

पणजी: गोव्याला आंतरराष्ट्रीय क्रीडा आणि प्रशिक्षण केंद्र म्हणून विकसित करण्याच्या दिशेने राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. युरोपमधील गुंतवणूक आणि उद्योग क्षेत्रातील रिवार समूहाने गोव्यात सुमारे ३ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करून ‘गोवा इंटरनॅशनल स्पोर्ट्स अँड परफॉर्मन्स सिटी’ उभारण्याचा प्रस्ताव दिला आहे.
या प्रकल्पासाठी गोवा गुंतवणूक प्रोत्साहन व सुविधा मंडळ (गोवा आयपीबी) आणि रिवार समूह यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. रिवार समूहाचे संचालक अनिल कुमार रेड्डी आणि गोवा आयपीबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यादव यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या प्रस्तावित गुंतवणुकीत जमिनीचा खर्च समाविष्ट नाही.
या प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे एकाच ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा शिक्षण, विविध खेळांच्या प्रशिक्षण अकादमी, क्रिकेट सुविधा, मोटरस्पोर्ट्स प्रशिक्षण, क्रीडा विज्ञान, खेळाडूंची शारीरिक क्षमता तपासणी, पुनर्वसन आणि आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. केवळ स्पर्धांचे आयोजन करण्यापुरते हे केंद्र मर्यादित न ठेवता खेळाडू घडविणे, त्यांना व्यावसायिक प्रशिक्षण देणे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांसाठी तयार करणे, हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे.
प्रस्तावित क्रीडा शहराच्या केंद्रस्थानी आंतरराष्ट्रीय दर्जाची क्रीडा शाळा उभारली जाणार आहे. या शाळेत विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच क्रीडा प्रशिक्षणाची संधी मिळेल. विद्यापीठीय शिक्षणाशी जोडलेले अभ्यासक्रम आणि क्रीडा क्षेत्रातील व्यावसायिक संधी यांचा समन्वय साधला जाणार आहे. त्यामुळे खेळाडूंना शिक्षण आणि क्रीडा कारकीर्द यापैकी एकाची निवड करण्याची वेळ येणार नाही.
विशेष प्रशिक्षण अकादमी!
प्रारंभी फुटबॉल, टेनिस, बॅडमिंटन आणि पॅडेल या खेळांसाठी विशेष प्रशिक्षण अकादमी सुरू करण्याचे नियोजन आहे. पुढील टप्प्यांत स्क्वॉश, गोल्फ, अॅथलेटिक्स, जलतरण आणि ऑलिम्पिकमधील निवडक खेळांचाही समावेश केला जाणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.