सांगे या गोव्यात सर्वाधिक जंगलक्षेत्र असलेल्या दक्षिण गोव्यातल्या कुर्डी गावासही घनदाट अरण्य आणि सह्याद्रीच्या उंच उंच पर्वतरांगांचे वैभव लाभले होते. आज साळावली धरणाच्या जलाशयाखाली बुडालेल्या या कुर्डी गावाला प्राचीन इतिहास आणि संस्कृतीचा समृद्ध वारसा लाभलेला होता.
कुर्डी येथे कसबा असल्याने आणि आंगोड ही बाजारपेठ असल्याने प्रशासकीय आणि आर्थिक दृष्टिकोनातून या गावाचे त्याकाळी असलेले स्थान अधोरेखित होते.
याच गावात जांभ्या दगडावरती कोरलेल्या मातृदेवतेचे जे महाकाय अडीच मीटर उंचीचे जे चित्र आढळले होते, ते महाषाषाण युगातले असल्याचे मत पुरातत्त्व संशोधकांनी मांडलेले असून, सध्या हे महाकाय प्रस्तर चित्र नव्या म्हाळसा नारायणी मंदिराच्या शेजारी वेर्णा पठारावरती स्थलांतरित केलेले आहे.
या मातृदेवतेच्या जांभ्या प्रस्तरावर कोरलेल्या या चित्रावरून या गावातील आणि एकंदर गोव्यातल्या मातृपूजनाच्या समृद्ध परंपरेची प्रचिती येते. गोवा कदंब राजवटीतला एक भंग आणि अस्पष्ट नागरी लिपी आणि संस्कृत भाषेतला षष्ठ राजाचा अनेक बिरुदांनी उल्लेख असलेला लेख कुर्डीत आढळला होता.
हा शिलालेख कुर्डीच्या सांगे महालातल्या शेकडो वर्षांच्या ऐतिहासिक वारशाचे दर्शन घडवतो. दिघी घाट मार्गाशी जोडल्या जाणाऱ्या कुर्डी गावात जी पुरातत्त्वीय आणि सांस्कृतिक संचिते आढळलेली आहेत, त्यावरून इथल्या इतिहासाची नव्हे तर गतकाळातल्या आज विस्मृतीत गेलेल्या वैभवाची प्रचिती येते.
इथे असलेली मानवनिर्मित जांभ्या दगडात कोरलेली गुंफा असो अथवा सोमेश्वराचे मंदिर, त्याचप्रमाणे उमा-महेश, स्कंद-गणपती यांच्या प्राचीन पाषाणी मूर्ती, या गावाच्या प्राचीन वैभवाच्या खुणा आहेत.
गोवा कदंब काळातल्या शिल्पकलेशी साधर्म्य सांगणारे कुर्डी येथील जुने शिवमंदिर भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या पुरातत्त्व संशोधकांच्या कुशल मार्गदर्शनाखाली साळावली येथे यशस्वीरीत्या स्थलांतरित केले आहे.
महादेव मंदिरात जाण्यासाठी जांभ्या दगडात पायऱ्या कोरलेल्या होत्या. येथील आदिवासी आणि अन्य कष्टकरी समूहाने नदीच्या वाहत्या पाण्याला नियंत्रित करण्यासाठी चिरणाभाटात भौसुलो बांधाची उभारणी करून रामनाथाच्या पाटाद्वारे हे पाणी सिंचनासाठी वापरले होते.
समस्त कष्टकरी जातीजमाती एकत्र येऊन, त्यांनी भौसुलो बांधाची निर्मिती केली होती. १० किलोमीटर लांबीच्या कालव्याचे अत्यंत कल्पकतेने खोदकाम करून शेती आणि बागायतींना जलसिंचनाची सुविधा उपलब्ध करून दिली होती.
सिमेंट - कॉंक्रीटचे कोणत्याच प्रकारचे बांधकाम न करता कालव्यातून येणारे पाणी इथल्या कष्टकऱ्यांना अन्नधान्यांची पैदास करण्यात साहाय्य करत होते.
कुर्पे आणि कुर्डी गावांतल्या सीमेवरून ताम्हणाचा व्हाळ प्रवाहित व्हायचा तेथील पांडवाघोल या जागी रानटी जमात वास्तव्यास असल्याच्या लोककथा प्रचलित होत्या. कुर्डी जवळच्या शेळपे गावात सातेरी, रामनाथ आणि पंचपुरुष ही दैवते होती शेकडो वर्षांपूर्वी पेडण्यातल्या एका टोकाला अरबी सागराच्या जवळ असलेल्या मोरजी गावातून सावंत देसाई स्थलांतर करून, सह्याद्रीच्या निसर्गसंपन्न अशा कुर्डीत स्थायिक झाले होते.
त्यामुळे शेळपेच्या सामाजिक आणि धार्मिक व्यवहारात त्यांना महत्त्वाचे स्थान लाभले होते . एकेकाळी बारमाही चवदार पेयजलाची उपलब्धता,
शेताभाटात कालवा, पाट यांच्या माध्यमातून जलसिंचनाची सोय मिळत असल्याने, मुबलक अन्नधान्यांची पैदास होत असल्यानेच गोव्याच्या नव्हे, तर अन्य प्रांतांतून आलेल्या लोकसमूहांनी कुर्डीत बस्तान मांडले होते.
खाणाजेवणाची वानवा नसल्यानेच इथल्या लोकमानसाने नृत्य, नाट्य, गायन, वादन आदी कलांशी पूर्वापार अनुबंध प्रस्थापित केले होते.
गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर, शास्त्रीय संगीत सृष्टीतील ख्यातकीर्त विदुषी किशोरीताई आमोणकर, तबलावादक मारुती कुर्डीकर त्याचप्रमाणे साहित्य, नाट्य, सिनेमा, पत्रकारिता आदी क्षेत्रांत उत्तुंग कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांची मांदियाळी या गावाने गोमंतभूमीला प्रदान केली आहे.
गोवा मुक्तीनंतर केंद्रीय जल आयोगाने केंद्रशासित गोव्यातील शहरे आणि औद्योगिक आस्थापने यांना पेयजल पुरवण्याच्या हेतूने १९६४-६५च्या दरम्यान साळावली धरणाचा प्रस्ताव मांडला आणि १९७२साली साळावली धरण आणि जलसिंचन प्रकल्पाला वित्तीय मंजुरी लाभली.
नऊ कोटी खर्चाची तरतूद करण्यात आलेल्या या प्रकल्पाची पूर्तता होईपर्यंत शंभर कोटींचा आकडा १९८५पर्यंत पार केला. विचुंद्रे, कुर्पे, नायकिणी, पोत्रे, उदर्ण, साळपे, साळावली उगे या गावांतील कुटुंबांचे पुनर्वसन करण्यात आले तरी सर्वाधिक फटका बसला तो मात्र कुर्डी गावाला.
६४३ कुटुंबांपैकी केवळ कुर्डी येथील ३४४ कुटुंबांचे पुनर्वसन करण्यात आले आणि त्यामुळे एकेकाळी हसता, खेळता असलेला कुर्डी गाव साळावली धरणाच्या जलाशयाखाली कायमचा विसावला. १९७०च्या जनगणनेनुसार कुर्डी गावात ३५५ कुटुंबे आणि १७०१ लोकसंख्या असल्याची नोंद मिळते.
साळावली धरणाच्या उभारणीसाठी आणि धरणाच्या निर्मितीसाठी त्याकाळी १९८०चा वन संवर्धन कायदा अस्तित्वात नसल्याकारणाने सुमारे ७०६ हेक्टरातले समृद्ध वनक्षेत्र नष्ट करण्यात आले.
१४,५०० हेक्टर क्षेत्राला ओलिताखाली आणि दरदिवशी ३५ दशलक्ष गॅलन दैनंदिन आणि औद्योगिक वापरासाठी पेयजल मिळवण्यासाठी ऐतिहासिक आणि सांस्कृतिक श्रीमंती लाभलेल्या कुर्डी गावाचा विकासाच्या वेदीवरती बळी देण्यात आला. देवराया,
देववृक्ष, पायवाटा, मंदिर संस्कृती, पुरातत्त्वीय संचिते, पारंपरिक जलसंचय आणि जलसिंचन तंत्रज्ञान, लोककलांचा वैविध्यपूर्ण वारसा या साऱ्यांना साळावली धरणाने जलसमाधी दिली.
आज कुर्डी गावातले वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेले जिर्णावशेष उन्हाळ्यात जलाशयातले पाणी कमी झाल्यावर पाहायला मिळतात. त्यातून या गावाचा पुरातत्त्वीय, खगोलशास्त्रीय, वास्तुकला, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाची प्रचिती येते.
१८८२साली कुर्डीच्या सोमेश्वराची घटना पोर्तुगीज दप्तरात नोंद असून, सोमेश्वराच्या परिवारात बेताळ, मूळवीर, भगवती, रवळनाथ, सातेरी यांचा समावेश व्हायचा. कुर्डीच्या देवी भगवतीस भजण्यासाठी हिरेगंगे, वरवाणी, सोनार गावकेरीकर, वायकेरीकर, ताळेबेलेकर, कुर्डीकर, शेट, शेजेकन, मानकाने, आडपईकर, शिरोडकर, च्यारी, वेळिप, गावकर, महाले, कुंभार, सांबारी-नायक, सावंत देसाई, प्रभुदेसाई आदी भाविक येतात.
गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांत कुर्डीच्या देवस्थानांशी निगडीत विखुरलेले भाविक आज वार्षिक उत्सवाप्रसंगी नव्या मंदिरांच्या ठिकाणी येतात. परंतु वालकिणी आणि वाडे येथील धरणग्रस्त पुनर्वसन वसाहतींत मात्र गावपण कायमचे हरवलेले पाहायला मिळते.
शेती, बागायती आणि पारंपरिक उद्योग व्यवसायाच्या आधारे आनंदाने कष्टाची भाकरी खाण्यात अपूर्व समाधानी जीवन जगणाऱ्या लोकमानसाला पुनर्वसनाच्या वेदनेला सामोरे जावे लागत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.