Goa SIR voter deletion data Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Goa SIR: गोव्यात 1.27 लाख मतदारांची नावे वगळली; मुस्लिम समाजात सर्वाधिक 20 टक्के कपात

Muslim Voter Deletion: गोव्यात भारतीय निवडणूक आयोगाने केलेल्या विशेष सखोल मतदार पुनर्निरीक्षणात (एसआयआर) कोणत्या धर्मातील किती मतदारांची नावे मतदारयादीतून वगळण्यात आली, याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

Muslim voters 20 percent reduction in Goa: विशेष मतदार पुनर्निरीक्षणातील धक्कादायक आकडेवारी; राज्यातील सुमारे १.२७ लाख मतदारांची नावे वगळली, वास्कोत मुस्लिम मतदारांच्या तब्बल ४७ टक्के नावांना कात्री लागल्याचे उघडकीस आले आहे.

गोव्यात भारतीय निवडणूक आयोगाने केलेल्या विशेष सखोल मतदार पुनर्निरीक्षणात (एसआयआर) कोणत्या धर्मातील किती मतदारांची नावे मतदारयादीतून वगळण्यात आली, याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.

राज्यात मुस्लिम समाजातील सुमारे २० टक्के मतदारांची नावे वगळण्यात आली असून, ख्रिस्ती समाजातील ११ टक्के आणि हिंदू समाजातील ९ टक्के मतदारांची नावे कमी झाली आहेत. त्यामुळे मतदारांच्या संख्येच्या तुलनेत मुस्लिम समाजातील मतदारांच्या नावांची सर्वाधिक कपात झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

‘गोवा न्यूज’ या संकेतस्थळावर ज्येष्ठ पत्रकार संदेश प्रभुदेसाय यांनी १ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केलेल्या विशेष विश्लेषणातून ही आकडेवारी समोर आली आहे. गोव्यातील ४० विधानसभा मतदारसंघांमधील १,७३१ मतदान केंद्रांच्या अंतिम मतदारयाद्या आणि संबंधित कागदपत्रांचे संगणकीय विश्लेषण करून ही माहिती संकलित करण्यात आली आहे.

२०२५ मधील मतदारयादीनुसार गोव्यात ११ लाख ८५ हजार मतदार होते. विशेष पुनर्निरीक्षणानंतर २१ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या अंतिम मतदारयादीत ही संख्या १० लाख ५७ हजार ५६६ झाली. म्हणजेच सुमारे १ लाख २७ हजार मतदारांची घट झाली असून, ही घट पूर्वीच्या मतदारसंख्येच्या सुमारे १०.७६ टक्के आहे.

धर्मनिहाय आकडेवारीचा विचार केल्यास हिंदू समाजातील सुमारे ७ लाख ६४ हजार मतदारांपैकी ७१ हजार नावे वगळण्यात आली. त्यामुळे या समाजातील मतदारकपातीचे प्रमाण ९ टक्के आहे. गोव्यातील एकूण मतदारांमध्ये हिंदू मतदारांचा वाटा सुमारे ६५ टक्के आहे.

१ ख्रिस्ती समाजातील सुमारे ३ लाख मतदारांपैकी ३३ हजार मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. या समाजाचा एकूण मतदारांमधील वाटा सुमारे २५ टक्के असून, नावकपातीचे प्रमाण ११ टक्के आहे.

२ मुस्लिम समाजातील सुमारे ९० हजार मतदारांपैकी तब्बल १८ हजार मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. त्यामुळे या समाजातील मतदारकपातीचे प्रमाण सुमारे २० टक्के झाले आहे.

३ गोव्यात शीख समाजाचेही १,२०० पेक्षा कमी मतदार असल्याचे या विश्लेषणातून आढळले. त्यापैकी सुमारे ३५० नावे वगळण्यात आली असून, या समाजातील कपातीचे प्रमाण ३० टक्क्यांच्या आसपास आहे. याशिवाय सुमारे पाच हजार मतदारांची धार्मिक ओळख निश्चित करता न आल्याने त्यांचा समावेश ‘अज्ञात’ गटात करण्यात आला आहे.

वास्कोत सर्वाधिक मतदारकपात

विधानसभा मतदारसंघनिहाय आकडेवारी पाहिल्यास वास्को मतदारसंघात सर्वाधिक ११ हजार ६५७ मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. हे प्रमाण सुमारे ३२ टक्के आहे. त्याखालोखाल कुठ्ठाळी, दाबोळी, मुरगाव तसेच पणजी या मतदारसंघांमध्येही मोठ्या प्रमाणात मतदारांची नावे कमी झाली आहेत. एकूण मतदारकपातीचे प्रमाण १५ ते ३० टक्क्यांच्या दरम्यान असलेल्या पाच मतदारसंघांमध्ये वास्को (३२ टक्के), कुठ्ठाळी (२८ टक्के), मुरगाव आणि पणजी (१९ टक्के) यांचा समावेश आहे.

बार्देशातही मोठी कपात

बार्देश तालुक्यातही मोठ्या प्रमाणात मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. पर्वरी मतदारसंघात १६ टक्के, साळगाव आणि कळंगुटमध्ये प्रत्येकी १४ टक्के मतदारकपात झाली आहे. तिसवाडीतील ताळगाव आणि सांताक्रूझमध्ये प्रत्येकी १६ टक्के, तर सांतआंद्रे मतदारसंघात १५ टक्के कपात झाली आहे.

सासष्टीतील मडगावमध्ये हे प्रमाण १४ टक्के आहे. म्हापसा, फातोर्डा मतदारसंघात १३ टक्के, तर थिवी आणि हळदोण्यात प्रत्येकी १० टक्के मतदारकपात झाली आहे. फोंडा मतदारसंघात १२ टक्के, तर नावेलीत १२ टक्के कपात नोंदवण्यात आली आहे.

२७ मतदारसंघांत मुस्लिम मतदारांची अधिक कपात

धर्मनिहाय मतदारकपातीचा विधानसभा मतदारसंघनिहाय अभ्यास केल्यास ४० पैकी तब्बल २७ मतदारसंघांमध्ये मुस्लिम मतदारांची कपात अन्य धर्मीयांच्या तुलनेत अधिक असल्याचे आढळले आहे. ख्रिस्ती मतदारांची कपात ११ मतदारसंघांमध्ये सर्वाधिक आहे.

तर नावेली आणि वेळ्ळी या दोन मतदारसंघांमध्ये हिंदू मतदारांची कपात सर्वाधिक आहे. म्हापसा, वाळपई आणि शिरोडा या तीन मतदारसंघांमध्ये ख्रिस्ती आणि मुस्लिम मतदारांच्या कपातीचे प्रमाण समान असल्याचे विश्लेषणात नमूद करण्यात आले आहे.

मुस्लिम मतदारांच्या कपातीचे प्रमाण वास्कोमध्ये सर्वाधिक ४७ टक्के, तर कुठ्ठाळीमध्ये ४३ टक्के आहे. कळंगुट, थिवी आणि काणकोण या मतदारसंघांमध्येही मुस्लिम मतदारांची कपात २८ ते ३५ टक्क्यांच्या दरम्यान आहे. ख्रिस्ती मतदारांच्या बाबतीत वास्कोमध्ये सर्वाधिक ४१ टक्के नावे वगळण्यात आली आहेत. सेंट आंद्रे, पणजी, मुरगाव आणि ताळगाव या मतदारसंघांमध्येही ख्रिस्ती मतदारांची कपात १७ ते २३ टक्क्यांच्या दरम्यान आहे.

जुन्या काबिजादीतील मतदारकपात अधिक

गोव्याच्या जुन्या काबिजादीतील २४ मतदारसंघांमध्ये मतदारकपातीचे प्रमाण तुलनेने अधिक असल्याचे विश्लेषणातून दिसून आले आहे. या मतदारसंघांपैकी पाच ठिकाणी १५ ते ३० टक्के, सात ठिकाणी १४ ते १६ टक्के, तर सात ठिकाणी १० ते १३ टक्के मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. याउलट, नवीन काबिजादीतील मतदारसंघांमध्ये तुलनेने कमी कपात झाली आहे. या भागातील फोंडा हा एकमेव मतदारसंघ १० ते १३ टक्के कपातीच्या गटात आहे. उर्वरित मतदारसंघांमध्ये प्रामुख्याने ४ ते ८ टक्क्यांदरम्यान मतदारकपात झाली आहे.

सांत आंद्रे

हिंदू मतदारांच्या कपातीचे प्रमाण कुठ्ठाळी, वास्को, दाबोळी, मुरगाव आणि पणजी या पाच मतदारसंघांमध्ये सर्वाधिक असून, ते १७ ते ३६ टक्क्यांच्या दरम्यान आहे.

नावावरून धर्म निश्चितीची पद्धत

या संपूर्ण विश्लेषणात एक महत्त्वाची बाब लक्षात घेण्यासारखी आहे. निवडणूक आयोग मतदारांची धार्मिक ओळख नोंदवत नाही. त्यामुळे या अभ्यासासाठी मतदाराचे नाव, वडिलांचे किंवा पतीचे नाव आणि आडनाव यांच्या आधारे धार्मिक वर्गीकरण करण्यात आले आहे. यासाठी सुमारे १,२०० गोमंतकीय आणि भारतीय नावांच्या व आडनावांच्या नमुन्यांचा वापर करण्यात आला.

एखादे नाव एकापेक्षा अधिक धर्मांमध्ये आढळत असल्यास किंवा त्यावरून धर्म निश्चित करणे शक्य नसल्यास त्या मतदाराचा समावेश ‘अज्ञात’ गटात करण्यात आला. विशेषतः नाईक, गावकर यांसारखी आडनावे हिंदू, ख्रिस्ती आणि मुस्लिम समाजांतही आढळत असल्याने अशा नावांचे वर्गीकरण करताना चुका होण्याची शक्यता असल्याचे अभ्यासात स्पष्ट करण्यात आले आहे.

या अभ्यासातील मतदारांची एकूण संख्या, मतदारसंघनिहाय नोंदी, वगळलेली नावे, नव्याने समाविष्ट झालेले मतदार आणि अंतिम मतदारयादी यांची आकडेवारी निवडणूक अधिकाऱ्यांनी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीशी बहुतांश ठिकाणी जुळत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Agriculture: काटेकणगीच्या शेतीला ग्रहण! लागवड वाढली, तरी उत्पादन घटले; दिवाळीच्या मागणीवर परिणाम होणार?

Goa Weather: दिवाळी तोंडावर पावसाचा जोर कायम; डिचोलीत घरावर कोसळली आंब्याची फांदी, बाजारपेठेत धावपळ!

Budh Gochar 2026: पुढील 22 दिवस सोन्याचे! बुधाच्या नक्षत्र बदलाने 'या' राशी होणार मालामाल; करिअरमध्ये मिळणार उत्तुंग यश

Crime News: गर्लफ्रेंडच्या इन्स्टाग्रामवरून मेसेज, भेटायला बोलावलं अन् बेल्टने गळा आवळला; 17 वर्षीय विद्यार्थ्याची निर्घृण हत्या, तिघे ताब्यात

IPL 2027 पूर्वी मोठी उलथापालथ! हार्दिक पांड्या पंजाबकडून, तर अर्शदीप मुंबईकडून खेळणार; मोठी अपडेट समोर

SCROLL FOR NEXT