

तुम्ही घरबसल्या ऑनलाईन जेवण ऑर्डर करत असाल, तर आता तुमच्या खिशाला थोडी जास्त झळ सोसावी लागणार आहे. आघाडीची फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटो (Zomato) ने आपल्या प्लॅटफॉर्म फीमध्ये प्रति ऑर्डर ₹२.४० ची वाढ केली आहे. कंपनीच्या ॲपवर उपलब्ध माहितीनुसार, जीएसटीपूर्व प्लॅटफॉर्म शुल्क आता ₹१२.५० वरून ₹१४.९० प्रति ऑर्डर करण्यात आले आहे. झोमॅटोची ही नवी दरवाढ आज, २० मार्च २०२६ पासूनच लागू झाली आहे.
स्विगीकडूनही दरवाढीचा अवलंब झोमॅटोच्या पावलावर पाऊल टाकत तिची प्रतिस्पर्धी कंपनी स्विगीनेही (Swiggy) आपले दर वाढवले आहेत. स्विगी आता करांसह प्रति ऑर्डर ₹१४.९९ प्लॅटफॉर्म फी वसूल करत आहे. साधारणपणे या दोन्ही कंपन्या एकमेकांच्या धोरणांचे अनुकरण करतात आणि एकाने शुल्क वाढवले की दुसरी कंपनीही तात्काळ दरवाढ करते, असे पुन्हा एकदा दिसून आले आहे. यापूर्वी सप्टेंबर २०२५ मध्ये या कंपन्यांनी शुल्कात वाढ केली होती.
इंधन आणि सिलिंडरच्या टंचाईचा परिणाम झोमॅटोने ही दरवाढ अशा वेळी केली आहे जेव्हा मध्यपूर्वेतील तणावामुळे जागतिक स्तरावर परिस्थिती अस्थिर आहे. देशात व्यावसायिक एलपीजी (LPG) सिलिंडरचा पुरवठा विस्कळीत झाल्याने हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सवर मोठा परिणाम झाला आहे. तसेच, वाढत्या इंधन खर्चामुळे डिलिव्हरी पार्टनर्सनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे. या सर्व कारणांमुळे कंपन्यांनी आपला खर्च भरून काढण्यासाठी ग्राहकांवर अतिरिक्त शुल्काचा भार टाकला आहे.
रॅपिडोचे 'Ownly' मैदानात एकीकडे झोमॅटो आणि स्विगी दर वाढवत असताना, स्टार्टअप 'रॅपिडो'ने (Rapido) बेंगळुरूमध्ये आपली नवीन फूड डिलिव्हरी सेवा 'Ownly' लाँच केली आहे. रॅपिडोचा दावा आहे की, ते ग्राहकांकडून किंवा रेस्टॉरंट्सकडून डिलिव्हरी चार्जेसव्यतिरिक्त कोणतेही अतिरिक्त प्लॅटफॉर्म शुल्क घेणार नाहीत. यामुळे येत्या काळात फूड डिलिव्हरी मार्केटमध्ये मोठी स्पर्धा पाहायला मिळू शकते.
अतिरिक्त शुल्कांचा भडिमार केवळ प्लॅटफॉर्म फीच नाही, तर क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म्सवर अनेक प्रकारचे छुपे शुल्क आकारले जातात. यात नाजूक वस्तूंच्या सुरक्षिततेसाठी 'हँडलिंग फी', पावसाळ्यात डिलिव्हरी देण्यासाठी 'रेन फी' आणि जास्त मागणीच्या वेळी 'सर्ज फी'चा समावेश असतो. या सर्व शुल्कांमुळे ग्राहकांचे एकूण बिल आता पूर्वीपेक्षा १० ते १५ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.