शांता लागू
इंग्रजीतील गॉसिप या शब्दाचे मराठी विविध अर्थ आहेत. गॉसिप हा अनेक शब्दांना कवेत घेणारा शब्द आहे. म्हणजे तिथे मनमोकळ्या गप्पांपेक्षा बाकी सर्व काही गोष्टी घडत असतात. मुख्य अर्थ गप्पाटप्पा..गपशप, चकाट्या, इतरांच्या खाजगी आयुष्याबद्दल बोलणे, अफवा पसरवणे, कुचाळक्या करणे, आणखी बरंच काही!
त्याचं असं झालं.. परवाच एक परदेशातील बातमी वाचली. एक ज्येष्ठ बाई हुशारीने चुगली करण्याचे आपले कौशल्य पणाला लावून जवळ जवळ गुप्तहेर सदृश काम करते. ती बाई या धंद्यावर लाखो रुपये कमवते. तिचे बैठे घर आहे. तिथे पुढे मोकळे अंगण आहे, त्या अंगणात ती दिवसभर खुर्ची टाकून बसलेली असते. ड्युटीवर राखणीला बसल्यासारखी घरावरून येणाऱ्या जाणाऱ्या माणसांना हटकते. तिथे बसून गावभरच्या सगळ्या बातम्या ती काढून घेते. कधी प्रत्यक्ष घरोघरी जाऊन माणसांना गोडी गुलाबीने घोळात घेऊन तिला आपले उद्दिष्ट साध्य करावे लागते. बोलता बोलता गुपिते काढून घेण्यात निष्णात आहे.
हा तिचा स्वभाव समजल्यानंतर काही माणसे तिच्यापासून सावधपणे दूर पळू पाहतात. कोण किती वाजता येतो? किती वाजता जातो? गावात कुणाच्या काय भानगडी आहेत? कोण कोणाच्या घराबाहेर उभे राहून इशारे करतो? घरात काय काय चालले आहे? त्याची बित्तंबातमी आपल्याजवळ गोळा करून ठेवते. मग त्या व्यक्तीला हिंट द्यायची की.. ‘तुझं काय चाललंय ते मला माहीत आहे!’. असा बॉम्ब टाकला की.. त्या व्यक्तीवर प्रचंड दडपण येते. जी गोष्ट जगापासून लपवायला हवी तीच या गावघंटा बाईला माहीत आहे, असे कळले की समोरच्याचा जीव धाकधूक होतो. बाई याच गोष्टीचा फायदा उठवते. एक तर तो माणूस आतून घाबरलेला असतो. ‘बाई कुठे सांगू नका हो! ‘अजून घरी कोणाला माहीत नाही.’
तो गयावया करतो. तो काय हवे ते द्यायला तयार होतो. आणि हीच संधी साधून या बाईसाहेब स्वतःचे तोंड बंद ठेवण्याबद्दल भरपूर पैसे मागतात. गरजू माणूस होकार देतोच. खरं तर हा ब्लॅकमेलिंगचाच प्रकार असला तरी तो स्वीकारून, या व्यवहाराची वाच्यता तो कुठेच करीत नाही. ‘अडला हरी गाढवाचे पाय धरी!’, अशी अवस्था! आतली बातमी काढण्यात तिचे कौशल्य असल्यामुळे तिच्या या कलेचा फायदा गावातील चलाख माणसे तिचा गुप्तहेरा सारखा उपयोग करतात. चलाख लोकांकडून तिला बितंबातमी काढण्याच्या सुपार्या मिळतात. त्यामुळे ‘चुगली करणे’ हा तिचा उदरनिर्वाहाचा धंदा होऊन बसला आहे. ‘इधरका माल उधर, उधरका माल इधर!’ सहज गप्पा मारता मारता हेरगिरी जिंदाबाद!इतकं सोपं आहे ते! अशाच प्रकारची कितीतरी माणसे आपल्याला पण सभोवताली भेटतातच की!
अशा वृत्तीतूनच गॉसिप्सचा जन्म होतो. इंग्रजीतील गॉसिप या शब्दाचे मराठी विविध अर्थ आहेत. गॉसिप हा अनेक शब्दांना कवेत घेणारा शब्द आहे. म्हणजे तिथे मनमोकळ्या गप्पांपेक्षा बाकी सर्व काही गोष्टी घडत असतात. मुख्य अर्थ गप्पाटप्पा..गपशप, चकाट्या, इतरांच्या खाजगी आयुष्याबद्दल बोलणे, अफवा पसरवणे, कुचाळक्या करणे, दुसऱ्याचे कान भरणे, कानगोष्टी करणे, कंड्या पिकवणे, दोन नात्यात.. कुटुंबात.. समाजात दुरावा निर्माण करणे मुख्यत्वे करून चुगल्या करणे या गोष्टी आवडीने केल्या जातात. चुगलखोर माणसांची लक्षणे म्हणजे हे लोक तुमच्यासमोर खूप प्रेमाने बोलतात पण तुम्ही बाजूला होताच इतरांजवळ तुमची निंदा करतात. ग्रुप मध्ये गैरहजर असलेल्या सदस्याची निंदा हा आवडता छंदच जणू !
हमखास तुम्ही विश्वासाने सांगितलेली गोष्ट ते कधीही स्वतः जवळ गुप्त ठेवू शकत नाहीत. तिखट मीठ लावून दुसऱ्याला सांगतात. यांना इतरांच्या खाजगी गोष्टींमध्ये खूप जास्त रस असतो इतरांच्या आयुष्यात काय चाललंय हे जाणून घ्यायची त्यांना नेहमीच उत्सुकता असते. गैरसमज निर्माण करून भांडणे लावण्यात यांना खूपच आनंद मिळतो अशा लोकांना इतरांच्या सुखाचा, प्रगतीचा नेहमीच मत्सर वाटत असतो. लावालावी, एका कानाने ऐकायचं, ते मेंदूत घोळवायचं, मीठ मिरची, मसाला टाकून वर झणझणीत फोडणी द्यायची. एवढ्या प्रोसेस नंतर बेमालूमपणे गुपितांची अफवांची डिलिव्हरी करियची. मग मात्र छे: छे:!तो मी नव्हेच! संपला विषय! मग दुसऱ्याची मज्जा बघत राहायचे.
गॉसिप किंवा कुचाळकी करण्याची काही विशिष्ट ठिकाणे असतात.प्रामुख्याने सार्वजनिक आणि व्यावसायिक ठिकाणे, हेअर सलून किंवा ब्युटी पार्लर. काही खास ठिकाणे!लोक तासनतास इथे बसतात. स्थानिक घडामोडी आणि एकमेकांच्या वैयक्तिक आयुष्यावर गप्पा होतात. चहाची टपरी किंवा कॅफे.. खेड्यातील मोठ्या वृक्षा भोवती बांधलेले पार, सोसायटीचे कट्टे, बाकडी, गच्ची, संध्याकाळच्या वेळी इमारती खाली किंवा पार्कमध्ये ज्येष्ठ नागरिक, महिला किंवा तरुण एकत्र जमून परिसरातील लोकांबद्दल नेमाने गप्पावजा चर्चासत्रे चालवतात. कुचाळक्या करतात. भाजी बाजार किंवा किराणा दुकानात ओळखीचा माणूस दिसल्याबरोबर तेथेच उभे राहून गॉसिप सुरू होते. विशेषतः सोशल मीडिया आणि चॅट ग्रुपस् यांच्या बद्दल तर काही न बोललेलं बरं! तो तर कुचाळक्यांचा बाजारच असतो.
सुरुवातीला गप्पागोष्टी म्हणून सुरू झालेल्या वाचिक देवघेवीची गाडी कधी रुळावरून घसरून गॉसिप्स च्या अवस्थेत जाऊन थडकते ते बोलणाऱ्यांना आणि ऐकणाऱ्यांना समजतही नाही. बोलण्याचा ओघात इतके वाहत जातात की आपण कुठे बसलो आहोत, कसे , कोणाबद्दल कोणाशी बोलतो आहे याचे भान उरत नाही. मग गॉसिपची एक्सप्रेस सुसाट धावू लागते. इकडच्या गोष्टी तिकडे करण्यात आणि गावभर बोभाटा करण्यात ई- मेल पेक्षा फिमेल पुढे असतात. असे म्हणतात ते काही खोटे नाही. अयोग्य लोक आपली निंदा करतात. तेव्हा निराश होऊ नये.
हे सांगताना संतश्रेष्ठ तुकोबाराय म्हणतात.. ‘ढेकणाशी बाज घर.. उतार चढ केव्हढे?’ ..म्हणजे पलंग हेच घर असलेल्या ढेकणाला पलंगच किल्ल्यासारखा वाटतो आणि तो त्यावरच उतार चढ करण्यात व्यस्त असतो. तशीच ढेकणाप्रमाणे ही रिकामटेकडी मंडळी असतात. म्हणून गॉसिप्स, निंदा कधी मनाला लावून घेऊ नयेत. हेच खरे! कारण ती त्यांची स्वभाव प्रवृत्ती आहे. आपल्या पाठीमागे लोक बोलतात कारण आपण त्यांच्या पुढे चालत असतो. "चहाडी करणे दुसऱ्याची गुपिते किंवा खाजगी गोष्टी तिसऱ्या जवळ सांगणे इधर का माल उधरच! चुगली वगैरे.. ही सगळी बिनकामाच्या खलप्रवृत्तीची लक्षणे आहेत. त्यात आपल्यासारख्या समोरच्या बेसावध सज्जन सावजाची जवळजवळ शिकारच होते.
मनस्ताप,मानसिक खच्चीकरण, चारित्र्य हनन , नात्यांमध्ये दरी,आनंदहरण इत्यादि स्वरुपात आयुष्यभराचे नुकसान होते. यावर एक छान संस्कृत श्लोक आहे . त्यात चुगली करणाऱ्या माणसाची तुलना डासाशी केली आहे डास, गांधीलमाशी आधी कानाशी गुणगुण करतात. घोंगावतात, मागेपुढे करतात. आणि नंतर दंश करतात ,चावा घेतात. ‘न खलु परिहर्तुं शक्यते पिशुनोsयं, सततमपि समीपे य: सदा दोषदर्शी II श्रवणकठीन वाक्यं कर्णमुले जपित्वा, दशति नृपमकांण्डे मक्षिकावत् खलस्तु II’ याचा मराठी अर्थ असा.. पिशुन: अयं म्हणजे चुगलखोर दुष्ट माणसाला टाळणे कठीण असते. कारण तो नेहमी जवळ राहून फक्त दोष शोधत असतो. डासाप्रमाणे तो आधी कानाजवळ येऊन कडू, खोटे, नाटकी गोड शब्द वगैरे ची भूणभूण करतो. बोलतो .(कानजप) आणि अचानक माणसाला किंवा राजाला दंश करतो, चावतो. म्हणजेच त्याची हानी आणि त्रास करतो. इंगा दाखवतो. खरंतर असल्या मच्छर आणि चावऱ्या माशी सारख्या घातक रिकामटेकड्या माणसांपासून चार हात दूर राहणेच श्रेयस्कर !
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.