

वाळपई: ठाणे पंचायत क्षेत्रात येणाऱ्या गोळावली गावात सिद्धेश्वर देवाचा भगुत उत्सव रविवारी उत्साहात साजरा करण्यात आला. सुमारे ३०० वर्षांची परंपरा लाभलेल्या या उत्सवासाठी गोवा व महाराष्ट्रातील विविध भागांतून शेकडो भाविकांनी उपस्थिती लावली.
हा उत्सव सिद्धेश्वर देवाचा असून सिद्धेश्वर हे युगपुरुष व भगवान शंकरांचे अवतार मानले जातात. ‘भगुत’ ही या भागातील एक वैशिष्ट्यपूर्ण धार्मिक परंपरा असून जंगलाशी नाते सांगणाऱ्या श्रद्धा-विधींमुळे या उत्सवाला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. या गावापासून सुमारे १० किलोमीटर अंतरावर घनदाट जंगलात असलेल्या एका गुहेत सिद्धेश्वराचा वास असल्याची श्रद्धा आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामस्थांसह इतर भाविक येथे मोठ्या भक्तिभावाने उपस्थित राहून उत्सव साजरा करतात. गावाच्या कल्याणासाठी श्री सिद्धेश्वरांनी येथे तपश्चर्या केल्याने त्यांचा आशीर्वाद सर्वांवर असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. भूतबाधा किंवा नकारात्मक शक्ती दूर होतात, असा विश्वास भाविकांमध्ये दृढ आहे.
नवस फेडताना कोंबडा किंवा बकरा अर्पण केला जातो. त्यानंतर उत्सवस्थळीच मानाचा प्रसाद तयार करून सर्व भाविक एकत्र बसून ग्रहण करतात. यासोबतच विविध मिठाई व खाद्यपदार्थांचाही नैवेद्य देवाला अर्पण केला जातो. यंदाही शेकडोंच्या संख्येने भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
गावचे ज्येष्ठ नागरिक देवगो खोत यांनी सांगितले की, आमच्या पूर्वजांपासून हा उत्सव श्रद्धेने साजरा केला जातो. वर्षातून केवळ दोन वेळा जून आणि जानेवारीच्या पहिल्या रविवारी भाविक येथे येतात. मधल्या काळात कोणीही यास्थळी जात नाही, अशी परंपरा आहे. तसेच या ठिकाणी महिलांना प्रवेश नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.