गोव्यात पश्चिम घाटात म्हादई, महावीर, नेत्रावळी आणि खोतीगाव अभयारण्यात अनेक दऱ्या आहेत. त्या दऱ्यांतून अनेक धबधब्यांनी नद्यांचा प्रवाह वाहत आहे.
विर्डी महाराष्ट्रातला वजरी सकला, सुर्ल, कोत्रा, साट्रे, उस्ते, झाडांनी, कृष्णपूर, कारांझोळ, तांबडीसुर्ल, सोनाळ, दूधसागर, बामणबुडा, नुवे, साळजणी, मैनापी, सावरी, कुस्के, एड्रे अशा जागी जाताना कैक कि.मी. पायी प्रवास करावा लागतो. अशा ठिकाणी गोव्यातील निसर्गाची अजब किमया पाहून त्या सौंदर्यात आपण हरवून जातो. त्या दिव्यत्वाची प्रचिती मला या प्रवासात आली.
आमच्या गोव्यात गोळावली सत्तरी, कृष्णापूर झाडांनी, कारांजोळ, तांबडीसुर्ल, दूधसागर, मोले अशा ठिकाणी, जंगलांत शिवरात्री, चोरू, पूजा, भगुत असे सांस्कृतिक उत्सव साजरे करण्याची प्रथा आहे.
गोळावली सत्तरीत ठिकाणाकडून कोत्राच्या नदी पात्रातून आणि तिच्या काठाने खडतर प्रवासाने अंदाजे पाच-सहा किमी डोंगर दऱ्या पार करून सिद्धेश्वराच्या गुंफेकडे पोहोचता येते. त्यापुढे काही अंतरावर सुर्ल गावाच्या कड्यावरून कोसळणारा धबधबा आहे. गुंफेकडे जाताना गोळावलीकडून जुनागाव, साकवाची नदी, घोळीकडे आम्याकडे, तळयेकोण ते सिद्धाच्या डोंगरावरील गुंफेपर्यंत थांबत विसावा घेत पोहोचलो.
भगुत उत्सवाला विशेष करून जाणती, वयस्कर माणसे जाऊ शकत नाहीत. कारण रस्ता खडतर आहे, तरीसुद्धा माझ्याबरोबर त्या गावचे गुरूदास खोत आणि देवगो खोत असे दोघे होते.
आम्ही चालत जाऊन सिद्धाचे दर्शन घेतले. चालताना आम्हाला आधार देण्यास माझे पुतणे, पुंडलिक गावकर आणि देवगो खोतांच्या पुढील पिढीतली युवा मंडळी होती. भगुत उत्सव वर्षाखाठी दोनवेळा साजरा केला जातो.
जानेवारीचा प्रथम रविवार आणि जुलैचा प्रथम रविवार हा उत्सव साजरा करण्यास गोळावली, रिवे, हिरवेखुर्द, डोंगुर्ली, चरावणे, पाली, ठाणे, हिरवेबुद्रूक गावांचे तरुण युवक आणि गोव्यातून अनेक तरुण सिद्धाला नवस फेडण्यास जातात.
एखादी जत्राच त्या ठिकाणी भरली होती. सोबतच्या खोत कुटुंबाकडे सिद्धाच्या माहितीसंबंधी विचारणा करीत आमचा प्रवास सुरू होता. खोत म्हणाले आमच्या कुटुंबातील पूर्वजाला सिद्धाचे प्रथम दर्शन घोळीकडे म्हणजे गोळावली गावाकडून म्हादई अभयारण्यातील निर्जनस्थळी अंदाजे एक किमी अंतरावर घोळी परिसरात झाले.
ब्रह्मचारी सिद्धाचे तिथे वास्तव्य होते. त्याला फक्त दुपारचे जेवण देण्याचे काम खोतांचे जाणते पूर्वज करीत होते. जेवणाचा विषय गुपित होता. त्याची बायको त्याला दररोज जेवणाविषयी चौकशी करीत होती. पण त्यांनी सांगण्यास नकार दिल्याने एक दिवस ती गुपचूप त्याच्या पाठीमागून जाऊन तिने सिद्ध ब्रह्मचारीस दिलेले जेवण पाहिले.
त्यावेळी तिच्या हातातील बांगड्या वाजल्या त्या आवाजाने सिद्ध दु:खी झाले आणि जेवण देणाऱ्या खोतांच्या पूर्वजास बजावले, ‘यापुढे मला अन्न आणू नको.’ त्यावर खोत सिद्ध देवाला शरण गेला.
नंतर सिद्धांनी त्यांना सल्ला दिला. पूर्ण वर्षात बारा अमावास्यांची आई संक्रांती पहिली आणि मान्सून सुरू झाल्यानंतर पहिल्या रविवारी असे सहा सहा महिन्यांनी दोनवेळा मला कोत्रा नदीच्या उगमाकडील तळयेकडील डोंगरावरील गुंफेत अन्नाचा नैवेद्य आणून दे. ही पूर्वजांनी केलेली सिद्धाची सेवा आम्ही वंशपरंपरेने कैक शतकांपासून आजतागायत सुरू ठेवली आहे, असे खोत म्हणाले.
कोत्राच्या पाषाणी दगडांच्या खाचातून चालताना हा सारा इतिहास त्यांच्याकडून ऐकत होतो. वाट चालून थोडा दमलो होतो. पण उत्साह मनात असल्याने गुहेच्या टेकडीकडील पायथ्याशी पोहोचलो.
डोंगर चढताना स्वागतासाठी पानाणी शिळा फुटून खिंडीप्रमाणे विभागली आहे. त्या खिंडीतून नवस फेडण्यासाठी भाविकांची तोबा गर्दी होती. चढण फारच उभी असल्याने एखाद्याचा पाय घसरला तर घळीत खाली पडण्याचा धोका!
खिंडीकडून गुंफेत जाईपर्यंत दीड तास तप करावे लागले. प्रत्येक भाविकांच्या हातात प्लास्टिक पिशवीत नवसाच्या वस्तू, नैवेद्य, उदबत्ती, फुले, फळे, फटाकडे असे सामान पाहावयास मिळत होते.
आम्ही गुहेत प्रवेश केला आणि अंगातून वाहणारा घाम गुंफेतील थंडाव्याने नाहीसा झाला. गुंफेत दोन शिड्यांच्या आधाराने वर जाऊन सिद्धाच्या कलशाचे दर्शन घेतले. हातावर ठेवलेला प्रसाद ग्रहण केला आणि परत दोन शिड्या उतरून गुंफेतून बाहेर पडून कैकजणांचा आधार घेत प्रचंड गर्दीतून गुंफेकडून खाली खिंडीत व तेथील गर्दी पार करत नदी पात्राकडे परतलो.
तिथे कैक जणांनी म्हटले आमच्या हाकेला पावणारा म्हादई अभयारण्यातील सिद्धेश्वराने ती नैसर्गिक गुंफा निर्माण केली आहे. ते म्हादई अभयारण्यातील एक आश्चर्य आहे. आम्ही दर्शन घेऊन म्हादईचे अवाढव्य सुंदर स्वरूप न्याहाळत चार किमी अंतर कापून त्याच्या प्रथम जागी घोळीकडे पोहोचलो.
त्या ठिकाणी लोकांनी दिलेल्या सामानाचे जेवण करून नैवेद्य करतात व सर्वांना प्रसाद म्हणून वाढतात. आम्ही दुसऱ्या पंगतीला बसण्याचा प्रयत्न केला. पण संपूर्ण जागा व्यापल्याने उभे राहूनच जेवण घेतले. माझ्या मते देवाच्या दर्शनाला हजार-दीड हजार लोक जमले असावेत.
आम्ही हात धुण्यासाठी कोत्रा नदीच्या पात्रातील कोणीकडे गेलो. नदीतील पाण्यात खालचे पाषाणी गोटे दिसत होते.
मी हात धुऊन दोन्ही हाताचा द्रोण करून पाणी पीत असता गर्दीत कोण तरी हळूच म्हणाला, ‘‘इथेच वाघीण आणि तिथे तीन बछडे मारले होते.’’ माझ्या हाताच्या दुसऱ्या द्रोणातील पाणी घशातून पोटात जाण्याऐवजी आसवांशी स्पर्धा करत मनगटावरून धरतीकडे ओघळले.
स्वत:ला सावरत मी ओणवा झालेलो सरळ झालो आणि चौफेर नजर फिरवली. नदीच्या तटावरील उंच-उंच डोंगर, पश्चिम घाटाचा कोट्यवधी वर्षांपूर्वी तुटलेला उंच कडा, अनेक हिरवीगार मोठमोठी जंगली झाडे, वनौषधी वेली, झुडपे, मोठमोठे पाषाणी दगड, कोत्रा नदीचे कोरडे पडलेले पात्र, त्यातून झुळझुळणारे अनेक ओहोळांचे झरे, पात्रातील कोंडीत साठलेले रुपेरी पाणीे, पायथ्याशी चोर्ला-बेळगाव रस्ता, सिद्धेश्वर टेकडीच्या माथ्यावरील सुर्ल गाव होते.
त्या म्हादई जंगलात वावरणारे पक्षी, बेडूक, खेकडे, कासव बेतकाठी, कणकच्या बेटात वावरणारे सरपटणारे प्राणी, वन्य प्राणी, झाडावर उड्या मारणारी खेती, माकडे दृष्टीस पडली.
हिंस्र प्राणी हल्ला करण्यास पलीकडे टपला आहे, म्हणून आवाज देत इशारा करून गवत, कंदमुळे खाणाऱ्या प्राण्यांना सावध करणारे शेक्रू आणि सत्तरीतील म्हादई अभयारण्याचे रक्षण करणारा सिद्धेश्वर रूपी वाघ हे सगळे डोळ्यांसमोर तरळून गेले.
आमच्या सत्तरीच्या पूर्वजांनी गोवामुक्तीसाठी या म्हादई अभयारण्यात वाघासोबत राहूनच पोर्तुगिजांबरोबर लढत दिली होती, बंड पुकारले होते. गोवा स्वतंत्र होऊन आज पासष्ट वर्षे झाली तरी सत्तरीच्या भूमिपुत्राने पाळीव जनावरांच्या साहाय्याने कुमेरी शेती करण्याचे सोडलेले नाही.
काटेकणगी, करांदे, अळुमाडी, चिर्का, भोपळा, कुवाळा, काकडी, चिबूड यांची लागवड करून शहरातील लोकांच्या तोंडाची चव ते भागवतात. गोपालनातून दुग्ध व्यवसाय करतात. सत्तरीचा भूमिपुत्र देवभोळा आहे! सत्तरीत संपूर्ण वर्षभर देवालयांत देवकार्ये, उत्सव साजरे होतात. मी म्हादई अभयारण्यात नदी तटावरून प्रवास करताना पूर्वजांनी पुजलेले देव, वाघ, सिंह, हत्ती, घोड्याच्या मूर्ती, लिंगे पहावयास मिळतात. ती पहिल्याने सत्तरीच्या पूर्वजांचा इतिहास डोळ्यांसमोर उभा राहतो.
सकाळी उगवणारा सूर्य आपले प्रथम कोवळे किरण सिद्धेश्वराच्या गुंफेवर पसरवतो. कोत्राच्या नदीचा उगम झऱ्याच्या रूपाने गुंफेतून पाण्याचा पाझर फोडून त्याला स्नान घालते. म्हणून आपण सर्वांनी त्या गुंफेचे पावित्र्य सांभाळण्यासाठी केरकचरा, फटाकडे त्या ठिकाणी टाकू नयेत, फोडू नयेत म्हणून त्या निसर्गदेवतेकडे माझी वंदनीय प्रार्थना!
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.