
Tiger Conservation Goa:गोव्यातील वाघांच्या अस्तित्वाचा विचार करता असे दिसते की आपल्याला वाघ नको आहेत. वाघ हे जबरदस्त राजकारणाचा भाग बनले आहेत. गोव्यात वाघांचा इतिहास खूप जुना आहे. गोव्यातील वाघ हे 'पर्यटक' आहेत असे जरी म्हटले गेले तरी वाघांचे गोव्यातील अस्तित्व दर्शवणारी अनेक चिन्हे आपल्याकडे आहेत.
वाघुर्मेसारख्या गावात वाघ देवासारखा पुजला जातो. डिचोली येथे 'वाघाची पेर' नावाचा खाणभाग आहे. गोव्यात अशाप्रकारची सार्वत्रिक मान्यता असलेल्या वाघांचे जीवन अलीकडच्या काळात मात्र धोक्यात आले आहे. गोव्यातील सत्तरी भागात विष घालून ५ वाघांची हत्या केली गेली, एका वाघाची शिकार केली गेली. ही आजची उदाहरणे आम्हाला सांगतात की गोव्यात आम्हाला वाघ नकोसे झाले आहेत. सत्तरीचे जंगल हे जंगल राहू नये यासाठी काहींचे प्रयत्न चालले आहेत.
अन्नसाखळीत वाघाचे स्थान सर्वात उंचावर असते. दहा दशलक्ष वर्षांपूर्वी, मानवाची उत्पत्ती होण्यापूर्वी, उत्पन्न झालेल्या या प्राण्याच्या मुळावर आज मानव उठला आहे. आज गोव्यातील वाघांची संख्या पाच-सहा अशी दाखवली जात असली तरी ती त्यापेक्षाही अधिक असू शकते. १९६९ यावर्षी मी स्वतः वाघाची शिकार केलेला एक फोटो पाहिला होता. माझ्या शेजाऱ्यानेच ही शिकार केली होती.
आमच्या देशात सुमारे २५०० वाघ आहेत. १९७५ पासून वाघाला राष्ट्रीय प्राणी हा सन्मान दिला गेला आहे. सर्वात जाचणारी गोष्ट म्हणजे सबंध भारतात ज्याला राष्ट्रीय प्राणी म्हणून गौरवले जाते, त्याला गोव्यात मात्र किंमत दिली जात नाही. केरळमध्ये एखादे हत्तीचे पिल्लू आकस्मिक मेले तर आपले पंतप्रधान त्याबद्दल शोक व्यक्त करतात मात्र गोव्यात पाच वाघ विष घालून मारले गेल्यानंतरही ‘व्याघ्र संरक्षण प्रकल्पा’चे अध्यक्ष असलेले पंतप्रधान एक शब्दही उच्चारत नाहीत. ही वाघांचीच नव्हे तर आपलीही शोकांतिका आहे.
जंगलात जोवर वाघ आहे तोवर तेथील अन्नसाखळी तगून राहील, जंगलातील प्राणी टिकून राहतील आणि त्यातून जंगल अधिक समृद्ध होईल. जंगलातील पाण्याचे स्रोत वाघांमुळे टिकून राहतात, जंगलातील महाकाय वृक्षांची तोड वाघांच्या भीतीनेच माणूस करायला जात नाही. प्रत्येक वाघाचा संचार ४० चौरस किलोमीटर क्षेत्रात असतो. वाघाची डरकाळी आपल्याला तीन किलोमीटर दूर अंतरापर्यंत ऐकू येते. लामगावमध्ये वाघाने फोडलेली डरकाळी मी माझ्या लहानपणी डिचोली येथील माझ्या घरी ऐकली आहे.
व्याघ्र प्रकल्पाबद्दल सरकारी पातळीवर आपल्या मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेण्याची गरज आहे. त्याला चालना देण्याची आणि तो राबवण्याची तयारी यांनी केली पाहिजे. वाघ वाचले तर जंगले सुरक्षित राहतील, जंगले सुरक्षित झाली तर निसर्ग सुरक्षित होईल. आपल्या निसर्ग पर्यटनाला वाव मिळवून देणारे हे पाऊल असेल. व्याघ्र संवर्धनासाठी सरकारने कठोर पाऊल उचलण्याची आज गरज आहे. गोव्याच्या जनतेची भूमिकाही या बाबतीत ठाम असली पाहिजे, जी दुर्दैवाने आज नाही.
रमेश गावस, निसर्गमित्र
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.