GMC Hospital Goa medical services Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Goa GMC: गोमेकॉतील अभूतपूर्व गोंधळ आणि गोंधळी

Goa Medical College: आमची मानखंडना केली, सर्वांसमक्ष पाणउतारा केलात, बदनामी केलीत, तरी आम्ही काय आहोत, हे आम्हाला माहीत आहे. कितीही अनुदात्त वागलात तरी आमचे उदात्त असणे तुम्ही हिरावून घेऊ शकत नाही.

Sameer Panditrao

डॉ. ऑस्कर रिबेलो

Goa GMC News: गोवा मेडिकल कॉलेजमध्ये झालेला अभूतपूर्व असा राजकीय व वैद्यकीय गोंधळ थांबण्याची मी आतुरतेने वाट पाहिली. आताही तो थांबलाय की सुरूच आहे, याविषयी गोंधळ आहे. यावर काही तरी लिहा, असा माझे डॉक्टर मित्र धरत होते. डॉक्टर असूनही माझे अक्षर वर्तमानपत्रातील संपादकांना वाचता येते, अशी त्यांची अत्यंत प्रामाणिक समजूत.

त्यातही डॉक्टरांचे दोन गट होते, जसे ते ‘संप संपवावा’ व ‘संप संपवू नये’ असे दोन गट होते, अगदी तसेच. डॉक्टरांची मानखंडना करणाऱ्या विश्वजित राणेंना अजिबात दयामाया न दाखवता त्यांची शब्दांनी शस्त्रक्रिया करा, असे सांगत होते तर काही डॉक्टर हलक्या आवाजात ‘विश्वजितांवर काय क्रिया करायची ती करा, पण भाजपला शस्त्र लागणार नाही, याची काळजी घ्या’.

बहुधा, जसे एलोन मस्क रिपब्लिकन पक्षासाठी आहेत, तसे विश्वजित हे जणू भाजपचा ‘एक्स’ फॅक्टर असावेत. संभाव्य धोके ओळखून त्या डॉक्टरांना माझ्यासोबत लिहा म्हणालो, तेव्हा जे गायब झाले आहेत, ते नर्शींनाही शोधून सापडत नाहीत! माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी झाडू पाहणाऱ्या डॉक्टरांना त्यांचे स्वत:चे खासगी हॉस्पिटल, क्लिनिक असल्याचे अचानक स्मरण जाहले व तिथे येणाऱ्या पेशंटांना गोळ्या देण्यासाठी बहुधा पळाले असावेत. असो!

तसेही मी जगातला एकमेव डॉक्टर उरलोय बहुतेक, जो रुग्णांना तपासून स्वत:चे पोट भरण्याऐवजी लष्काराच्या भाकऱ्या भाजत फिरतोय. भाजायचे ठरवलेच आहे तर चला सुरुवातीपासून सुरुवात करूया. सुरुवात करण्यासाठी एक जमलेली, परंपरागत राजकीय भट्टी म्हणजे विश्वजित राणे. आपण माझ्याशी सहमत नसलात तरी हरकत नाही, पण...

मी हे शपथेवर सांगेन की, विश्वजित राणे हे गोव्याचे आजवरचे सर्वोत्तम आरोग्यमंत्री आहेत. जीएमसीमध्ये त्यांनी एकहाती उभारलेल्या सुविधा खरोखरच उच्च दर्जाच्या आहेत, याबद्दल अजिबात दुमत नाही.

सुपर स्पेशालिटीमधील सेवा जागतिक दर्जाच्या आहेत. हा दर्जा राखल्याने आरोग्य क्षेत्रातील खाजगी इस्पितळांचा नफा प्रचंड प्रमाणात कमी झाला आहे. हे सत्य मी त्यांना अनेक सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये वैयक्तिकरीत्या सांगितले आहे आणि आता मी ते जाहीरपणे सांगेन.

परंतु, जसे आरोग्य क्षेत्रासाठी ते वरदान ठरले आहेत, तसेच गोव्याच्या पर्यावरणासाठी ठरले असते तर गोव्याच्या भविष्याची चिंता करण्याचे काही कारणच उरले नसते. टेकड्या, जंगले, नद्या आणि शेतजमिनी नष्ट झाल्या नसत्या.

आता करपण्याआधी ही भाकरी परतवून पुन्हा गोमेकॉकडे वळू. इथे जे काही अवमाननाट्य घडले व त्याचे चित्रीकरण करून प्रसारणही केले गेले, ते करण्यामागे बहुधा उत्कृष्ट माहितीपट गटात ऑस्कर (मी नव्हे हो!) नॉमिनेशन मिळवण्याची इच्छा असावी. याचे प्रसारण झाले नसते तर त्यानंतर जे घडले, ते घडलेच नसते.

एका डॉक्टरच्या मानखंडनेचा जाब विचारण्यासाठी सगळे डॉक्टर एकत्र आले, ही अनेक वर्षांत न पाहिलेली गोष्ट या निमित्ताने घडली. सगळ्या डॉक्टरांना मानाचा मुजरा. डॉक्टरांच्या या एकत्र येण्याचे पडसाद राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर उमटले. केवळ डॉक्टर म्हणूनच नव्हे तर रुग्ण, रुग्णाचे नातेवाईक म्हणूनही, या देशातील प्रत्येक व्यक्ती कधी ना कधी ‘व्हीआयपी कल्चर’ची बळी ठरली आहे.

‘ज्या पद्धतीने, जिथे अवमान झाला त्याच पद्धतीने व तिथेच माफीही मागावी’, या पूर्ण होण्याची अजिबातच शक्यता नसलेल्या मागणीचा यथोचित फायदा दोन प्रमोदांनी उचलला. एक राज्याचे प्रमुख व दुसरे एका वृत्तवाहिनीचे प्रमुख. नाडीपरीक्षेत तज्ज्ञ असणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी प्रत्येकाच्या नाड्या आपल्या हाती घेत अनेकांना त्यांचे वस्त्रहरण होण्यापासून वाचवले. सावंत-शिष्टाई यशस्वी झाली व आचार्यांना टीआरपी मिळाली. बाकी घोडकिरेकरांचे ‘अधरं मधुरं वदनं मधुरं, संपं, विच्छेदनं मधुरं, मधुराधिपते: अखिलं मधुरं’ झाले. त्याची गोडी अनिर्वचनीय होती.

आता शेवट मधू मधुरं असा गोड झाल्यानंतर गोमेकॉचे कामकाज सुरळीत चालावे, यासाठी काही मागण्या पूर्ण केल्या पाहिजेत.

जीएमसी कर्मचाऱ्यांवर मर्यादित कामाचा भार असावा. त्यांना ३६ तासांची ड्यूटी करायला लावणे रुग्णांच्या आरोग्यास हानिकारक आहे. सल्लामसलत करण्यासाठी डॉक्टरांच्या अपॉइंटमेंट्स फक्त काही अ‍ॅप-आधारित सेवेद्वारे घेतल्या जाव्यात. ओपीडीबाहेर गर्दी कमी करण्यासाठी त्यांच्या नावाचा पुकारा करून त्यांना ओपीडीत घेऊन जाण्यासाठी अतिरिक्त कर्मचारी नेमावेत. पत्रकारांसाठी व्हिटॅमिन इंजेक्शन्स घरपोच पोचवाव्यात.

लवकरात लवकर दोन वेब-पोर्टल स्थापन कराव्यात. एक म्हणजे ‘रुग्ण तक्रार पोर्टल’, जिथे रुग्णांना निकृष्ट सेवेबद्दल तक्रार करण्याचा आणि त्याबद्दल स्पष्टीकरण देण्याचा अधिकार असावा.

देखरेख समितीवर दोन ज्येष्ठ आदरणीय नागरिक आणि दोन निवृत्त डॉक्टरांची नियुक्ती करावी. जर त्रुटी आढळल्या तर, प्रथम इशारा व पुन्हा घडल्यास कारवाई करणे आवश्यक आहे. दुसरे वेब-पोर्टल ‘डॉक्टर/आरोग्य कर्मचारी तक्रार पोर्टल’ (हे दोन्ही पोर्टल जीएमसीमध्येच प्रत्यक्ष सक्रिय असले पाहिजेत) स्थापन करावे.

जीएमसी किंवा सरकारमधील कोणत्याही अधिकाऱ्यांकडून छळ, धमकी यांसारख्या कोणत्याही सूडाच्या कृती त्वरित हाताळल्या गेल्या पाहिजेत. या बाबी सहसा तांत्रिक असल्याने, निवृत्त न्यायाधीश येथे असणे योग्य ठरेल. पीडित डॉक्टरांचा छळ अजिबात सहन केला जाऊ नये. आपण अजूनही अधिकृतपणे किमान हुकूमशाही राजवटीत नाही.

रुग्णालयांमध्ये व्हिडिओग्राफीला परवानगी असली पाहिजे; अर्थात, कॅज्युअल्टी, ओटी आणि आयसीयू आणि रुग्णांची स्वच्छतागृहे वगळून. रुग्णाच्या नातेवाईकांना डॉक्टर आणि परिचारिकांकडून झालेल्या गैरवर्तनाचे आणि अपमानास्पद वर्तनाचे चित्रीकरण करण्याचा आणि नंतर प्रसंगी त्या न्यायालयांमध्ये पुरावा म्हणून वापरण्याचा पूर्ण अधिकार असला पाहिजे.

तसेच रुग्णाच्या नातेवाइकांचे आणि सेवकांचे अरेरावीचे, गुंडगिरीच्या वर्तनाचे चित्रीकरण करण्याचा पूर्ण अधिकार डॉक्टर आणि परिचारिकांना असला पाहिजे. त्याचा पुरावा म्हणून वापर करण्याचा अधिकारही असावा.

थोडक्यात, जीएमसीमधील डॉक्टर, अधिकारी व रुग्ण यांच्यातील तंटे, तणाव कमी व्हावेत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे डॉक्टरांना त्यांचे काम करण्यासाठी मनःशांती असणे आवश्यक आहे. कारण, डॉक्टरी पेशा हा भावनिकदृष्ट्या प्रचंड थकवणारा पेशा आहे. त्याला राजकीय सूडचक्रात पिचू देऊ नका.

ताजा कलम:

डोक्यावर कायम टांगती तलवार असलेला असिधाराव्रती पेशा म्हणजे डॉक्टरकी. ‘गरज सरो वैद्य मरो’, असे व्यवहारात असले तरीही आम्ही ‘वैद्यो नारायणो हरि:’ आहोत हे आमच्यासकट सर्वांना माहीत आहे. आमची मानखंडना केली, सर्वांसमक्ष पाणउतारा केलात, बदनामी केलीत, तरी आम्ही काय आहोत, हे आम्हांला माहीत आहे. कितीही अनुदात्त वागलात तरी आमचे उदात्त असणे तुम्ही हिरावून घेऊ शकत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

POP Ganesh Idol: गोव्यात प्लास्टर ऑफ पॅरिस गणेशमूर्तींच्या विक्रीवर कठोर बंदी घाला; हिंदू जनजागृती समितीची मागणी

Jitesh Sharma: लॉर्ड्समध्ये जितेश शर्माची 'फजिती'! 'या' खेळाडूमुळे मिळाली एन्ट्री, पाहा VIDEO!

Comunidade Land Goa: कोमुनिदादींच्या जमिनी केवळ गावकार व भागधारकांच्याच; हस्तक्षेप करण्याचा राज्य सरकारला अधिकार नाही

Viral Video: जगाला वेड लावणारा 'ऑरा फार्मर'! 11 वर्षांचं पोर बनलं सोशल मीडियावर स्टार; त्याचा अनोखा डान्स तुम्ही पाहिला का?

Nagpur Goa Highway: गोव्यात नेमके कोणते शक्तिपीठ? महामार्ग विरोधात रक्ताच्या अखेरच्या थेंबापर्यंत लढण्याचा राजू शेट्टींचा निर्धार

SCROLL FOR NEXT