मागील तीन आठवड्यात भरमसाठ ‘अकाली व अपघाती’ निधनाने गोवा हादरला आहे. अकाली निधनाचे आकडे समोर येत नाहीत, पण ते अपघाती मृत्यूपेक्षाही जास्त आहेत.‘काळापुढे कुणाचे चालत नाही’ अशा समजुतीवर समाधान मानायची पाळी आली आहे. पण अशा आघात झालेल्या स्वकियांना वेळीच मानसिक आधार देणारी शासकीय व्यवस्था तयार होणे गरजेचे आहे.
सरकारी सेवेत असताना समाज कार्य करणे, त्या समाजकार्याला जनतेकडून मिळणारा प्रतिसाद थेट राजकर्त्यांच्या डोळ्यात भरणे व त्यातून शासकीय सतावणूक सुरू झाली तरी त्याचा समाजकार्य न थांबिविणारे सरकारी कर्मचारी अगदी अपवादाने सापडतात. असेच अपवादात्मक व्यक्तिमत्व म्हणजे नेहरू युवा (आताच्या माय भारत) केंद्राच्या गोवा-महाराष्ट्र विभागाचे निवृत्त संचालक कालिदास घाटवळ. परवा त्यांचा निवृत्तीपर सत्कार सोहळा मंगेशी येथे झाला.
त्यावेळी केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद भाऊंसोबत मीही व्यासपीठावर उपस्थित होतो. सत्काराला उत्तर देण्यासाठी घाटवळ उभे राहिले, तेव्हाच या लेखाच्या मथळ्याचा जन्म झाला. औचित्य असे होते की, घाटवळ यांनी सरकारी सेवेत असेपर्यंत आपण कुठलाही सत्कार स्वीकारणार नाही, असे स्वत:साठी बंधन घालून घेतले होते. त्यामुळे नेहरू युवा केंद्राच्या मुशीतून वर आलेल्या युवकांना मनात असूनही त्यांचा सत्कार करणे जमत नव्हते.
हल्लीच ते निवृत्त झाले व त्यांच्या मार्गदर्शनातून पुढे आलेल्या एका सामाजिक सेवा संस्थेने त्यांचा मंगेशीत सत्कार सोहळा आजोजित केला. त्यांच्या सत्कारासाठी मुख्य अतिथी म्हणून श्रीपाद भाऊंना आमंत्रित केले होते. कार्यक्रम संध्याकाळचा होता, त्यामुळे श्रीपाद भाऊ पर्वरीत वाहतूक कोंडीत थोड्या वेळासाठी अडकले व कार्यक्रम थोडा उशिरा सुरू झाला.
कार्यक्रमाचे आयोजन नेहरू युवा केंद्राच्या तालमीतील युवकांनी केलेले असल्याने सगळी भाषणे आटोपशीर झाली. सत्काराच्या आधी घाटवळ यांच्यासोबत स्वयंसेवक म्हणून काम केलेल्या काही युवकांनी आपले काही अनुभव सांगितले होते. त्यातील एका युवकाने, हल्ली आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे, त्यात नेहरू युवा केंद्र समुपदेशनाचे कसे कार्य करते हे सांगताना खुद्द घाटवळ यांचे उदाहरण दिले.
त्याने सांगितले की, घाटवळ यांच्या आयुष्यात पंचवीस वर्षापूर्वी असाच एक कठीण प्रसंग आला होता व जर त्यांनी त्यावेळी त्या परिस्थितीचा सकारात्मकरित्या सामना केला नसता तर आजचा दिवस पाहताच आला नसता. आता हा प्रसंग नेमका कोणता, हे सांगितले नसले तरी आम्हा बऱ्याच जणांना एकदम पंचवीस वर्षे मागे नेऊन सोडले.
श्रीपादभाऊंच्या हस्ते झालेला सत्कार स्वीकारल्यानंतर शिष्टाचाराला अनुरूप घाटवळ भाषण करायला उभे राहिले, तसे त्यांच्या तोडून शब्दच फुटेना. तीस सेकंद ते स्वत:ला सावरत होते. हा अती छोटा वाटणारा अवधी प्रत्यक्षात अकाली-अपघाती निधनाच्या स्वकियांना आजन्म वेदना किती खोलवर रुजलेल्या असतात, याचा प्रत्यय होता. पंचवीस वर्षापूर्वीचा काळ. महिलांनी स्कूटर चालविणे तेव्हाच कुठे सुरू झाले होते.
‘महिला चालकाचे अपघाती निधन’ अशी बातमी तेव्हा दुर्मिळ होत्या. अशा वेळी ‘शांती तेंडुलकरचे अपघाती निधन’ या बातमीने संपूर्ण गोवा हळहळला. शांती तेंडुलकर या घाटवळ साहेबांच्या अर्धांगिनी व स्वयंसेवकाने ज्या घटनेची आठवण करून दिली, ती याच घटनीची. सौ व श्री दोघेही केंद्र सरकारचे कर्मचारी, त्या केंद्रीय कामगार प्रशिक्षण केंद्राच्या वरिष्ठ अधिकारी तर हे नेहरू युवा केंद्राचे अधिकारी.
त्यावेळी एका राजकीय नेत्याने आपले केंद्रातील वजन वापरून गोव्याबाहेर बदली करायची व मागाहून श्रीपादभाऊंनी त्यांना परत गोव्यात आणायचे, असा एक अलिखित नियम तेव्हा तयार झाला होता, अर्थात याची विस्तृत माहिती घाटवळ साहेबांनी आपल्या भाषणात दिली. भाषणाच्या सुरवातीला त्यांच्या भावनिक होण्यात या पार्श्वभूमीची किनार होती. ही घटना होण्यापूर्वी श्रीपादभाऊंनी त्यांची पुण्याहून पुन्हा गोव्यात बदली करून घेतली होती.
तिचे कार्यालय फोंड्यात असल्याने घाटवळ साहेबांनी फोंड्यात एक फ्लॅट घेतला होता व त्यांची फोंड्यात स्थायिक व्हायची तयारी सुरू होती. अशातच हा आघात झाला व त्यांनी फोंड्यात स्थायिक व्हायचा विचार सोडून दिला. पत्नीच्या दु;खद आठवणी मनाला त्रास करतील, म्हणून ज्या फोंड्यापासून आपण दूर राहिलो, त्याच परिसरात आपला सत्कार होत आहे, हे डोळ्यांसमोर तरळल्याने ते भावनावश झाले होते.
२५ वर्षांपूर्वीचा तो त्याकाळचा दुर्मिळ स्वयंअपघात, ज्याचे वर्णन ‘रस्त्याच्या कठड्याला स्कूटरची धडक’ एवढेच होते, पण या एका घटनेने स्वकियांचा भावनिक कठडा कसा कायमचा तुटला, याचे विवेचन काही होत नाही. मागील तीन आठवड्यात भरमसाठ ‘अकाली व अपघाती’ निधनाने गोवा हादरला आहे. वातावरण अगदी सुन्न करणारे आहे.अपघाती निधनाचे आकडे बातम्यातून समोर येताहेत, पण अकाली निधनाचे आकडे समोर येत नाहीत, पण ते अपघाती मृत्यूपेक्षाही जास्त आहेत.
‘काळापुढे कुणाचे चालत नाही’ अशा समजुतीवर समाधान मानायची पाळी आली आहे. पण अशा आघात झालेल्या स्वकियांना वेळीच मानसिक आधार देणारी शासकीय व्यवस्था तयार होणे गरजेचे आहे. अपघात कसे टाळावेत यावर अनेक संकीर्तने होतात. पण अपघातानंतरच्या आघातातून कसे सावरायचे हे कुणी सांगत नाही. यावर दीर्घकालीन उपाय योजनेची गरज आहे. शेवटी नेहमीचा प्रश्न उरतोच, सुरवात कुणी करायची?
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.