Bhagat Singh birth anniversary Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Bhagat Singh Jayanti: ..ध्येयप्राप्तीसाठी घरदार सोडले! ऐन तारुण्यात प्रेयसी, पैसाअडका, स्वप्ने पाहिलीच नाहीत; गुरुदेव भगतसिंग

Bhagat Singh birth anniversary: भारतीय परंपरेमध्ये गुरुस्मरणाला खूप महत्त्व आहे. इंग्रजी कॅलेंडर प्रमाणे २३ मार्च हा माझ्या गुरुदेवांचा महानिर्वाणाचा दिवस. त्यांनी या दिवशी हसत मुखाने इहलोकीचा त्याग केला.

गोमन्तक डिजिटल टीम

रूपेश पाटकर

भारतीय परंपरेमध्ये गुरुस्मरणाला खूप महत्त्व आहे. इंग्रजी कॅलेंडर प्रमाणे २३ मार्च हा माझ्या गुरुदेवांचा महानिर्वाणाचा दिवस. त्यांनी या दिवशी हसत मुखाने इहलोकीचा त्याग केला. भारतीय परंपरेत गुरूंच्या स्मरणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. का करायचे गुरूंचे स्मरण? ते प्रसन्न होऊन मनोकामना पूर्ण करतील म्हणून करायचे का?

कृतज्ञतेने त्यांचे उपकार मानायचे म्हणून करायचे का? की त्यांच्या आत्म्याला शांती लाभो यासाठी त्यांचे श्राद्ध म्हणून करायचे? गुरूंचे स्मरण यापेक्षा खूप वेगळ्या कारणासाठी करायचे असते. गुरूंनी आपल्याला जीवनाकडे बघायची वेगळी दृष्टी दिलेली असते.

त्यांनी स्वतःच्या जीवनात या जीवनदृष्टीचा उपयोग करून मार्गक्रमण केलेले असते. त्यांचे स्मरण करून आपल्या मनात ही जीवनदृष्टी दृढ करायची असते. गुरूंनी त्यांच्या जीवनात कशी साधना केली, हे आठवून त्यांचे अनुकरण करायचे असते.

जीवनामध्ये गुरूंकडून अनुग्रह घेतला, साधना सुरू केली आणि आपण सहज जीवनमुक्त झालो, असे होत नाही. जीवनात अनेक प्रलोभने असतात, ध्येयच्युत करणारे मोह असतात, अडचणी असतात, विवंचना असतात.

साधनेच्या मार्गावरील या अडचणी मनाला चंचल बनवतात. या चंचल मनाला पुन्हा पुन्हा मार्गावर आणण्यासाठी आदर्शांचे स्मरण करणे गरजेचे असते. मनाकडून अभ्यास करवून घ्यावा लागतो. आध्यात्मिक वाटचालीत शॉर्टकट नसतो. तिथे नवसाची लालूच उपयोगी पडत नाही. तिथे फेवरेटीज्म नसतो.

मी आध्यात्मिक वाटचाल असा शब्द वापरलाय खरा, पण अनेकजण त्याचा गूढवादी अर्थ, जादूई अर्थ गृहीत धरतात. पण मला अपेक्षित असलेला अर्थ वेगळा आहे. मला जी काही अध्यात्माची व्याख्या माझ्या आध्यात्मिक गुरूंकडून समजली, त्यानुसार सर्वव्यापित्वाची जाणीव म्हणजे जीवनमुक्ती. आणि ती साध्य करण्याची वाटचाल म्हणजे आध्यात्मिक साधना!

गुरू तुम्हांला शोधावा लागत नाही, योग्य वेळी तो तुम्हांला स्वतःहून येऊन भेटतो. पण ती योग्य वेळ म्हणजे काही ठरावीक मुहूर्त किंवा जादूई घटना असे मानण्याचे कारण नाही. उलट तुमचा मानसिक विकास होत असताना आतापर्यंत तुमच्या अवतीभवती असलेलाच गुरू तुम्हांला अनुग्रह देतो.

माझ्या गुरुदेवांना मी लहानपणापासून ओळखत होतो. त्यांच्याविषयी मी वाचलेदेखील होते. पण त्यांचा अनुग्रह मात्र मला वयाच्या अठ्ठाविसाव्या वर्षी झाला. आणि तोदेखील ग्रंथ साक्षात्काराच्या रूपाने! या साक्षात्कारानंतर मी हादरून गेलो, अस्वस्थ झालो. माझ्या सर्व पूर्वकल्पनांना, गृहीतकांना, विचारांना माझ्या गुरुदेवांनी मुळापासून हादरविले.

त्यांनी मला ’सोहं’चीच दीक्षा दिली, पण त्यांनी सांगितलेला ’सः’चा अर्थ मात्र मला ठाऊक असलेल्या अर्थाच्या विरुद्ध होता. ते ’सः’ला ’चिन्मय’ न मानता ’जड’ मानत होते. हेच माझ्या तोपर्यंतच्या विचारांना छेद देणारे होते.

परंतु हे शिकवणाऱ्या माझ्या गुरूंची अवस्था मात्र ’स्थितप्रज्ञ’ होती. भगवद्गीतेतील दुसऱ्या अध्यायात जी स्थितप्रज्ञाची लक्षणे वर्णन केली आहेत,

नसे दुःखात उद्वेग सुखाची लालसा नसे।

नसे तृष्णा भय क्रोध तो स्थितप्रज्ञ संयमी।्। त्याप्रमाणे होती.

माझ्या गुरुदेवांचे त्यांच्या तेविसाव्या वर्षीच महानिर्वाण झाले. त्यांचा मृत्यू त्यांना कित्येक दिवस आधी ठाऊक झाला होता. पण त्यांच्या मनाची स्थिती ’निर्वाती ठेविला दीप तेवतो एकसारखा’ अशी होती. मृत्यू समोर दिसत असताना अजिबात विचलित न होता ते आपल्या सहकाऱ्यांना मार्गदर्शन करत होते.

त्यांना त्यांचा मृत्यू चुकवता आला असता, परंतु त्यांनी तो चुकवला नाही. त्यांचा कोवळ्या वयातील मृत्यू टळावा म्हणून त्यांचे वडील याचना करू लागले तर त्यांनी ते स्पष्टपणे नाकारले.

मृत्यूच्या दिवशी तर ते शांतपणे वाचन करत होते. ते दृश्य म्हणजे श्रीकृष्णाने गीतेत म्हटल्याप्रमाणे पुढील श्लोकाची मूर्त प्रचिती होती,

’करावे मिळवावेसे नसे काही जरी मज्।

तिन्ही लोकी तरी पार्था कर्मी मी वागतो चि की।्।

माझे गुरूदेव तरुण होते. जेमतेम तेवीस वर्षांचे आयुष्य जगले, पण ते जन्मतःच जीवनमुक्त होते असे मात्र मी म्हणणार नाही. त्यांचा जन्म समृद्ध कुटुंबात झाला.

त्याग, बलिदानाची परंपरा असलेले त्यांचे कुटुंब होते. असे सांगतात की त्यांचा जन्म झाला तेव्हा त्याकाळच्या राजवटीने त्यांच्या काकांना व वडिलांना तुरुंगात डांबले होते. कशासाठी? तर त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला होता म्हणून.

माझ्या गुरुदेवांना मनोनिग्रह करण्यासाठी वेगळे प्रयत्न करावे लागले नसल्याचे दिसते. समृद्ध घर, रुबाबदार व्यक्तिमत्त्व लाभलेल्या आणि ऐन यौवनात असलेल्या वयात प्रेयसी, पैसाअडका, धंदा-व्यवसाय यांची स्वप्ने त्यांनी पाहिलीच नाहीत.

उलट ध्येयप्राप्तीसाठी त्यांनी घरदार सोडले, आणि तेदेखील अगदी सहज. घर सोडल्यानंतर सोन्याचा चमचा तोंडात धरून जन्मलेल्या माझ्या गुरुदेवांचे आयुष्य प्रचंड खडतर बनले, पण त्यांच्या आज उपलब्ध असलेल्या साहित्यात त्याची वेदना, खेद किंवा खंत कुठेच डोकावत नाही.

मग कशी साधली असेल त्यांनी ही शांतीची स्थिती? मला वाटते की सतत दुसऱ्यांचा, सतत रंजल्यागांजल्यांचा विचार केल्यामुळे त्यांच्या मनातून व्यक्तिगत दुःख कायमचे नाहीसे झाले असावे. त्यांना मी आणि माझे राहिलेच नाही.

रामकृष्ण परमहंस म्हणतात, ’मी व माझे यांचे भले व्हावे यासाठी प्रयत्न करणे ही ’माया’ आणि ज्यांचा आपल्याशी संबंध नाही अशांच्या भल्यासाठी प्रयत्न करणे ही ’दया’. माया माणसाला बंधनात अडकवते तर दया माणसाला मुक्तीपथावर नेते!’ संत तुकाराम देखील म्हणतात, ’जे का रंजले गांजले। त्यासि म्हणे जो आपुले। तोचि साधू ओळखावा। देव तेथेचि जाणावा।्।’

अजूनपर्यंत मी तुम्हांला माझ्या गुरुदेवांचे नाव सांगितले नाही. मी तुम्हांला त्यांचे नाव सांगितले तर मी त्यांना माझे आध्यात्मिक गुरू म्हटले यावर विश्वास बसणार नाही. कारण ते आध्यात्मिक गुरू म्हणून प्रसिद्ध नव्हतेच मुळी.

तुम्हीही त्यांना ओळखता, पण एक क्रांतिकारक म्हणून. सेंट्रल असेंब्लीत बॉंब फेकणारे आणि सॉन्डर्सचा वध करणारे म्हणून. तुम्ही त्यांच्याकडून देशभक्तीची प्रेरणा घेत असाल. त्यांच्या शौर्याच्या रोमहर्षक कथा वाचून तुमचे रक्त सळसळले असेल.

पण मी त्यांना गुरू म्हणून स्वीकारले, ते त्यांच्या जीवनातील रोमहर्षक प्रसंगांमुळे नव्हे. मी त्यांचा जो गुरू म्हणून स्वीकार केला तो त्यांच्या साहित्याच्या वाचनाने. यालाच मी ’ग्रंथसाक्षात्कार’ म्हणतो. त्यांच्या लेखांनी मला माझी जुनी गृहीतके तपासायला भाग पाडले.

त्यांनी नवसाला पावणाऱा, स्तुतीने खूश होणारा, कठोर न्याय करणारा, मंत्रांनी कामाला लावता येणारा देव नाकारला. जर तुमच्या पूजापाठांनी आणि मंत्रोच्चारांनी देव तुमच्या मनोकामना पूर्ण करत असेल तर तो सर्वशक्तिमान कसा असेल?

देवाची ही संकल्पना कमकुवत मनाचा काल्पनिक आधार आहे असे ते लिहितात. आणि हे त्यांनी केव्हा लिहिले? ते तुरुंगात असताना, त्यांना मृत्युदंडाची शिक्षा जाहीर झाली असताना. थोडा विचार करा, आम्हा सामान्य माणसांना देव सर्वांत तीव्रपणे केव्हा आठवतो?

जेव्हा आम्ही संकटात असतो तेव्हा. आणि भगतसिंग देव केव्हा नाकारत आहेत? जेव्हा त्यांचा मृत्यू निश्चित झालाय, मृत्यूची तारीख ठरली आहे तेव्हा. त्यांना अशावेळेस तीव्रपणे देवाचा धावा करावासा वाटणे स्वाभाविक झाले असते. पण ते तो करत नाहीत. उलट दयेचा अर्ज करू पाहणाऱ्या आपल्या वडिलांना ते खडे बोल सुनावतात.

भगतसिंगांचे असे मृत्यूला सामोरे जाणे प्रत्यक्ष रणभूमीवर आवेशात उडी घेण्यासारखे नाही. हे जपानी पायलटांसारखे हाराकिरी करणे नाही. हा ’स्थिरबुद्धी’ने घेतलेला निर्णय आहे. याचा विचार करता, त्यांच्या उन्नत मानसापुढे मान झुकवल्याशिवाय मला पर्याय नव्हता.

त्यांच्या निबंधात त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले होते. त्यांची उत्तरे माझ्या मनाला देता आली नाहीत. काहीतरी थातूरमातूर उत्तरे देऊन मी त्यांचे मुद्दे कदाचित निकाली काढूही शकलो असतो. पण त्यांच्या ’स्थितप्रज्ञ’ व्यक्तिमत्त्वामुळे मला तसे करण्याचे धाडस झाले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India vs Pakistan: "... अन्यथा टीम इंडिया अडचणीत", अंतिम सामन्यापूर्वी 'लिटील मास्टर' सुनील गावसकरांचा इशारा! 'ही' चूक होता नये

Kodaar IIT Project Cancelled: 'लोकांक आयआयटी नाका, आमका लोकांआड वचपाचे ना', कोडार IIT प्रकल्प अखेर रद्द; मंत्री शिरोडकरांची घोषणा

"गोव्यात Gen Z कोणते कपडे घालतात?" इन्फ्लुएन्सर करिष्मानं सांगितला फॅशन फंडा; सोशल मीडियावर Video Viral

मोबोर किनाऱ्यावर टळली मोठी दुर्घटना! मासेमारी जहाजाचा अपघात; साधनांचा अभाव तरीही वाचले 27 जणांचे प्राण

BCCI New President: बीसीसीआयला मिळाला नवा 'बॉस', मिथुन मन्हास अध्यक्षपदी विराजमान

SCROLL FOR NEXT