गोव्यात रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त जागृती कार्यक्रम होतात. ते व्हायलाच पाहिजेत. रस्ता सुरक्षा ही केवळ तांत्रिक बाब नाही- ती कायदेशीर आणि नागरी अत्यावश्यकता आहे. कायदा केवळ शिक्षा करण्यासाठी नाही तर संरक्षण करण्यासाठीही अस्तित्वात असतो.
गोव्यात अपघातांचे प्रमाण बरंच वाढले आहे आणि रस्त्यावर गाडी हाकणे वा चालणे हे दिव्य ठरत आहे. मात्र काही उपाय अंमलात आणले तर अपघात लक्षणीयरीत्या कमी होऊ शकतात आणि जीव वाचूही शकतात. त्यासाठी शिक्षण आणि जागरूकता महत्वाची. वाहतूक नियमांचे अज्ञान न्यायालयात निमित्त ठरू शकत नाही.
प्रत्येक नागरिकाने गाडी चालवण्यापूर्वी नियम जाणून घेतले पाहिजेत. वाहतूक कायद्यांची कठोर अंमलबजावणी अति महत्त्वाची आहे. अंमलबजावणीशिवाय कायदे केवळ सूचना ठरतात. अति वेग, मद्यपान करून वाहन चालवणे आणि वाहन चालवताना मोबाईल फोनचा वापर यावर दंड आकारला पाहिजे. स्वयंचलित कॅमेरे आणि जागेवरच दंड यामुळे सवयीनुसार गुन्हेगारांना रोखता येते.
“पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा व्हायला पाहिजेत’, अशा फक्त पोकळ घोषणा होतात. रस्ता सुरक्षा म्हणताना रस्ते सुरक्षित आहेत का? खराब डिझाइन केलेला रस्ता हा कायद्यानुसार धोका ठरतो.
सरकारने योग्य सूचना, प्रकाशयोजना, पादचाऱ्यांसाठी क्रॉसिंग आणि खड्डेमुक्त रस्ते सुनिश्चित केले पाहिजेत. तशी हमी अगोदर हवी. वाहनांचे कर भरलेले असतात ते खड्डेमय रस्त्यात पडण्यासाठी नव्हे.
बेपर्वा बेशिस्त वाहन चालकांमुळे पादचारी, सायकलस्वार आणि मुले बहुतेकदा पहिले बळी ठरतात. शिस्तीत वाहने चालवणारे इतर लोक नंतर. शहरी नियोजनाने वाहनांच्या सोयीपेक्षा मानवी जीवनाला प्राधान्य दिले पाहिजे.
हल्ली गोव्यात वाहनचालकांना तालांव म्हणजे चलन देणारे पोलिस कमी झाले आहेत. त्याची कारणे काहीही असोत. मुळात पण त्यामुळे बेदरकार युवा वाहनचालकांचं फावले आहे. अनेक लोक हेल्मेट परिधान न करता सरळ शहरांतून फिरत असतात. याच्यावरही उपाय हवा.
सुरक्षितता ही एक एकत्रित सामायिक जबाबदारी आहे. त्यासाठी खूप काही काय करता येईल. स्थानिक संस्था, एनजीओ, नागरिक गटांना उल्लंघनांची तक्रार करण्यासाठी, सुधारणा सुचवण्यासाठी आणि सुरक्षा ऑडिटमध्ये सहभागी होण्यासाठी समाविष्ट केले पाहिजेत.
रस्ते सुरक्षा म्हणजे पुढे पोलिस आहेत म्हणून हेल्मेट घालणे नव्हे. ‘सुरक्षा’ ही जीवन, प्रतिष्ठा आणि सार्वजनिक सुव्यवस्था व शिस्त जपण्याबद्दल आहे. नागरिक म्हणून, आम्ही रस्त्याचे निष्क्रिय वापरकर्ते नाही तर सुरक्षिततेमध्ये सक्रिय भागधारक आहोत हे विसरू नये. आम्ही सामाजिक आणि नागरी बांधिलकी समजून घेऊन कायद्याच्या बाजूने राहू. तरच कायदा आम्हाला संरक्षण देईल.
- अमोल थळी
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.