दक्षिण गोव्यातल्या सांगे आणि धारबांदोडा तालुक्यांच्या सीमेवरती शेकडो वर्षांचा इतिहास लाभलेला काले गाव आहे. लोह खनिजाच्या आततायी उत्खननाच्या व्यवसायाला चालना मिळण्यापूर्वी हा गाव हिरवळीचे वैभव मिरवत होता. सह्याद्रीच्या डोंगरमाथ्यावरून उगम पावणाऱ्या आणि मांडवी नदीची उपनदी असणाऱ्या काले किनारी हा गाव वसलेला आहे.
गोव्यातल्या सह्याद्रीच्या हिरवळीची गर्भश्रीमंती लाभलेल्या पर्वतरांगाच्या पायथ्याशी वसलेल्या या गावाचा इतिहास आणि लोकसंस्कृती अज्ञात काळाशी जोडलेली आहे. शिवस्वरूपी कलनाथ, गजलक्ष्मीशी नाते सांगणारी केळबाय आणि प्रभावळीवरती अकरा फणाधारी नागांनी अलंकृत चतुर्हस्त खड्गधारी सातेरी, आदिम जमातींशी संबंधित जल्मी आणि पाईक देव आदी देवदेवतांचा पूर्वापार वरदहस्त या भूमीला लाभलेला आहे.
बारमाही वाहणाऱ्या काले नदीमुळे जुन्या काळी जंगलात वसलेला हा गाव कृषिप्रधान होता. काले नदी जरी दुधसागरची उपनदी असली तरी ती दुधसागरपेक्षा लांबीने आणि व्याप्तीने मोठी आहे.
दुधसागरची एकूण २५.६ कि.मी. तर कालेची लांबी २९ कि.मी. इतकी आहे. त्यामुळे पावसाळी आणि वायंगणी भाताची मुबलक प्रमाणात इथे पैदास आणि बारमाही चवदार पेयजलाची उपलब्धी होत असल्यानेच पोतुगीज अमदानीत सोळाव्या शतकात धर्म समीक्षणाच्या अग्नीत होरपळलेल्या तिसवाडीतल्या दीपवती बेटावरच्या नार्वे गावातून स्थलांतरित झालेल्या लोकसमूहाने इथे कायमचा आश्रय घेतला.
कालेतल्या पायकामळ येथे स्थायिक झालेल्या कष्टकरी लोकसमूहाने पावसाळ्यात कुमेरी शेतीद्वारे, नाचणी आणि पाखड यांची पैदास करण्याला तर वागऱ्यागाळ येथे मान्सूनच्या पावसाळ्यानंतर हिवाळ्यात वायंगणी भातशेती करण्याला प्राधान्य दिले होते.
काले नदीद्वारे बारमाही उपलब्ध होणाऱ्या पाण्याचा नियोजनबद्ध वापर करण्याची कल्पकता त्यांच्याकडे असल्याने त्यांनी वायंगणी शेतीच्या माध्यमातून आपले जगणे समृद्ध केले होते.
खाण्याजेवणासाठी मुबलक भात, कंदमुळे आणि पिण्यासाठी चवदार पाणी यामुळे वेगवेगळ्या भागांतून येऊन लोकसमूह इथे स्थिरावलेले आहेत. वागऱ्यागाळ येथील आदिवासी बहुल पट्ट्यात राहणारे कष्टकरी वायंगणी शेतीबरोबर भाजीवाला आणि कडधान्याची पैदास करायचे. कर्नाटकातल्या काळी व्याघ्रक्षेत्राबरोबर सांग्यातल्या नेत्रावळी अभयारण्याशी संलग्न असणाऱ्या सह्याद्रीच्या सुरक्षित जंगलांच्या कुशीत वागऱ्यागाळ वसलेले असल्याने, इथल्या लोकमानसाने जंगली श्वापदांशी सौहार्दाचे संबंध प्रस्थापित केले होते .
भारतभरातल्या जंगलनिवासी लोकसमूहाने अन्न साखळीच्या शिखरस्थानी असलेल्या पट्टेरी वाघाचे स्थान आणि महत्त्व ओळखले होते. त्यासाठी कुठे त्याची उपासना स्त्रीरूपात वाघजाई मातृदेवता म्हणून करण्यात आली, तर कुठे पुरुषी रूपात वाघ्रोदेव म्हणून त्याच्यासमोर नतमस्तक होण्यात कष्टकरी जातीजमातींनी धन्यता मानली होती.
काणकोणात वाघाचे वास्तव्य असणारी गुंफा वागऱ्याहन्न तर पेडणे, सत्तरीत वाघबीळ म्हणून ओळखली गेली. मार्जार कुळातील वाघ पर्यावरणीय समतोल राखण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे योगदान करत आलेला आहे. तृणहारी हरण, चितळ, सांबर आदी प्राण्यांच्या वाढत्या संख्येवरती नियंत्रण ठेवून मांसाहारी वाघ मृदासंरक्षण करत असतो.
भारतीय लोकधर्मात ताकदवान पट्टेरी वाघाचे त्याच्या एकंदर रंगरूपावरून प्रचंड आकर्षण पूर्वापार असल्यानेच, त्याची मूर्ती स्थापित करून, पूजन केले तर वाघदेव आपल्या गुराढोरांचे आणि कुटुंबातल्या सदस्यांचे रक्षण करील अशी आशा बाळगलेली होती आणि त्यामुळे त्यांनी कुठे त्याची पूजा वाघ्रोदेवाच्या पाषाणी मूर्तीत अथवा प्रतीकात्मक दगडाच्या रूपात केली.
गोव्यात शेकडो ठिकाणी ग्रामदेवाच्या पंचायतनात वाघ्रो देव आहे. वर्षातून ठरावीक तिथीला त्याचे पूजन केले जाते तर कुठे सामूहिक जेवणाचा कार्यक्रम होतो.
गोवा त्याचप्रमाणे गोव्याशी संलग्न कर्नाटक आणि महाराष्ट्रात ज्या वाघ्रो देवाच्या मूर्ती आढळलेल्या आहेत, त्यात कालेतल्या वागऱ्यागाळ येथील मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण अशीच आहे. पूर्वी ही मूर्ती वृक्षवेलींनी समृद्ध असलेल्या देवराईत स्थापन केली होती.
परंतु कालांतराने शेती आणि लोकवस्तीच्या विस्तारासाठी जेव्हा जंगलतोड करण्यात आली तेव्हा ही मूर्ती एका पक्क्या बांधकामाने युक्त स्थळी प्रतिष्ठापित केलेली आहे. वाघाच्या मूर्तीच्या पुढच्या दोन पायांमध्ये रानडुक्कर, तर मध्ये छोटेखानी आसनस्थ सिंह मूर्ती रूपात दाखवलेला आहे.
भारतात गुजरातातल्या गीर जंगलातला राजा गणलेला सिंह या मूर्तीत छोटा चित्रित करून त्याला गौण स्थान दिलेले आहे. रानडुक्कराचा सहजपणे फडशा वाघ पाडत असतो. त्यामुळे वागऱ्या गाळ येथील वाघाची सिंह आणि रानडुक्करासह असलेली मूर्ती पुरातत्त्व शास्त्रज्ञासाठी संशोधनाचा विषय ठरलेली आहे.
एकेकाळी कालेतल्या जंगलाचा खराखुरा सम्राट असणाऱ्या पट्टेरी वाघाचे स्थान आणि महत्त्व इथल्या समाजाने ओळखून त्याची अनोख्या मूर्ती रूपात स्थापना केली असावी. काले नदी किनारी असलेल्या मनुष्यविरहित जंगलात शिरसोडे येथे
वाघाच्या अंगीचे एकंदर शौर्य, निर्भिडता आणि चापल्य दर्शवणारी एक मूर्ती तेथे स्थापन केलेली आहे. परंतु असे असले तरी काले वागऱ्यागाळ येथील मूर्तीचे वेगळेपण मात्र नजरेत भरणारे आहे.
आज देवराईचे अस्तित्व दुर्बल करण्यात आले असले, तरी हा वाघ्रोदेव इथल्या कष्टकरी, आदिवासी आणि अन्य समाजांसाठी आणीबाणीच्या प्रसंगी कृपाशीर्वाद देणारा आणि नवसाला पावणारा लोकदेव ठरलेला आहे. त्याचे भजन, पूजन करण्यात त्यांनी धन्यता मानलेली आहे.
गोव्यातल्या जंगलनिवासी जातीजमातींना एकेकाळी पट्टेरी वाघ हा धैर्य, शक्ती आणि साहस यांचे प्रतीक ठरला होता आणि त्यामुळे वाघ्रो, वाघ्रेश्वर, वाघदेव या नावांनी त्याचे मूर्तीच्या रूपात पूजन करणे, रानातल्या सजीव प्राणी म्हणून त्याचे संरक्षण करणे म्हणजे जंगलाचे संरक्षण करणे असे वाटायचे.
काले येथील वागऱ्यागाळ ही देवराई आणि त्याच्याशी संलग्न संरक्षित जंगल त्याचा नैसर्गिक अधिवास म्हणून सुरक्षित ठेवला होता. त्यामुळे दुधसागर (खांडेपार) नदीला सर्वाधिक बारमाही पाण्याचा पुरवठा करून तिला प्रवाहित ठेवण्यात काले नदीचे महत्त्वाचे योगदान होते आणि ते काम आजही कालेचा हा नैसर्गिक प्रवाह करत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.