Goa CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

गोव्यात 'दरोड्याचे भय' दिवसेंदिवस! 'भिवपाची कांयच गरज ना' म्हणणाऱ्या CM प्रमोद सावंतांच्या आश्वासनावर प्रश्नचिन्ह

Goa: ‘अतिथी देवो भव’ हे तत्त्व अंगीकारलेले गोवेकर सध्या एका अज्ञात अशा भीतीच्या छायेत वावरत आहेत.

गोमंतक ऑनलाईन टीम

‘अतिथी देवो भव’ हे तत्त्व अंगीकारलेले गोवेकर सध्या एका अज्ञात अशा भीतीच्या छायेत वावरत आहेत. केवळ शहरांतील गर्दीत रहाणाऱ्यांनाच नव्हे, तर गावांत एकाकी रहाणाऱ्यांनाही ही भीती सतावत आहे. या दिवसांत अनेक भागांत पडत असलेल्या दरोड्यांमुळे दिवसाढवळ्याही घराची वा फ्लॅटांची दारे उघडी ठेवण्यास गोंयकार धजावत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. आपले मुख्यमंत्री प्रमोद सावंत जरी गोंयकारांना ‘भिवपाची कांयच गरज ना’ असे सांगत असले तरी लोकांना त्यातून मुळीच दिलासा मिळत नाही.

या आठवड्यात बायणा -वास्को येथे गजबजलेल्या भागांत पडलेला दरोडा व हिंसाचाराच्या अन्य घटनांनंतर मुख्यमंत्र्यांनी परवा सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावून काही सूचना केल्या. पण गेल्या वर्षभरातील कायदा व सुव्यवस्था स्थितीवर नजर फिरविली तर या बैठकीचा खरेच काही परिणाम होईल का, असा प्रश्न पडतो. कारण गोव्यात दोन ते तीन आयपीएस कॅडरचे अधिकारी पोलिस महासंचालक, पोलिस महानिरीक्षक अशा पदांवर आहेत पण त्यांचा वचक खात्यावर असल्याचे दिसत नाही.

कारण अशा अधिकाऱ्यांनाच केवळ नव्हे तर पोलिस प्रशिक्षण घेतलेल्या कोणालाही एखाद्याच्या नजरेस नजर भिडविताच तो कोण आहे, गुन्हेगार की सामान्य व्यक्ती याची कल्पना यायला हवी. पण गोव्यात सध्या त्याचीच वानवा आहे व तेच अशा घटना वाढण्याचे कारण तर नव्हे ना असे वाटायला लागते.

एकेकाळी साधी चोरी झाली वा रस्त्यावर अपघात घडला की अपुऱ्या पोलिसमनुष्यबळाची वा वाहने आदी साधनबलाची वानवा असल्याची कारणे पुढे केली जात होती. पण आता गरजेपेक्षा अधिक मनुष्यबळ व अत्याधुनिक साधने या यंत्रणेला दिलेली आहेत मग गंभीर स्वरूपाचे गुन्हे का वाढत आहेत याचा आत्मशोध संबंधितांनी घेणे गरजेचे ठरले आहे.

एके काळी एक पोलिस प्रमुख व दोन पोलिस उपअधीक्षक संपूर्ण गोवा सांभाळत होते. माझ्या आठवणीप्रमाणे अरुण भगत (पोलिस प्रमुख) हे ऐंशीच्या दशकात अशी जबाबदारी सांभाळत होते, तर दक्षिणेत व उत्तरेत एकेक पोलिस उपअधीक्षक होते. अर्थात त्यावेळी गोव्याची लोकसंख्या जशी मर्यादित होती तसेच विविध प्रश्नही मर्यादित होते. आज ते वाढलेले आहेत पण त्याचबरोबर विविध दर्जाच्या पोलिस अधिकाऱ्यांच्या संख्येतही अमर्याद वाढ झालेली आहे.

प्रत्येक तालुक्यात पोलिस उपअधीक्षक आहेत, त्याशिवाय वाहतूक, अमली द्रव्य, आर्थिक गुन्हे सारखे विभाग वेगळे अधिकारी सांभाळतात. असे असतानाही गुन्हे तपास व नियंत्रण या आघाडीवर सारा आनंदीआनंदच आहे! काही प्रकरणात संशयितांना चोवीस तासांत पकडल्याची शेखी मिरविण्यात काही अधिकारी धन्यता अनुभवतात त्याऐवजी गुन्हे घडण्याआधीच पोलिसांना ती माहिती का मिळू नये असा मुद्दा उपस्थित होतो

मला आठवते आमच्या शालेय अभ्यासक्रमात एक पाठ होता त्यांत लंडन मधील पोलिस(बॅाबी) गुन्हा घडण्याअगोदर त्या ठिकाणी म्हणे हजर होतो. इतकी तेथील पोलिस हेरगिरी जबरदस्त असे. ती व्यवस्था आपल्या पोलिस यंत्रणेने का अवलंबू नये. गुन्हे घडल्यावर गुन्हेगारांना पकडण्यासाठी धावपळ करण्याऐवजी गुन्हाच घडणार नाही असे नियोजन का करू नये असा प्रश्न उपस्थित होतो.

गेल्या वर्षभरांत गोव्यात तीन प्रमुख दरोडे पडले. त्याशिवाय अन्य अनेक चोऱ्या वा घरफोड्या झाल्या त्या वेगळ्याच. पण या मुख्य दरोड्यात आंतरराज्य व म्हापसा येथील डॉ.घाणेकर यांच्या बंगल्यावरील दरोड्यांत तर बांगला देशमधील गुन्हेगारांचा हात असल्याचा व ते नंतर तेथे पळाल्याचा शोध पोलिसांनी लावला.

त्यात जर तथ्य असेल तर बांगलांतील दरोडेखोर गोव्यात आल्याचा सुगावाही या यंत्रणेला का लागू नये? गेल्या वर्षी दोनापॅाल येथील एका उद्योजकाच्या बंगल्यावर पडलेल्या दरोड्यानंतर या यंत्रणेने खरे तर सावधगिरी बाळगणे गरजेचे होते पण नेहमीप्रमाणे ते गाफिल राहिले व त्यामुळे यंदा म्हापशातील दरोडा त्याच धर्तीवर पडला. या आठवड्यांतील बायणा येथील दरोडाही त्याच प्रकारचा आहे.

आता पोलिस अधिकारी काहीही सांगोत पण पोलिस खात्याची खबरे ही व्यवस्था आता अस्तित्वात नाही हे जसे खरे आहे तसेच रात्री कोणीच गस्त घालत नाही की पाळत ठेवत नाही हे या घटनांनी दाखवून दिले आहे. आता सगळेच या घटनांमागे परप्रांतीय असल्याचा कांगावा करत आहेत व ते एका अर्थाने खरे आहे. विविध भागांत राहणारे भाडेकरू, विविध व्यवसायासाठी रात्री बेरात्री फिरणारे यांवर कोणाचाच वचक नाही.

भाडेकरूंची पडताळणी वगैरे केवळ स्टंट आहे. दिवसा वा रात्री रस्त्यावर आढळणारे साठ ते सत्तर टक्के लोक हे परप्रांतीय असतात. तशातच रेल्वे गाडी येऊन थांबली की त्यातून खांद्याला बॅगा लटकावलेले शेकडो लोक उतरून चालतात. त्यांची पडताळणी कोण करणार, अशा लोकांची पडताळणी केली तर अनेक संशयित उघड होण्याची शक्यता आहे. पण राजकीय कारणास्तव अशी पडताळणी होत नाही. उलट त्यांना पाठीशी घालण्याचे प्रकार होतात.

परवा बायणा येथे पडलेला दरोडा बोलका आहे. सहाव्या मजल्यावरील फ्लॅटांत राहणारे नायक यांच्याकडे इतके दागिने व रोकड आहे ही माहिती बाहेर कशी फुटली. संशयित उत्तररात्री टोळी करून येतात व लिफ्टमधून थेट सहाव्या मजल्यावर जातात, ग्रील्स नसलेली खिडकी उघडून आता प्रवेश करतात व कार्यभाग उरकल्यावर त्याच खिडकीतून बाहेर येऊन लिफ्टमधून खाली उतरतात.

हे सगळेच मती कुंठित करणारे आहे. हे संशयित जेथून कुठून आले व बायणात गेले व वाटेत त्यांना पोलिस गस्त सापडली नाही त्यावरून एकंदर स्थितीवर प्रकाश पडतो. म्हापशातील घाणेकर प्रकरणातील संशयितही असेच खुलेआम निघून गेले होते. त्यावरून पोलिस यंत्रणेने आपण नेमके कुठे कमी पडतो वा चुकतो त्याचा अभ्यास करून आपली कार्यपद्धती सुधारावी लागेल.

- प्रमोद प्रभुगावकर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Aiden Markram Catch: मार्कराम बनला 'Superhero'! हवेत झेपावत टिपला अविश्वसनीय झेल; जडेजानं डोक्यावर मारला हात Watch Video

Goa Rain: काणकोणला अवकाळी पावसाचा दणका! अचानक आलेल्या सरींनी नागरिकांची धावपळ; विद्यार्थ्यांचीही उडाली धांदल VEDIO

IND vs SA 2nd Test: गुवाहाटी कसोटीत षटकारांचा 'पाऊस'! मार्को यानसेनने रचला नवा इतिहास; दिग्गज व्ही व्ही रिचर्डसन यांचा मोडला 40 वर्षे जुना रेकॉर्ड VIDEO

Dharmendra Passes Away: सिनेसृष्टीवर शोककळा! ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे वयाच्या 89व्या वर्षी निधन

Goa Crime: बागा-हडफडे परिसरात दोघांवर कोयत्याने हल्ला; एक ताब्यात

SCROLL FOR NEXT