साखळीचा हा किल्ला विद्यार्थी, संशोधक यांच्यासाठी कायम उपयुक्त ठरावा, या दृष्टीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्याची गरज आहे. प्राचीन, ऐतिहासिक वास्तूंना ज्ञान-ऊर्जेच्या केंद्रात रूपांतरित करण्याची गरज आहे.
चोर्ला घाटमार्गातून येणाऱ्या घाटावरच्या व्यापाऱ्यांना साखळीतले छोटे बंदर शेकडो वर्षांपासून व्यापार, उद्योग धंद्यासाठी सोयीस्कर ठरले होते. १७०१साली खेम सावंतांनी पारगड किल्ला ताब्यात घेतला आणि त्यामुळे कुडाळ, पेडणे, डिचोली (भतग्राम), साखळी (सत्तरी) आणि मणेरी या पाच महालांचे सरदेसाईपद त्यांना प्राप्त झाले. २५ ऑगस्ट १७८१ रोजी पोर्तुगिजांनी डिचोलीचा किल्ला ताब्यात घेतल्यावर त्याच दिवशी कारापूरच्या एका टोकावर वसलेल्या श्रीविठ्ठलाच्या मंदिराभोवती वेढा घातला. कोटातील लोकांनी चौदा तासापर्यंत पोर्तुगिजांना दाद दिली नाही. परंतु यावेळी कुस्टोबा राणे आणि जेतोबा राणे यांनी डिचोली आणि
साखळी महाल काबीज करण्यासाठी गोव्यात पोर्तुगीज सत्ताधीश प्रबळ होत असल्याचे पाहून, आपले सामर्थ्य त्याच्या मदतीसाठी उभे करण्याचे ठरवले आणि त्यामुळे सावंतवाडकरांना नमविण्यास पोर्तुगीज सफल ठरले. तत्पूर्वी मार्किस द हलोर्णा यांनी १७४६मध्ये साखळीवर हल्ला करून साखळीचा किल्ला ताब्यात घेतला.
वाळवंटीच्या डाव्या किनारी सावंतवाडकर आणि चोर्लाघाटमार्गे येणाऱ्या मालांची देखरेख आणि इथे होणाऱ्या व्यापाऱ्यांवरती नियंत्रण ठेवण्यास हा किल्ला त्यांना उपयुक्त ठरला. १८१७पर्यंत येथे आठ तोफा होत्या. आज साखळीच्या किल्ल्याचा एकमेव बुरूज त्याची स्मृती जागवत अतिक्रमणाच्या विळख्यात कसाबसा तो मुक्तीनंतर उभा होता. गोवा सरकारच्या पुरातत्त्व खात्याने विस्मृतीत जाण्याच्या वाटेवरती असलेल्या या किल्ल्याला त्याचे पारंपरिक वैभव सुरक्षित ठेवत नवे रूप देण्याचा प्रस्ताव पुढे नेलेला आहे. त्यामुळे सध्या या किल्ल्याच्या नूतनीकरणाचे काम कुर्मगतीने का होईना, पण सुरू आहे.
जुन्या काळी म्हावळींगे (मावळंगतड), वजरी (विर्डी ) आणि तुळशीमळा (पर्ये) अशा तीन गावांच्या जेथे सीमा भिडतात त्या जलमार्गाने युक्त वाळवंटी नदीच्या डाव्या किनाऱ्यापासून ६० मीटर अंतरावरती एका उंचवट्यावर या किल्ल्याचे बांधकाम मुगल राजवटीत करण्यात आले असावे असे मानले जाते.
ज्यावेळी सत्तरी तालुक्याचे मुख्यालय राणे सरदेसाईंच्या कारकिर्दीत साखळीत कार्यान्वित करण्यात आले आणि मुख्य मांडवीला जोडणाऱ्या वाळवंटी नदीच्या काठी व्यापारी, यात्रेकरू यांची इथल्या जलमार्गावरती ये-जा करण्याची वर्दळ वाढली तेव्हा, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी किल्ल्याची गरज निर्माण झाली होती. १६९८साली खेम सावंतांनी जेव्हा डिचोलीचा किल्ला ताब्यात घेतला, तेव्हाच त्यांनी साखळी किल्ल्यावरही आपले वर्चस्व निर्माण केले. जेव्हा पोर्तुगिजांनी मुगलांना मदतीचा हात दिला होता, तेव्हा हा किल्ला आपल्याला भेट म्हणून द्यावा अशी त्यांची अपेक्षा होती. १७०१साली सावंतवाडीच्या खेम सावंताच्या ताब्यात हा किल्ला पुन्हा आला, तेव्हा त्यावर ताबा मिळवण्याचा खटाटोप पोर्तुगिजांनी आरंभला होता आणि त्यामुळे १७४६ तसेच १७५४साली त्यांनी तो जिंकून घेतला.
साखळीच्या किल्ल्यावर आपला ताबा कायम ठेवण्यासाठी सावंतवाडकर सातत्याने धडपडत होते आणि त्यामुळे कधी काळ त्यांच्याकडे तर मध्येच पोर्तुगिजांकडे त्याचा ताबा राहिला. ८ डिसेंबर १७८२ रोजी गव्हर्नर डी फेडरिको गुल्हर्मे डिसौझा यांनी पुन्हा एकदा या किल्ल्यावर पोर्तुगिजांचा ताबा प्रस्थापित केला. त्यानंतर मात्र पोर्तुगिजांनी साखळी किल्ल्यावरची आपली पकड प्रबळ केली आणि त्यामुळे सावंतवाडकरांना तो ताब्यात घेण्यास यश मिळणे दुरापास्त ठरत गेले.
१८७०साली पोर्तुगिजांनी पायदळाचे २ कॉन्स्टेबलस् आणि २० शिपायांची तुकडी एका कमांडंटच्या नेतृत्वाखाली नियुक्त केली. तेथे त्यांच्या निवासाची सोय करण्यात आली. पेयजलासाठी विहिरीची व्यवस्था करण्यात आली होती. किल्ल्यात नागरी तुरुंगाची व्यवस्था करण्यात आली. कालांतराने किल्ल्यावर कस्टम विभागाचे कार्यालय सुरू करण्यात आले. सैन्याची तुकडी किल्ल्यावर तैनात केलेली असल्याने, कस्टम कार्यालयाला फायदा झाला.
परंतु किल्ल्याच्या डागडुजीकडे मात्र व्यवस्थित लक्ष देण्यात न आल्याने त्याची आबाळ होत गेली. संरक्षण या दृष्टीने किल्ल्याचे विशेष महत्त्व शिल्लक राहिले नसल्याने, तेथे सैन्यांची कुमक तेवढी ठेवली. एवढेच नव्हे तर या किल्ल्यास बिनमहत्त्वाचा म्हणून नमूदही केले. पोर्तुगीज काळात, १९३०साली किल्ल्याची शेवटची दुरुस्ती करण्यात आली होती.
गोवा मुक्त झाल्यानंतर, १९९०साली गोवा सरकारच्या पुरातत्त्व पुराभिलेख आणि वस्तुसंग्रहालय खात्याने त्याची डागडुजी केली होती. परंतु नंतरच्या काळात किल्ल्याच्या पुरातत्त्वीय आणि ऐतिहासिक पैलूंचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले नाहीत. परिणामी, किल्ल्याच्या सभोवताली साखळी बाजारपेठेतल्या व्यापारी आणि उद्योजकांनी अतिक्रमणे केली. या किल्ल्याकडे सर्वांनीच अक्षम्य दुर्लक्ष केले.
आता या किल्ल्याच्या नूतनीकरणाद्वारे पुरातत्त्व खात्यामार्फत वाचनालय, वस्तुसंग्रहालय, त्याच्या इतिहासाची माहिती देणारे दालन, पेयजल, शौचालय तसेच सुसज्ज सभागृह उभारले जाणार आहे. हा किल्ला विद्यार्थी, संशोधक यांच्यासाठी कायम उपयुक्त ठरावा, या दृष्टीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्याची गरज आहे.
या परिसरातल्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक स्थळांविषयीचे माहितीपट, प्रदर्शन त्याचप्रमाणे विशेष कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले पाहिजे. ज्याप्रमाणे मांडवी तीरावरच्या रेईश मागूश किल्ल्याला लेडी हेमिल्टन ट्रस्टमार्फत नवा साज देऊन, त्याला पर्यटक आणि अभ्यासकांसाठी आकर्षण बिंदू ठरवला, त्याचप्रमाणे या किल्ल्याला गतवैभव प्राप्त करून दिले पाहिजे. प्राचीन, ऐतिहासिक वास्तूंना ज्ञान-ऊर्जेच्या केंद्रात रूपांतरित करण्याची गरज आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.