Goa Tiger Reserve: गोव्यात 'डरकाळी' घुमणार की नाही? व्याघ्र प्रकल्पाबाबत केंद्रीय समितीने जाणून घेतले संबंधितांचे म्हणणे

Goa Tiger Reserve Project: समितीसमोर गोवा फाऊंडेशनचे संचालक क्लॉड आल्वारिस आणि पर्यावरण अभ्यासक राजेंद्र केरकर आदींनी व्याघ्र प्रकल्प का व्हावा, याची जोरदार मांडणी केली.
International Tiger Day
World Tiger DayDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: म्हादई अभयारण्य, भगवान महावीर अभयारण्य, भगवान महावीर राष्ट्रीय उद्यान, नेत्रावळी अभयारण्य आणि खोतिगाव अभयारण्य असा सलग प्रदेश व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित न करण्यासाठी वेळकाढूपणा करण्याच्या राज्य सरकारच्या प्रयत्नांना सुरुंग लागला. सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार केंद्रीय सक्षम समितीने संबंधितांचे म्हणणे जाणून घेतले, तर उद्या प्रत्यक्षात पाहणी केली जाणार आहे. त्यामुळे हा विषय आता ऐरणीवर आला आहे.

आज या समितीसमोर गोवा फाऊंडेशनचे संचालक क्लॉड आल्वारिस आणि पर्यावरण अभ्यासक राजेंद्र केरकर आदींनी व्याघ्र प्रकल्प का व्हावा, याची जोरदार मांडणी केली. व्याघ्र प्रकल्प फक्त गोव्यात मर्यादित नसून कर्नाटक आणि महाराष्ट्रातील संरक्षित क्षेत्रांना जोडून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाशी एकत्रित होऊ शकतो. त्यामुळे प्रकल्पाचा आकार किंवा लोकसंख्या विस्थापनाचे आकडे हे अतिशयोक्तीपूर्ण असल्याची टीका करण्यात आली.

२०१८ पर्यंत अंतिम झालेल्या वन खात्याच्या प्रस्तावाचा दाखला देत सर्व प्रमुख वस्ती प्रकल्पाच्या सीमारेषेबाहेर ठेवल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. व्याघ्र प्रकल्प अधिसूचित झाल्यास निधी, पुनर्वसन आणि संवर्धनासाठी मदत मिळू शकते.

उलट अधिसूचना न झाल्यास गोव्याची संरक्षित क्षेत्रे भविष्यात आणखी धोक्यात येऊ शकतात, हाही मुद्दा त्यांनी मांडला. या समितीत सी. पी. गोयल, डॉ. जे. आर. भट्ट आणि सुनील लिमये यांचा समावेश आहे. त्यापैकी गोयल आणि लिमये यांनी सचिवालयात संबंधितांचे म्हणणे जाणून घेतले. दुपारी साडेतीन वाजता प्रत्यक्षात या सुनावणीस सुरुवात झाली.

या कारणास्तव प्रकल्पाला आक्षेप

१.आमदार तथा मंत्र्यांनी जनभावना म्हणून या प्रकल्पाला विरोध केला.

२.व्याघ्र प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात विस्थापन करावे लागेल.

३.दैनंदिन कामावर निर्बंध येतील, जंगलावर उपजीविका अवलंबून असलेल्यांना जगणे कठीण होईल

४.गावच्या गाव स्थलांतरित करणे शक्य होणार नाही.

५.एका बाजूला सीआरझेड, तर दुसऱ्या बाजूला अभयारण्ये अशा कचाट्यात सापडलेल्यांना व्याघ्र प्रकल्प हा संकट ठरू शकतो, असे मुद्दे लोकप्रतिनिधींनी समितीसमोर मांडले.

International Tiger Day
Tiger Reserve Goa: समिती करणार व्याघ्र प्रकल्प क्षेत्र पाहणी, गुरूवारी सचिवालयात होणार संबंधित घटकांशी चर्चा

लोकप्रतिनिधींकडून शक्तिप्रदर्शन

खुद्द वनमंत्री विश्वजीत राणे यांनी वाळपईचे आमदार या नात्याने समितीसमोर म्हणणे मांडले.

त्यांच्या समर्थनार्थ सत्तरीतून अनेकजण सचिवालयात आले होते.

त्यांची संख्या इतकी होती, की तळमजल्यावरील परिषद सभागृहात त्यांची बैठक व्यवस्था करावी लागली.

सावर्डेचे आमदार तथा सभापती गणेश गावकर, समाजकल्याणमंत्री तथा सांगेचे आमदार सुभाष फळदेसाई, पर्येच्या आमदार डॉ. दिव्या राणे यांनीही जनतेचे म्हणणे समितीसमोर मांडले.

International Tiger Day
Goa Tiger Reserve: 1 लाख विस्थापनाचा आकडा सिद्ध करणारी फाईलच गायब! वाघांचे आणि स्थानिकांचे भविष्य..

पुढील महिन्यात होणार शिक्कामोर्तब

समितीला आपला सविस्तर अहवाल सर्वोच्च न्यायालयात ऑक्टोबर अखेरीस सादर करायचा असून, सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण १२ नोव्हेंबर २०२५ रोजी ‘हाय ऑन बोर्ड’ म्हणून निश्चित केले आहे. त्यामुळे पुढील महिन्यात व्याघ्र प्रकल्प होणार की नाही, हे सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यातून स्पष्ट होईल असे मानले जात आहे.

राज्य सरकारच्या म्हणण्यानुसार, १,२६४ घरे अभयारण्ये व संरक्षित क्षेत्रात आहेत. प्रत्येकी पाचजण जमेस धरले तरी या घरांत ६,३२० जण होतात. यामुळे १ लाख लोक विस्थापित होतील, ही सरकारची भीती निराधार आहे. गावे अभयारण्यात आहेत; पण वस्ती अभयारण्यात नाही. बफर झोनमध्ये वस्ती व शेती करता येते. कोअर झोनमध्ये केवळ १५० जणच आहेत.

क्लॉड आल्वारिस, संचालक, गोवा फाऊंडेशन.

सत्तरीच्या हितासाठी विषय मांडला आहे. लेखी निवेदन सादर केले. गावच्या लोकांच्या भावना समितीपर्यंत पोचवल्या आहेत. सत्तरीच्या लोकांना न्याय मिळेल, याची खात्री आहे. जनतेला वाटणारी भीती लेखी स्वरूपात मांडली आहे. आत काय चर्चा झाली ते बाहेर सांगता येणार नाही. वाळपईचा आमदार म्हणून जनतेचे प्रतिनिधित्व करत भूमिका मांडली आहे. आमचा सर्वोच्च न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे.

विश्वजीत राणे, वनमंत्री.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com