Juve island Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

पोर्तुगीज आक्रमणातही हिंदू-ख्रिश्चन ऐक्याची परंपरा राहिली अबाधित; माणुसकीचं दर्शन घडवणारं गोव्यातील आदर्श 'जुवे बेट'

Cultural history of Juve island: जुवे बेट जरी पोर्तुगिजांनी घेऊन तिथे धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला, तरी त्या बेटावर हिंदू आणि ख्रिश्चनांनी आपुलकी, माया, मैत्री, शेजारधर्म राखून एकोपा पाळलेला पाहावयास मिळतो.

दैनिक गोमन्तक डिजिटल

मधू या. ना.गावकर

जुवे बेट जरी पोर्तुगिजांनी घेऊन तिथे धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला, तरी त्या बेटावर हिंदू आणि ख्रिश्चनांनी आपुलकी, माया, मैत्री, शेजारधर्म राखून एकोपा पाळलेला पाहावयास मिळतो. माणसाने जरी नदीला मुकी मानली, तरी ती माणसाला संजीवनी देत, आपल्यातील सांकेतिक भाषेत सर्व जैवविविधतेशी बोलते. उगमाकडे ती बालपण दाखवते. त्या खालच्या भागात खळाळपणा करते. त्या पुढील प्रवासात यौवनात आलेली पाहावयास मिळते. पुढच्या प्रवासात ती प्रगल्भपणा दाखवते आणि सागराला मिळताना वृद्धत्व पत्करते. अशा विविध रूपांत ती पाहावयास मिळते. मानव जन्माला येऊन मरण पत्करतो पण नदीला मरण नाही, ती चिरकाल जिवंत राहते. कारण जन्माच्या प्रत्येक जीवाश्मांना तिच्या पाण्याची गरज लागते.

गोव्याची प्रमुख नदी मांडवी हिचा उगम भीमगड अभयारण्यातील देगाव या अतिसंवेदनशील डोंगराळ भागात झाला आहे. उगम पावलेल्या ठिकाणी तिचा प्रवास एखाद्या सरपटणाऱ्या देवगांडुळाप्रमाणे वाहताना भासतो. तिथून ती गवाळीला येते आणि भांडूरा ओहोळाला आपल्यात सामील करून अल्लडपणा दाखवत पुढे सरकते. आमगाव, कृष्णपूरला पोहोचताच आपल्यातील युवापण दाखवत पुढील प्रवासात झाडानी, पेडानी, उस्ते भागात ती पावसाळ्यात नागिणीच्या आवेशाने सळसळते. त्यावेळी सत्तरीचा भूमिपुत्र तिला ’म्हादय कोपली’ म्हणून पूजनाने तिला वंदन करतो.

त्या पुढील प्रवासात ती विचारवंत होत प्रवाहाने कोत्रान, रगाडा आणि खांडेपार या तीन नद्यांचा प्रवाह आपल्या पात्रात घेत सोनारबाग या ठिकाणी ‘मांडवी’ नाव धारण करते. पावसाळ्यात म्हादई आणि खांडेपार नद्यांना पूर आल्यास तिच्या काठावरील सखल भागातील लोकवस्तीच्या भागांना धोका निर्माण होतो. गरीब भूमिपुत्रांचे संसार पुराच्या पाण्याने वाहून जातात. त्यात प्रामुख्याने गांजे, आमेशी, नाणूस, खांडेपार, वाघुर्मे, वळवई, गाडवाडा-खांडोळा या भागांना तिने अनेकवेळा तडाखा दिला आहे. त्या पुढच्या भागात ती समजूतदारपणे प्रवासात आमोणा, खांडोळा भागातील वाळवंटीचे मुख आपल्यात घेऊन सारमानस खांडोळा आणि सांतइस्तेव भागात रुंदावून कालव्याप्रमाणे नद्यांतून पुढचा प्रवास करते.

या परिसरात तिने सांतइस्तेव बेटाला आपल्या पात्रात मध्यभागी उभे करून नैसर्गिक धरण तयार करून आपले गोड पाणी अडवलेले पाहावयास मिळते. मानव फक्त स्वतःच्या जगण्याचा विचार करतो, मात्र जीवन देणारी नदी वसुंधरेचा विचार करते. आज ज्याला आपण ’सांतइस्तेव’ म्हणतो त्याला पूर्वी ’जुवे’ म्हणत होते. या बेटाचा इतिहास पाहिल्यास प्राचीन काळी त्या बेटावर शांतादुर्गा आणि रवळनाथाचे देऊळ होते. पोर्तुगिजांनी तिसवाडी बेटे ताब्यात घेऊन हिंदू देवालयांची मोडतोड सुरू करताच बेटावरील हिंदूंनी आपले देव खांडोळा गावातील कुर्डव भागात आणून स्थापन केले. ही बातमी संभाजी महाराजांना कळताच त्यांनी आपले मराठा सैन्य मांडवी नदी पार करून तिथून पोर्तुगिजांना हाकलून देऊन तिथला किल्ला आपल्या ताब्यात घेतला.

जुवे बेटावर जाण्यायेण्यासाठी चार नाविक रस्ते होते: ओल्ड गोव्याला जाण्यास रामाची तार, खांडोळा जाण्यास टोक तार, आखाडा-नार्वे तार आणि पिळगाव-नार्वे जाण्यास कुपा पालमार तार. भूगर्भशास्त्राने पाहिल्यास जुवे बेटाची प्राचीन काळी तीन बेटे होती. कालांतराने मांडवी प्रवाहातून आलेला गाळ अगर भूकंपाने मांडवीच्या पात्रात साचलेल्या गाळाच्या जमिनीवर पूर्वजांनी शेती करून कालांतराने त्या तीन बेटांचे एकत्रीकरण होऊन एक बेट झालेले पाहावयास मिळते.

सांतइस्तेव बेटाच्या पूर्वेला टोक खांडोळा नदी, पश्चिमेला जुवे-आखाडा नदी, उत्तर बाजूने मांडवीचे पात्र आणि दक्षिण बाजूने कुंभारजुवे-सांतइस्तेव नदी. या बेटाला मांडवीने सुपीक गाळाची वर्तुळाकार खाजन शेती मोठ्या प्रमाणात दिली आहे. सांतइस्तेव बेटाच्या नदीकिनारी पूर्वजांनी बांध उभारून त्या बांधाच्या संरक्षणासाठी निसर्गाने कांदळ वृक्षांची हिरवळ तयार केली आहे. त्या कांदळवनात कैक जातींचे पक्षी तेथे घरटी बांधून राहतात. बेटावरील हिंदू-ख्रिश्चन समाज एकोप्याने, गुण्यागोविंदाने एकमेकांना साहाय्य करून राहतात. तिथली संपूर्ण शेती खाजन असल्याने उन्हाळ्यात खणून ठेवत होते आणि मौसमी पाऊस सुरू होताच बेटाच्या समोरील शेतकरी लोक जुवे बेटावर पेरणी करण्यास जात होते.

पेरणी करण्यास जाणाऱ्या लोकांच्या गर्दीने शेती परिसर गजबजून जात होता, पाच-सहा दिवसात पेरणी करून संपायची. माझ्या तरुण वयात मी जुवे शेतात काम करण्याचा अनुभव घेतला आहे. सकाळी खांद्यावर कुदळ, डोक्यावर घोंगडी आणि हातात दुपारच्या जेवणाचा डबा घेऊन जाऊन दुप्पट-तिप्पट मजुरी कमावली आहे. ‘करंगूट’, बेळा’, ‘खोचरी’ अशी गोमंतकीय बियाणी कोंब काढून पेरणी करीत होते. होडीला एक आणा, दहा पैसे देऊन होडीने नदी पार करीत होते.

जुवे बेटावरील वर्तुळाकार नदीकिनारी बांध उभारण्यास पूर्वजांना किती शतके लागली असतील हे सांगणे फार कठीण आहे. पण त्यांनी भविष्याचा विचार केला होता. बांधाच्या आतल्या बाजूने लांब खळ्या खोदून त्या खळ्यांच्या मुखाकडे मानस लावून खाऱ्या पाण्यापासून शेतीचे रक्षण केले आहे. भरतीच्या वेळी मानशीची दारे बंद होऊन खारे पाणी रोखले जाते, सुकतीच्या वेळी मानशीची दारे उघडी होऊन खळीतील खारे पाणी नदीच्या पात्रात जाते. त्याने शेतातील गोडे पाणी आणि नदीतील खारे पाणी यांच्या मीलनाने कांळूद्र, शेवटा, खरचाणी, तामसा, चोणकूल, शेतुक, लेप, वागी, झिंगे, खेकडे, मुत्रे, बुराटे, टोकी अशी मासळी मोठ्या प्रमाणात जन्म घेते.

पावसाळ्यात पेरणी झाल्यावर पंधरा-वीस दिवसांनी पिवळ्या मातीत हिरवे कोंब वाऱ्याच्या झुळकेने झोके घेऊ लागतात. त्या दिवसात शेतातील खुरपण काढण्यास बेटापलीकडील गावांतील बायांचा मेळा शेतात भरायचा आणि तीन महिन्यांनंतर दसऱ्याच्या दिवसात भात कापणीस पुरुष आणि बाया माणसांची जत्रा भरायची. कापणी-मळणी झाल्यावर तिथला ख्रिश्चन शेतमालक पिकलेले धान्य घरी न्यायचा. जुवे बेटावरील लोक उकड्या तांदळाची पेज आणि शीत (भात) जेवून मोठे झाले. जेवणात खळीतील अगर मानशीच्या जाळातील रुचकर मासळी खाऊन आरोग्य सुरक्षित राखले,

शेती सुरक्षित राहण्यास टोळटो शेताच्या बांधाला दोन माणसे, कुपान शेताला दोन माणसे, गाज शेतीला एक माणूस, पायण शेतीला एक माणूस, होलाकडील शेतीला एक माणूस, आखाडा शेतीला एक माणूस अशा एकूण आठ माणसांनी जुवेच्या शेतीला मांडवीच्या खाऱ्या पाण्यापासून रक्षण केले आहे. बेटावर वाहतुकीची सोय नसल्याने पूर्वजांनी टोक, रामाची तार, आखाडा आणि कुपान भागातून होडीने जाण्यायेण्यास नाविक रस्ते निवडले होते. बेटाच्या सभोवार खारे पाणी असले तरी बेटावरील विहिरींना गोड पाण्याचा साठा मिळतो. निसर्गाने मानवासाठी ही योजना करून ठेवली आहे.

सांतइस्तेव बेटाला जुवे नावाने ओळखतात. भात कापणी झाल्यावर हिवाळा सुरू होताच तिथले शेतकरी भाजीपाला लागवड करून शेतातील रुचिक भाजी माशेल, बाणस्तारी, साखळी, डिचोली, पणजी शहरात विक्रीस नेतात. मिरची, कांदा, वाल, वांगी, दोडगी, मुळा, रताळी, नवलकोबी, अळसंदा सगळी भाजीपाला आणि कडधान्यांचे पीक घेत होते. तिथली सात शिरांची भेंडी गोव्यात प्रसिद्ध मानतात. ती भेंडी फारच रुचकर लागते.

जुवेच्या बेटावरील घरांना पाहिल्यास तिथे सुंदरता दिसून येते. तिथले रस्ते जरी अरुंद असले तरी प्रत्येक घराकडे रस्ता आहे. घरासमोर नारळ, आंबा, फणस, चिकू, पेरू, पाहावयास मिळतात. मानकुर, सावेर, फेर्नांद, अखणा, मालगेस, फटयो, कुलास, मुसराद, बेनकुर, साकरीन, चिमुद या जातींचे आंबे दारोदारी पाहावयास मिळतात. तसेच प्रत्येक घरासमोर वेगवेगळ्या फुलांची व्यवस्थित लागवड करून बागाकामाने घराची शोभा वाढवतात. हिंदू लोक दसरा, धालो, चतुर्थी, शिगमो साजरा करतात. ख्रिश्चन लोक ख्रिसमस, फेस्त, कार्निव्हल साजरे करतात. जुवे बेट जरी पोर्तुगिजांनी घेऊन तिथे धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला, तरी त्या बेटावर हिंदू आणि ख्रिश्चनांनी आपुलकी, माया, मैत्री, शेजारधर्म राखून एकोपा पाळलेला पाहावयास मिळतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर 'दक्ष'ची गरुडझेप! परिस्थितीशी झुंज देत गाठलं यश, आता ध्येय 'सीए' होण्याचं, पण आर्थिक मदतीची प्रतीक्षा

Handshake Controversy: 'हॅन्डशेकसाठी आम्ही भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुमपर्यंत गेलो', सलमान अली आगाचा खुलासा; क्रिकेट विश्वाचं वेधलं लक्ष VIDEO

Goa Crime: पोलिस कोठडीत मारहाणीमुळे तरुणाची आत्महत्या, वाळपई तणाव; पोलीस उपनिरीक्षकावर कारवाईसाठी कुटुंबीय आक्रमक

नेपाळच्या 'दीपेंद्र'चा मोठा धमाका! सलग दोनदा 6 चेंडूत 6 षटकार ठोकल्यानंतर आता वनडेत रचला अनोखा इतिहास; गोलंदाजांची उडवली दाणादाण

Goa Drug Case: राहत्या घरी 'गांजा'ची शेती! थिवीच्या रहिवाशाला कोर्टानं सुनावली सक्तमजुरी आणि दंडाची शिक्षा; सव्वाचार वर्षे चालला खटला

SCROLL FOR NEXT