर

कुणाच्या तरी हव्यासाची शिक्षा, कुणाच्या तरी हलगर्जीपणाची शिक्षा बाकीच्यांना का? याचे उत्तर समाज म्हणून त्या धाय मोकलून रडणाऱ्या पालकांना द्यायला आहे का आपल्याकडे. समाजमाध्यम, शिक्षण संस्था, इतर सामाजिक यंत्रणा आत्महत्येची कारणे शोधत आहेत. इथे प्रत्येकाने आपल्या आत डोकावून नीट पहिले तर प्रत्येकाला आपले हात या कोवळ्या जीवांच्या रक्ताने माखलेले दिसतील.

इथे माझ्याकडे लिखाण करताना उत्तरे नाहीत. मनात फक्त तीव्र वेदना आणि अनेक प्रश्न आहेत. एकदा या दोन्ही मुलांच्या अंतरंगात डोकावून पाहा. नुसता त्यांच्या जीवनातील एक दिवस जगून पाहा. हुशार आहेस, उत्तम. खूप शिक्षण घे, मोठा हो. मन लावून अभ्यास कर. चांगले गुण मिळाले अति उत्तम, आता उच्च पदवी मिळव. भरपूर पगार, विद्यालयातून बाहेर पडता पडता मिळालाच पाहिजे त्यासाठी चार पाच पदव्या बरोबर मिळाल्या तरी सोन्याहून पिवळे. परदेशी नोकरी मिळवलीस तर जीवन सार्थकी लागले म्हणायचे.

rising student suicides
Portuguese Education System In Goa: कोकणीवर बंदी, लिसेव म्हणजे काय? पोर्तुगीज काळात कशी होती गोव्यात शिक्षण व्यवस्था?

आपण जन्माला घातलेल्या या मुलाचे भवितव्य घडवता घडवता त्याचे वर्तमान पणाला लागते आहे, याचा आपल्याला ठावही लागू नये? खेळणे म्हणजे वेळ वाया दवडणे, मित्र मैत्रिणींच्या घोळक्यात रमणे म्हणजे वाह्यातपणा. ध्येयवेडे बना हेच त्यांचे हितचिंतक त्यांना सांगतात. सांगणाऱ्याचा हेतू वाईट नसतो. मात्र त्यात आपलेपणा, माया, परानुभूती याचा गंध नसतो. तो असता तर नापास झालेल्या मुलाला हिणवून त्याला मारायला हात कधीही उगारले गेले नसते. आपण मुलांना जिंकण्यासाठी तयार करतो.

इतरांच्या यशोगाथेचे त्यांच्यासमोर कायम गुणगान करतो. कधी त्यांना मायेने जवळ घेऊन तू आहेस ना बरा/बरी? हे विचारतो का? त्यांना अपयश कसे पचवायचे याबद्दल सांगतो का? तडजोड, दुःख, नकार यांच्याशी त्यांची तोंडओळख तरी होऊ देतो का? ‘तू चांगला शिक’, हे सांगताना ‘हरलास तरी हरकत नाही मी आहे पाठीशी’ असे सांगतो का? उत्तम शिकणाऱ्या मुलांचे कोडकौतुक होते आणि त्यांच्या पालकांचेही. हे मुले बघतात. नापास होणाऱ्या मुलांच्या पाठीमागे कोण उभं राहतो? करतो कुणी त्यांची चौकशी मायेने?

rising student suicides
Goa Education System: मंदिरात आणि झाडाखाली भरायचे वर्ग! पोर्तुगीज राजवटीत गोव्यात कशी होती शिक्षण पद्धती?

त्यांच्या पालकांचा संवाद कधी ऐकला आहे तुम्ही? ‘गड्ड्या शिकूक जायना जाल्यार वचून जीव दी’ असे म्हणणारे पालक हे काही ते स्वखुशीने म्हणत नसतात. त्यांना चिंता असते लोक काय म्हणतील याची. लोक म्हणजे आपण सगळे. आपणच उभ्या केल्या, या उत्तम मुलांच्या बेगडी भव्य प्रतिमा. रचत गेलो शिक्षणाचा बाजार. मेडल्स, स्पर्धा परीक्षा, ऑल इंडिया रँक किती आणि काय काय. एका बाजूला पालनकर्त्यांच्या अपेक्षा. दुसऱ्या बाजूला लाखोंशी स्पर्धा करून आपले स्थान बळकावायची धडपड. एवढे करून कुठे संपते?

स्थान मिळाले तरी तिथे बसून परत नेटाने हातपाय मारणे आहेच. पाच वर्षे ‘किलर इन्स्टिंक्ट’ घेऊन भीड म्हणून आपण मारे सांगतो. पण आत्ताच्या काळात हा ‘स्ट्रगल’ कधी संपत नाही. त्यांच्या डोळ्यातली भीती, इथे माझा निभाव नाही लागला तर? ही काळजी दिसते. कशी दिसत नाही आपल्याला? मुले व्यासनाधीन होतात चैन करण्यासाठी, म्हणून जीव गमावतात हा आपण लावलेला शोध. कालपर्यंत गुणी असलेले हे बाळ नशेचा आधार का घ्यायला गेले? तिथे आपण कुठे कमी पडलो? याचा होतो अभ्यास?

rising student suicides
Indian Education System: रेखाटनापासून पुढे....

त्यांच्या कष्टाची फळे मिरवायला आपण तत्पर असतो मात्र त्यांच्या डगमगणाऱ्या पावलांना, थरथरणाऱ्या हातांकडे का कायम लोकलज्जेखातर दुर्लक्ष करतो? उत्तमोत्तम कोचिंग देणाऱ्या संस्था लाखो आहेत मात्र त्यांना मनाने खंबीर बनवणारी प्रणाली आपल्याकडे नाही हे सत्य आता तरी स्वीकाराल का? यशाची खात्री देणारे अपयश आले तरी, ‘आयुष्यात करण्यासारखे खूप आहे’ हे का नाही मुलांच्या मनावर बिंबवत. अवघी काही क्षेत्रे सोडली तर बाकी सारे व्यर्थ ही व्याख्या आणि विचारधारा बदलण्याचा प्रयत्न करावा असे नाही वाटत का आपल्याला?

अशा घटना घडल्या की दोन दिवस खळबळ माजते पुन्हा सगळे पूर्ववत. आत्महत्या हा त्या मुलांनी केलेला गुन्हा हे वरकरणी ठरते. मात्र त्या टोकाला त्यांना उभ्या करणाऱ्या समाजाला अपराधीपणाची भावना स्पर्शही करत नाही ही खंत करण्यासारखी बाब नाही का? पोटचा गोळा गमावणे हे दुःख मोठे की हुशार विद्यार्थी गेला याचे दुःख मोठे, याचे उत्तर आहे आपल्याकडे?

rising student suicides
Goa Education: विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! कोकणी-मराठीसह परदेशी भाषांना वाव; सरकारच्या निर्णयामुळे संभ्रम दूर

संपूर्ण आयुष्य त्यांना अभ्यास, गुण, स्पर्धा यात आपण एवढे गुंतवून ठेवले की त्यांच्या आत दडलेल्या हळव्या मनाचा कुठे विचारच झाला नाही. शाळा म्हणतात आम्ही करतो कार्यक्रम मानसिक आरोग्य सांभाळण्यासाठी मात्र आता विद्यार्थ्यासमोरची आव्हाने बघता हे पुरेसे आहे का? गुणवत्ता यादीचा सोस आणि असूया सोडणारी अनसूया होणारी आई होणे जमेल का आपल्याला? आज विद्यार्थ्यांना फक्त यशाची नाही, तर समजून घेणाऱ्या हातांची गरज आहे. गुणांच्या शर्यतीत धावताना त्यांच्या मनातला थकवा, भीती आणि एकटेपणाही ओळखायला हवा. गुणवत्ता यादीचा सोस सुटायला हवा. गुणपत्रिका मिरवण्याच्या नादात मुलांच्या आयुष्याची होळी नको व्हायला!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com