Bahujan Representation in Goa: लोकसंख्येत 39 टक्के, पण सत्तेतील वाटा 8 टक्क्यांहून कमी; गोव्याच्या मंत्रिमंडळात बहुजनांची पीछेहाट

Goa Politics: बहुजन हिंदू गोव्याच्या लोकसंख्येच्या साधारण एकोणचाळीस टक्के आहेत. विधानसभेत त्यांचा वाटा तीस टक्क्यांवर आला आहे.
Goa Politics
Bahujan Representation in GoaDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

कौस्तुभ नाईक

बहुजन हिंदू गोव्याच्या लोकसंख्येच्या साधारण एकोणचाळीस टक्के आहेत. विधानसभेत त्यांचा वाटा तीस टक्क्यांवर आला आहे. सरकारची खरी ताकद असलेल्या तेरा खात्यांपैकी त्यांच्या हाती आज एकच आहे. आठ टक्क्यांहूनही कमी. आणि २००७ पासूनच्या चारही मुख्यमंत्र्यांपैकी एकही बहुजन नाही.

जून २००७ मध्ये दिगंबर कामत यांनी काँग्रेसचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली तेव्हा गृह खाते फोंड्याचे आमदार रवी नाईक यांच्याकडे तर अर्थ खाते हळदोण्याचे आमदार दयानंद नार्वेकर यांच्याकडे गेले. कोणत्याही राज्य सरकारच्या या दोन किल्ल्या तेव्हा बहुजन मंत्र्यांच्या हाती होत्या. २०१२ पासून मात्र या दोन्ही खात्यांच्या किल्ल्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून कधी बाहेर पडल्या नाहीत.

Goa Politics
Goa International Sports City: गोव्यात 3 हजार कोटींचे आंतरराष्ट्रीय क्रीडा शहर; युरोपातील रिवार समूहाशी करार, 3 हजार रोजगारांची अपेक्षा

मनोहर पर्रीकरांनी त्या स्वतःकडे ठेवल्या, लक्ष्मीकांत पार्सेकरांनी ठेवल्या, आणि २०१९ पासून प्रमोद सावंत ठेवत आहेत. एकवेळ गृह आणि अर्थ बाजूला ठेवले तरी चित्र बदलत नाही. सार्वजनिक बांधकाम, नगरनियोजन, महसूल, आरोग्य, ऊर्जा, जलसंपदा यांसारखी जी खाती सर्वाधिक पैसा आणि जमिनीवरील निर्णयांची सत्ता बाळगतात, अशी तेरा खाती मोजली तर २००७ मध्ये बहुजन मंत्र्यांकडे त्यांपैकी दोन होती. २०१२ मध्ये तीन; ऊर्जा, जलसंपदा आणि उद्योग. २०१७ मध्ये दोन; ऊर्जा आणि जलसंपदा. आणि २०२२ मध्ये फक्त एक; सुभाष शिरोडकर यांच्याकडील जलसंपदा.

याच काळात उच्चवर्णीय मंत्र्यांकडील अशी अतिमहत्वाच्या खात्यांची संख्या चारवरून आठ ते दहापर्यंत गेली. ही खाती इतकी महत्त्वाची का? सार्वजनिक बांधकाम खाते रस्ते, पूल आणि कंत्राटे ठरवते; नगरनियोजन खाते जमिनीचा वापर ठरवते; महसूल खाते जमिनीच्या नोंदी सांभाळते. ही खाती ज्यांच्या हाती, त्यांच्याकडे कार्यकर्ते, ठेकेदार आणि मतदारसंघ बांधण्याची साधने येतात. म्हणजे दुय्यम खाती मिळणे हे केवळ आजचे नुकसान नाही; ते भविष्याच्या राजकीय ताकदीवरही परिणाम करते.

बहुजन मंत्र्यांच्या वाट्याला काय आले, याचेही एक ठराविक स्वरूप दिसते. २०१२ मध्ये रमेश तवडकर यांना आदिवासी कल्याण आणि क्रीडा मिळाले. २०१७ मध्ये गोविंद गावडे यांना कला व संस्कृती, आदिवासी कल्याण आणि नागरी पुरवठा. २०२२ मध्ये गावडे यांना पुन्हा क्रीडा आणि कला व संस्कृती; नीळकंठ हळर्णकर यांना मच्छीमारी आणि पशुसंवर्धन; माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांना कृषी आणि नागरी पुरवठा. ही खाती महत्त्वाची नाहीत असे नाही; पण सरकारची खरी ताकद ज्या खात्यांत असते, ती ही नव्हेत.

याउलट, उच्चवर्णीय मंत्र्यांच्या वाट्याला सातत्याने पायाभूत सुविधा आणि जमीन आली. ढवळीकरांनी २०१२ आणि २०१७ मध्ये सार्वजनिक बांधकाम व वाहतूक खाती सांभाळली, तर २०२२ मध्ये ऊर्जा. २०१७ मध्ये विजय सरदेसाई यांना नगरनियोजन आणि रोहन खंवटे यांना महसूल मिळाले. २०१७ मध्ये सहापैकी चार उकचवर्णीय आमदार मंत्री झाले, तर बहुजन आमदारांची संख्या उच्च्वर्णीयांपेक्षा दुप्पट असूनही बारा आमदारांपैकी फक्त पाचांची मंत्रीपदी वर्णी लागली.

ऑगस्ट २०२५ मधील फेरबदलाने हीच पाढा पुन्हा गिरवला. दिगंबर कामत यांना मंत्रिमंडळात घेऊन सार्वजनिक बांधकाम खाते देण्यात आले. तवडकर यांनाही मंत्रिपद मिळाले पण त्यांना मिळाली ती क्रीडा, आदिवासी कल्याण आणि कला व संस्कृती हीच खाती, जी त्यांच्या आधी गोविंद गावडे यांच्याकडे होती. याला दुसरी बाजूही आहे. गृह आणि अर्थ खाती मुख्यमंत्र्यांनी स्वतःकडे ठेवणे ही देशभरातील सर्वसाधारण प्रथा आहे; तो केवळ जातीचा प्रश्न नाही. ‘मोठी खाती’ कोणती, हाही काही प्रमाणात मतांचा प्रश्न आहे. बहुजन नेत्यांना उपमुख्यमंत्रिपद आणि सभापतिपदही मिळाले आहे. पण ही दुसऱ्या रांगेतील पदे आहेत.

Goa Politics
Goa Voter List Deletion: गोव्यात 35 हजार मतदारांची नावे यादीत नसल्याचा काँग्रेसचा दावा; वगळलेल्यांना मदतीचा हात देणार

आकड्यांची ही उतरंड पाहता बहुजन हिंदू गोव्याच्या लोकसंख्येच्या साधारण एकोणचाळीस टक्के आहेत. विधानसभेत त्यांचा वाटा तीस टक्क्यांवर आला आहे. सरकारची खरी ताकद असलेल्या तेरा खात्यांपैकी त्यांच्या हाती आज एकच आहे. आठ टक्क्यांहूनही कमी. आणि २००७ पासूनच्या चारही मुख्यमंत्र्यांपैकी एकही बहुजन नाही. लोकसंख्येपासून मुख्यमंत्रिपदापर्यंत प्रत्येक पायरीवर बहुजनांचा वाटा आक्रसत गेला आहे. सत्तेच्या जितके जवळ जावे, तितके ते आता कमी दिसू लागले आहेत. एकेकाळी ज्या आधुनिक गोमंतकाची मुहूर्तमेढ बहुजनवादी राजकारणाने रोवली तोच बहुजन वर्ग आज पद्धतशीरपणे सत्तेपासून दूर फेकला जात आहे. किंबहुना आधीच फेकला गेला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.