Goa Accident: गोव्यात दर 31 तासांनी रस्ते अपघातात तर दर 65 तासांनी एकाचा बुडून जातोय जीव; अपघाती मृत्यूंचे धक्कादायक वास्तव आले समोर

Goa Accident Deaths 2026: नद्या, तलाव, समुद्र आणि इतर पाणवठ्यांवर बुडून मृत्यू होण्याच्या घटनांमध्येही चिंताजनक वाढ झाली आहे.
Goa Accident Deaths 2026
Goa AccidentDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: गोव्यात एकीकडे रस्तेअपघातांमधील बळींची संख्या नियंत्रणाबाहेर जात असताना दुसरीकडे नद्या, तलाव, समुद्र आणि इतर पाणवठ्यांवर बुडून मृत्यू होण्याच्या घटनांमध्येही चिंताजनक वाढ झाली आहे. यंदा १ जानेवारी ते २१ जून या १७२ दिवसांच्या कालावधीत रस्तेअपघातांमध्ये १३२ जणांचा, तर बुडून ६३ जणांचा मृत्यू झाला. म्हणजेच राज्यात सरासरी दर ३१.२७ तासांनी एकाचा अपघातात तर दर ६५.५२ तासांनी एकाचा बुडून मृत्यू होत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे.

रविवारी कुळे येथे दुधसागर नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन युवकांचा बुडून मृत्यू झाला. त्याआधी शनिवारी भोम येथे झालेल्या भीषण कार अपघातात कर्नाटकातील होस्पेट येथील त्रिलोकनाथ हिरेमठ यांचा मृत्यू झाला, तर अन्य चार जण जखमी झाले. या दोन घटनांनी राज्यातील वाढत्या अपघाती मृत्यूंच्या प्रश्नाकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले आहे.

Goa Accident Deaths 2026
Goa Resort Drowning: जलतरण तलावात बुडून पुण्यातील पर्यटकाचा मृत्यू; 'ओल्ड अँकर रिसॉर्ट'मध्ये दुर्दैवी घटना

वाहतूक पोलिस विभागाच्या आकडेवारीनुसार, यंदा २१ जूनपर्यंत राज्यात १२६ जीवघेणे अपघात घडले असून त्यात १३२ जणांना जीव गमवावा लागला आहे. मृतांमध्ये दुचाकीस्‍वारांची संख्या सर्वाधिक ८३ एवढी आहे. त्याखालोखाल पादचारी (१५), दुचाकीवरील मागील प्रवासी (१४), इतर वाहनचालक (११), वाहनातील प्रवासी (६),सायकलस्वार (१) आणि अन्य प्रकारांतील दोन जणांचा समावेश आहे.

बुडून मृत्यू होणाऱ्यांची संख्या देखील सातत्याने वाढत आहे. यंदाच्या १७२ दिवसांत ६३ जणांचा बुडून मृत्यू झाला असून अनेक घटना नदी, तलाव व धबधब्यांच्या परिसरात घडल्या आहेत. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ही स्थिती अधिक गंभीर होण्‍याची भीती व्‍यक्त केली जात आहे.

Goa Accident Deaths 2026
Belagavi-Goa Highway Accident: बेळगाव-गोवा महामार्गावर काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; ओव्हरटेकच्या नादात 2 जणांचा जागीच मृत्यू, 3 गंभीर

अपघातांची संख्या ७.५७ टक्क्यांनी वाढली

गोवा पोलिसांच्या अधिकृत आकडेवारीनुसार, २०२५च्या तुलनेत २०२६ च्या पहिल्या पाच महिन्यांत रस्तेअपघातांमध्ये ७.५७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. २०२५ मध्ये जानेवारी ते मे या कालावधीत १०१७ अपघातांची नोंद झाली होती. यंदा त्यात ७७ अपघातांची भर पडून ही संख्या १०९४ वर पोहोचली आहे. गंभीर जखमी होणाऱ्यांच्या संख्येत १८.८९ टक्क्यांची वाढ झाली आहे. २०२५ मध्ये ९० जण गंभीर जखमी झाले होते, तर यंदा ही संख्या १०७ वर पोहोचली आहे.

कुळेची दुधसागर नदी मृत्यूचा सापळा

कुळे येथील दुधसागर नदी परिसरात अवघ्या नऊ दिवसांच्‍या कालावधीत सहाजणांचा बुडून मृत्यू झाल्याने हा भाग पुन्हा चर्चेत आला आहे. १३ जून रोजी वास्कोतील चौघांचा (त्यात तीन सख्खे भाऊ) तर २१ जून रोजी दोन १७ वर्षीय चुलत भावांचा बुडून मृत्यू झाला. यंदा जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत ३३ जणांना, एप्रिलमध्ये ११, मे महिन्यात ५ आणि जून महिन्यात आत्तापर्यंत ११ जणांना बुडून जीव गमवावा लागला आहे.

या घटनांची मूळ कारणे शोधली पाहिजेत. केवळ आकडेवारी मांडून चालणार नाही, तर मृत्यूंमागील कारणांचा सखोल अभ्यास करून प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणे आवश्यक आहे.

- रोलंड मार्टिन्स (‘गोवा कॅन’चे समन्वयक)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com