Indian Super League: सामना सुरू होताच एफसी गोवाचा धमाका! नेमिलच्या 34व्या सेकंदातील गोलने नॉर्थईस्टला नमवले; 1-0 ने विजय

FC Goa vs NorthEast United: एफसी गोवाचा हा पाच सामन्यांतील दुसरा विजय असून त्यांचे आठ गुण झाले आहेत.
FC Goa vs NorthEast United
Indian Super LeagueDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: मुहम्मद नेमिल याने सामन्याच्या ३४व्या सेकंदास केलेल्या अफलातून वेगवान गोलमुळे एफसी गोवाचे मुख्य प्रशिक्षक या नात्याने आंजेल बियादेरो यांनी इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत विजयी पदार्पण केले. गुवाहाटी येथे गोव्यातील संघाने नॉर्थईस्ट युनायटेडची अपराजीत मालिका संपुष्टात आणताना १-० असा निसटता; पण महत्त्वपूर्ण विजय संपादन केला.

एफसी गोवाचा हा पाच सामन्यांतील दुसरा विजय असून त्यांचे आठ गुण झाले आहेत. ते सहाव्या क्रमांकावर राहिले आहेत. तीन विजय व दोन बरोबरीनंतर पेद्रो बेन अली यांच्या मार्गदर्शनाखालील नॉर्थईस्ट युनायटेडचे सहा लढतीतून ११ गुण व तिसरा क्रमांक कायम राहिला.

FC Goa vs NorthEast United
Bahujan Representation in Goa: लोकसंख्येत 39 टक्के, पण सत्तेतील वाटा 8 टक्क्यांहून कमी; गोव्याच्या मंत्रिमंडळात बहुजनांची पीछेहाट

मुहम्मद नेमिल याने वेगवान गोल करण्याचा मान मिळविला. त्याने डाव्या पायाने मारलेला ताकदवान फटका गोलनेटमध्ये कधी घुसला, हे नॉर्थईस्ट युनायटेडचा गोलरक्षक गुरमीत सिंग याला समजलेच नाही. त्यानंतर एफसी गोवा संघाला दुखापतीमुळे दोघा प्रमुख खेळाडूंना गमवावे लागले; पण त्यांनी पूर्वार्धातील खेळात आघाडी निसटू दिली नाही. १२व्या मिनिटास उदांता सिंग याचा पाय दुखावला, त्याची जागा कोनसाम आकाश सिंग याने घेतली, तर ३४व्या मिनिटास होर्गे ओर्तिझ जायबंदी झाल्यामुळे त्याला मैदान सोडावे लागले, त्याच्या जागी चिकी मैदानात उतरला.

नॉर्थईस्ट युनायटेडने अधिकांश आक्रमण केले; पण त्यांना नशिबाची अजिबात साथ लाभली नाही. त्यातच एफसी गोवाचा बचाव खूपच दक्ष ठरला. ६२व्या मिनिटास नॉर्थईस्ट युनायटेडच्या इथयान गोन्झालेझ याने जवळपास बरोबरीचा गोल केला होता; पण त्याचा फटका गोलपट्टीला आपटल्यामुळे एफसी गोवाची आघाडी अबाधित राहिली. एफसी गोवाचा पुढील सामना २९ रोजी केरळा ब्लास्टर्सविरुद्ध फातोर्डा येथे खेळला जाईल.

FC Goa vs NorthEast United
Goa Crime: 'अयशस्वी प्रेमसंबंध म्हणजे बलात्कार नव्हे'; लग्नाचे आमिष दाखविल्याच्या आरोपातून युवक निर्दोष

दृष्टिक्षेपात...

एफसी गोवाचा आयएसएल स्पर्धेत नॉर्थईस्ट युनायटेडवर सलग दुसरा विजय

यापूर्वी २४ एप्रिल २०२६ रोजी गुवाहाटी येथे एफसी गोवा २-० फरकाने विजयी

नॉर्थईस्ट युनायटेडविरुद्धच्या २४ सामन्यांत एफसी गोवाची आता ८ सामन्यांत विजयी कामगिरी

मुहम्मद नेमिल याचा यावेळच्या आयएसएल स्पर्धेतील पहिला गोल

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.