Goa Politics Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Goa Politics: मगोपला 16, आरजीला 15 जागा हव्यात; भाजप-काँग्रेससमोर प्रादेशिक पक्षांचे दबावतंत्र!

Goa Assembly Elections 2027: महाराष्ट्रवादी गोमंतक व आरजी या दोन्ही प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व आगामी निवडणुकीत पणाला लागणार आहे

गोमंतक ऑनलाईन टीम

राजू नायक

महाराष्ट्रवादी गोमंतक व आरजी या दोन्ही प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व आगामी निवडणुकीत पणाला लागणार आहे. नेत्यांना स्वतः जिंकून यायचे आहे व राष्ट्रीय पक्षांकडून अधिकत्तम जागा पदरात पाडून घ्यायच्या आहेत. राष्ट्रीय पक्षांना त्यांची आत्यंतिक गरज असल्याने हातातील सारे डावपेच त्यांनी खेळणे सुरू केले आहे.

विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष व रेव्होल्युशनरी गोवन्स पार्टी दोघांनीही अधिकतम जागा पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न चालविला आहे. आज तरी त्या दोघांनी ते अनुक्रमे भाजपा व कॉंग्रेससोबत जाणार असल्याचा देखावा तयार केला आहे. दोघांना सध्या भाजपा व कॉंग्रेसबरोबर एकदम संबंध तोडून टाकणे सोईचे वाटत नाही. कारण त्यांच्या मतदारांनाही ते आवडणार नाही. त्यामुळे दोघे येणाऱ्या संधीची वाट पाहात अधिकतम जागा पदरात पाडून घेण्याची शिकस्त करीत राहणार आहेत.

वास्तविक दोघांनाही २०२७च्या निवडणुकीत ‘एकला चलो’ जाण्यात स्वारस्य आहे. दोघांनाही वाटते, त्यांचा मतदार हिस्सा एकतर शाबूत आहे, किंवा वाढला आहे व गोव्याच्या राजकारणात मोठी झेप घेण्याची ही त्यांच्यासाठी एक मोठीच संधी आहे. दोघांनी गृहित धरलेय भाजपाची लोकप्रियता घटलीय. सलग तीनवेळा सत्तेत राहिल्याने प्रस्थापित विरोधी मतांचा फटका भाजपाला बसणार आहे. भाजपाला लोकप्रिय पाठिंबा नसला तरी कॉंग्रेस पक्षालाही फारसा जनाधार नाही, त्यामुळे त्यांच्या मागे फरफटत जाऊन घटत्या मतांचे साक्षीदार बनण्याऐवजी आपल्या हिश्‍श्‍याची मते पदरात पाडून घेऊन सत्तेत जादा हिश्‍याची मागणी करणे सोपे, असा त्यांचा विचार आहे.

मगोपला मडकईसह फोंडा, प्रियोळ, शिरोडा, मांद्रे हे खात्रीचे मतदारसंघ हवे आहेतच, शिवाय त्यांना आणखी १२ मतदारसंघात आपली चुणूक दाखवून द्यायची आहे. त्या पक्षाचे नेते सांगतात, त्यांनी १६ मतदारसंघात काम सुरू केले आहे. यावेळी हा पक्ष फोंडा तालुक्यात आपला प्रभाव दाखवून देताना काही प्रयोग करू शकतो. सुदिन ढवळीकर आपल्या पुत्राला मडकई मतदारसंघ देऊन स्वतः फोंड्यात पदार्पण करू पाहातात. फोंड्यात त्यांचा जरूर वरचष्मा आहे. त्यांचा भाऊ दीपक योवेळी कोणत्याही परिस्थितीत विधानसभेत पोहचण्यासाठी देव पाण्यात ठेवून बसले आहेत. शिरोड्यात ते निवडणूक लढवतील. या जागा पदरात पाडून घेण्यासाठी त्यांना भाजपाबरोबर कडवी झुंज द्यावी लागतेय. त्यात दामू नाईक यांची कसोटी लागली आहे व देवघेवीत भाजपा अध्यक्षांची दमछाक होऊ लागली आहे.

आज तरी दामू आपल्या स्वभावानुसार फोंडा, शिरोडा कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही, या पवित्र्यात आहेत. मगोपलाही वाटते, दामूंनी ताठर भूमिका घ्यावी, तावातावाने विधाने करावीत व आपल्या सापळ्यात गुरफटत जावे. म्हणजे मगोपला दाखवायचे आहे की भाजपानेच त्यांना झिडकारले आहे. वास्तविक मगोप जाणून आहे की भाजपाला यावेळी मगोपला आपल्या युतीतून दूर ठेवणे धोक्याचे आहे. या पक्षाला विरोधी आघाडी आणखी मजबूत व्हावी असे तीव्रतेने वाटते. काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष म्हणजे आरजीसह गोवा फॉरवर्ड यांची दणकट आघाडी बनल्यास भाजपा आपला ताठरपणा सोडेल व मगोपसमोर गुडघे टेकून उभी राहील. परंतु अजूनपर्यंत तरी तशी परिस्थिती दिसत नाही. आरजीला १५ जागे हवे आहेत. गोवा फॉरवर्डचेही काही खरे नाही. त्यात युगोडेपा, आप शिवाय नव्याने स्थापन होणारी गोवा काँग्रेस यांनी सवतासुभा उभा केलाच आहे.

भाजपा आपल्या नेहमीच्या स्वभावानुसार एकला चलोचा नारा सतत देऊ लागली आहे. काँग्रेसमुक्त भारतचा प्रयोग त्यांनी गोव्यात एवढा झकास वठवला की काँग्रेसचे निवडणुकीतले नरेटिव्ह ‘पक्षनिष्ठा’ बनले आहे. आम्हाला भरभक्कम मताधिक्य द्या, तेव्हा आमचे आमदार फुटणार नाहीत, असा त्यांचा नकारार्थी प्रचार सुरू आहे. तेव्हा तुम्ही गोव्यासाठी काय करणार हे आधी सांगा, असे त्यांना राजकीय निरीक्षकांना ऐकवावे लागते. काँग्रेसने प्रत्येक मतदारसंघात इतके प्रतिस्पर्धी तयार करून ठेवलेत की त्यांची समजूत काढतानाच नेत्यांना नाकीनऊ येईल. आम आदमीने वेगळी चूल मांडलीच आहे. शिवाय इतर प्रादेशिक पक्ष फणा काढून बसले आहेत. मगोपचा दुसरा सदस्य जीत आरोलकर तर प्रसारमाध्यमांसमोर जाऊन पक्षप्रमुख सुदिन ढवळीकरांपेक्षा आपल्याला मुख्यमंत्री प्रमोद सावंत अधिक निकट आहे असे सांगतात. हे सर्व दबावतंत्र मगोपला दोन तीन जागा देऊन बोळवण करण्यासाठीच आहे. भाजपा त्यात वाकबगार आहे आणि या राष्ट्रीय पक्षाच्या हातात त्यासाठी आयुधेही अधिक आहेत.

दुसऱ्या बाजूला काँग्रेसबरोबर युती करण्यासाठी आरजीने १५ जागांची मागणी केली आहे ती गेल्या निवडणुकीतील आपली १० टक्के मतसंख्या कायम आहे, हे गृहित धरून. सध्या आरजी वीरेश बोरकर यांच्या ताब्यात आला आहे. त्यांचे पक्षातील विरोधक मनोज परब समाजमाध्यमांवरून सतत फुत्कार सोडीत आहेत. त्यांचे पाठिराखे सांगतात, त्यानुसार आरजीच्या दोन्ही गटांतील संघर्ष निवडणूक आयोगापर्यंत जाऊन, महाराष्ट्रातील शिवसेनेत झाले तसे चिन्ह कोणा एकाच्या ताब्यात आले तर आरजीचा पाठिराखा वर्ग बिथरेल. मनोज परब यांच्या ताब्यात हे चिन्ह आल्यास वीरेश बोरकर यांचे अस्तित्व धोक्यात येईल. त्यामुळे संघटना व चिन्ह आपल्याकडेच राहील यासाठी आमदार वीरेश बोरकरांना शर्थीचे प्रयत्न करावे लागतील. या दोन्ही गोष्टी साध्य झाल्यास त्यांना काँग्रेसकडे वाटाघाटीच्या चर्चा करण्यास पाठबळ प्राप्त होईल. त्यानंतर मनोज परब यांचे अस्तित्व केवळ समाजमाध्यमांपुरते राहील.

मनोज परब हे पक्षात स्वतःचा वचक निर्माण करू शकले व पक्षाचा चेहरा बनले तरी स्वतः जिंकून येऊ शकले नाही, हे त्यांचे मोठे वैगुण्य. त्यात वीरेश बोरकर यांनी विधानसभा व बाहेर चांगली कामगिरी बजावली यात तथ्य आहे. मनोज परब सांगतात की, पक्षाच्या नेत्यांनीच त्यांना विधानसभेत योग्य ती रसद पुरविली, परंतु ती रसद त्यांनी सार्थकी लावली. आरजीची विचारधारा व कमकुवत वर्गाचा आवाज बनून वीरेश बोरकर विधानसभेत गर्जत. शिवाय त्यांनी ज्या पद्धतीने आंदोलने गाजविली व गरीब व आदिवासींचा बुलंद आवाज बनण्याचे काम केले, तेही वाखाणण्याजोगे. राष्ट्रीय पक्ष असल्याचा दावा करणाऱ्या व तीन सदस्य असणाऱ्या काँग्रेसलाही विधानसभा व बाहेर असा प्रतिवाद निर्माण करण्यास अपयश आले हे मान्य करावे लागेल.

वीरेश बोरकर यांनी आपल्या मतदारसंघातही विकासकामे धडाडीने करून घेतली आहेत ती त्यांना ते मुख्यमंत्र्यांना निकट असल्याने शक्य झाली, असे विरोधक बोलत असले तरी त्यांच्यापुढे भाजपाबरोबर राहाणे योग्य की विरोधी राजकारणाची कास धरताना काँग्रेस आघाडीत सामील होणे हितकारक आहे, हा स्वाभाविक प्रश्‍न होता, परंतु त्यांनी अचूक राजकारण्याचा वेध घेत विरोधी राजकारणाची कास धरली. त्यांच्या सांत आंद्रे मतदारसंघात आज हिंदू मतांचे प्राबल्य आहे. एकेकाळी हा ख्रिस्ती प्राबल्यामुळे काँग्रेसचा खात्रीचा मतदारसंघ असे. गेल्या १०-१५ वर्षांत अनेक मतदारसंघांचे स्वरूप पालटले. ख्रिस्ती मतदारांनी घरे बंद ठेवून युरोपची वाट धरली. त्यांना ‘पोगो’मुळे आरजी आपला वाटत होता. ‘पर्सन्स आॅफ गोअन ओरिजिन’ ही संकल्पना जरी त्यांच्यासाठी रोमांचक वाटत असली तरी ती कायदेशीर तत्त्वात बसणारी नाही.

असे सांगून विधानसभेत तिला स्थान नाकारण्यात आले. त्यानंतर मांडवी-जुआरीतून बरेच पाणी निघून गेले व काँग्रेसशी फटकून वागणारा हा पक्ष आज त्या पक्षाच्या मांडीला मांडी लावून जागा वाटपाची चर्चा करतो. याच वीरेश बोरकरांचे अनेक व्हिडीओ प्रसृत झाले आहेत, ज्यात ते काँग्रेसला भाजपाची बी टीम संबोधतात, भाजपाला आमदार पुरविणाऱ्या काँग्रेसवर विश्‍वास कसा ठेवायचा असा प्रश्‍न करतात. गोवा राखण यात्रेत ‘बाहेरच्यांचा’ भरणा पाहून नाके मुरडून झाली, परंतु त्यामुळे गोव्याची अस्मिता, अस्तित्व, स्थानिकांच्या रोजीरोटीवर संक्रांत, जमिनींचा सौदा, घरांवर होणारा कब्जा हे मुद्देही आरजी गालीच्याखाली ढकलणार काय? मग काँग्रेससोबत शय्यासोबत करीत आपल्या मतदारांसोबत वाटून घेण्यासाठी काय वेगळेपण त्यांच्याकडे शिल्लक राहील?

लक्षात घेतले पाहिजे की गेल्या निवडणुकीत आरजीकडे १० टक्के मते आली, कारण त्यांनी गोव्यात स्वबळावर निवडणूक लढवली. समाजातील अस्वस्थ, बेरोजगार युवक व कमकुवत घटक यांना हा पक्ष आपल्याकडे ओढू शकला कारण मनोज परब-वीरेश बोरकर यांनी त्यांना त्यांच्या भूमीत आत्मविश्‍वासाने, आत्मगौरवाने उभे राहण्याचे बळ दिले होते. आज दिल्लीत तरुण मुले प्राणपणाने आक्रंदतात व कोणाची कसलीही भीती बाळगत नाहीत. आरजीपी तरुण मुलेही याच पठडीतील होती. धरून चालूया, मनोज परब व त्यांचा गट पक्ष सोडून गेला तरी वीरेश बोरकर यांच्याकडे त्यांच्या पाठिराख्यांचे बळ आहे तसेच शाबूत आहे.

परंतु मग काँग्रेससोबत गेल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल नाही का होणार? लक्षात घ्या, आरजीला संघटना चालविण्यासाठी परदेशस्थ गोवेकरांकडून मोठी रसद पुरविली जायची. सांत आंद्रेसारख्या मतदारसंघात देशाबाहेरून पक्षाचा मोठा प्रचार झाला. त्यांनी प्रत्यक्ष येऊन, फोन करून आपापले मित्र, नातेवाईकांना समजावले. आरजीची मतसंख्या वाढली त्याचे बरेचसे श्रेय या परदेशस्थ गोवेकरांना जाते, परंतु आरजीच्या मतदारांमध्ये तेवढीच संख्या हिंदूंचीही आहे. म्हणून उत्तर गोव्यातही ते जम बसवू शकले. भाजपाही त्याचमुळे सावध झाली. मतविभागणी टाळण्यासाठी काँग्रेसला आरजीची साथ हवी आहे, परंतु सासष्टी हा काँग्रेसचा परंपरागत बालेकिल्ला आहे. आज जर काँग्रेसच्या बाजूने राजकीय वारे वाहात असेल तर तेथील परंपरागत जागा आरजीला देणे म्हणजे स्वतःची ताकद कमी करण्यासारखे आहे. आरजीने भाजपाचे किल्ले ढासळवले तरच या युतीचा काँग्रेसला फायदा आहे. उत्तर गोव्यात जेथे काँग्रेसची ताकद नाही तेथेच तुमची शक्ती पणाला लावा हे काँग्रेसला त्यांना सांगावे लागेल.

२०२७ च्या निवडणुकीत वीरेश बोरकर यांची कसोटी लागेल. मनोज परब त्यांच्या मार्गात अनेक अडचणी निर्माण करतील, परंतु निवडणुकीत जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेणे, आपली संघटना आणखी बळकट बनविणे व स्वतः चांगल्या मताधिक्याने जिंकून येणे हे त्यांच्यासाठी आव्हान असेल. १० टक्के नसली तरी किमान सात आठ टक्के मताधिक्य कायम राखावे लागेल. त्यांना किमान तीन ते पाच जागे जिंकून आणावे लागतील. वास्तविक राज्यातील या तिन्ही - मगोप व आरजी - गोवा फॉरवर्डसुद्धा प्रादेशिक पक्षासमोरचे आव्हान समान आहे. तिघांनाही नव्याने पक्षाची उभारणी करायची आहे. त्यासाठी जादा जागा जिंकायच्या आहेत. मतांची टक्केवारी वाढवायची आहे. निवडणुकीनंतर जादा सत्तास्थाने पदरात पाडून घ्यायची आहेत.

- तुम्हाला काय वाटते, त्यासाठी दुसऱ्या पक्षाबरोबर जाणे त्यांच्यासाठी योग्य की स्वतंत्रपणे निवडणूक लढवणे उचित?

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sunanda Sharma: लाईव्ह कॉन्सर्टमध्ये भयंकर प्रकार, गाणं सुरू असतानाच चाहता थेट स्टेजवर गेला अन्... सुनंदा शर्मा घाबरून ओरडली Watch Video

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाकडून पेन्शनधारकांना मोठी अपेक्षा! किमान 45,000 पेन्शन देण्याची मागणी, फॅमिली पेन्शनमध्येही 50 टक्के वाढीचा प्रस्ताव

Sai Baba Temple Takeover Case: बोरी साईबाबा मंदिर ताबा प्रकरणात नऊ जणांचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळले; बनावट कागदपत्रांवर न्यायालयाचे ताशेरे

One Goa Mega Residential Project: 161 दिवसांचे आंदोलन, आता ग्रामसभेत संघर्षाची शक्यता; 'वन गोवा' प्रकल्पाचा मुद्दा तापणार

'गोवा मुक्ती'ला विलंब नेहरूंमुळेच- मुख्‍यमंत्री प्रमोद सावंत

SCROLL FOR NEXT