Crime News Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Goa Crime: दिल्ली ते गल्लीतील गुन्हेगारांचे 'गोवा' आश्रयस्थान बनू नये..

Goa Crime and Safety Issues: देशाच्या राजधानी दिल्लीपासून बिहार राज्याच्या गल्लीपर्यंत आणि उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, झारखंड आणि राज्यांमधून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचे आश्रयस्थान आता गोवा बनू पाहत आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

शंभू भाऊ बांदेकर

एका आख्यायिकेप्रमाणे भगवान परशुरामाने बाण मारून ही गोमंतभूमी निर्माण केली. या आख्यायिकेला अनुसरून म्हणा किंवा शांतता, सलोखा आणि समाधान प्राप्त करून देणाऱ्या मंदिरे, गिरीजाघरे, मशिदी आणि गुरुद्वाराद्वारे यांनी युक्त अशा या भूमीचा उल्लेख ‘देवभूमी’ म्हणून होऊ लागला.

मध्यंतरीच्या काळात खून, बलात्कार, अत्याचार, भांडणे, मारामाऱ्या आणि अनैतिक व्यवहारांमुळे याला लोक ‘भोगभूमी’ म्हणू लागले. त्यानंतर खेड्यापाड्यांतील रस्त्यांपासून तो राष्ट्रीय महामार्गापर्यंतच्या खड्ड्यांमुळे अपघातांचे मृत्यूचे प्रमाण वाढले आणि गोवा म्हणजे अपघातांना, गंभीर अपघातांना आणि मृत्यूंना जवळ करणारा ‘मृत्यूचा सापळा’ असे संबोधण्यात येऊ लागले.

मी दैनिक ‘गोमन्तक’मध्ये २८ ऑक्टोबर २०२० रोजी ‘गोव्याला सट्टेबाजीचे केंद्र होऊ देऊ नका’ या शीर्षकाखाली एक लेख लिहून त्यात म्हटले होते की, ‘गोव्यात कोरोना’चा कहर मातला असून मृत्यूसंख्या व रुग्णसंख्या यात सातत्याने वाढ होत आहे. ज्या प्रमाणात ‘कोरोना’चा कहर वाढत चालला आहे, त्याचप्रमाणात येथील गुन्हेगारीतही वाढ होत आहे.

यात मटका, जुगार, अमली पदार्थांची देवघेव, अशा प्रकारच्या गुन्हेगारीबरोबरच आता गोवा हे सट्टेबाजीचे केंद्र बनू पाहत नाही ना, अशी रास्त शंका मनात डोकावू लागली आहे. कारण सध्या संयुक्त अरब अमिरातमध्ये सुरू असलेल्या क्रिकेटच्या आयपईएल सामन्यांवर सट्टेबाजार करणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यास पोलिसांना यश आले आहे. कळंगुट पोलिसांची ही चौथी, तर गुन्हा अन्वेषण विभागाची ही दुसरी कारवाई आहे.

कदाचित, सामने चालू असेपर्यंत आणखी काही टोळ्या गजाआड होऊ शकतात आणि हे भाकीत खरेही ठरले होते. क्रिकेट सामन्यांचा सट्टेबाजार यापूर्वीही गोव्याच्या प्रमुख शहरांमधून उघडकीस आल्याची उदाहरणे आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात फोफावलेला हा सट्टेबाजार गोव्यासाठी फार चिंतेची बाब आहे, यात शंकाच नाही. यात गेल्या चार पाच वर्षांत झालेली वाढ लक्षांत घेता ही खरोखरच चिंतेची गोष्ट म्हणावी लागेल.

या साऱ्या पार्श्वभूमीवर आणखी एका गोष्टीची गोव्यात भर पडू लागली आहे, असे वाटते. देशाच्या राजधानी दिल्लीपासून बिहार राज्याच्या गल्लीपर्यंत आणि उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, झारखंड आणि राज्यांमधून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचे आश्रयस्थान आता गोवा बनू पाहत आहे असे चित्र वृत्तपत्रांतील बातम्यांवरून दिसू लागले आहे.

याला आळा घालणे हे फार महत्त्वाचे आहे. अनेकदा गोव्यात मारामाऱ्या, भांडणे, चोऱ्या आणि खून करून गेलेल्या परप्रांतीय गुन्हेगारांना आपल्या पोलिसांनी मोठ्या हिमतीने त्या त्या राज्यात जाऊन पकडून आणले आहे, हे तर आपणास माहीतच आहे; पण दुसऱ्या राज्यांत चोऱ्या, खून, बलात्कार करून गोव्यात आश्रय घेतलेली गुन्हेगार मंडळीही काही कमी नाही.

त्यांचा ठावठिकाणा त्या त्या राज्यांतील पोलिसांच्या साहाय्याने काढून त्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्याचेही आपण अनेकवेळा वाचत असतो, ऐकत असतो. गोवा शांत आहे, सुंदर आहे, आतिथ्यशील आहे हे सर्व जमेस धरूनही या गोव्यात जुलूम जबरदस्ती आणि खूनखराबा करून आश्रय घेणे आणि आपण जणू त्या गावाचेच नाही, अशी बतावणी करणे हे पूर्णतः गैर आहे.

पण अशा गुन्हेगारी प्रवृत्तींना चटावलेल्या माणसांची वृत्ती म्हणजे ‘जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही’, अशाच पद्धतीची असते. या वाईट घटनांमध्ये बदनाम झालेले लोक एक तर तुरुंगातून पळून जातात किंवा संबंधितांना कुठल्यातरी प्रकारचे आमिष दाखवून फरार होतात. अशी असंख्य प्रकरणे आपल्या पोलिसांनी यशस्वीपणे हाताळली आहेत, याबाबत ते कौतुकास पात्र ठरले आहेत.

नुकतीच वाचनात आलेली एक गोष्ट येथे नमूद करावीशी वाटते. ती म्हणजे दिल्लीमध्ये कुख्यात आसलेल्या जितेंद्र गोगी या टोळीचा प्रमुख आणि गुन्हेगारी जगतात ‘पंछी’ म्हणून कुप्रसिद्ध असलेला मोहित याला नुकतीच म्हापसा येथे अटक करण्यात आली.

या पक्ष्याला आपल्या जाळ्यात पकडण्यासाठी गेली तब्बल नऊ वर्षे पोलिस त्याच्या मागावर होते. कारण २०१६मध्ये दिल्ली पोलिसांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यात त्याचा हात होता. पोलिसांच्या हातावर तुरी देण्यासाठी तो सतत आपली ठिकाणे आणि भ्रमणध्वनी क्रमांक बदलत होता. २०१८मध्ये या ‘पंछी’ला महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत अटक झाली होती खरी, पण त्याच वर्षी त्याच्या बहिणीच्या लग्नासाठी त्याला चार दिवसांसाठी जामिनावर सोडण्यात आले होते.

न्यायालयात नंतर हजर राहण्याऐवजी तो परागंदा झाला. न्यायालयाने त्याला ‘फरार’ जाहीर केल्यानंतर तो मुंबई, कर्नाटकची सफर करून शेवटी गोव्यात सापडला. मूळ हरियाणातला हा ‘पक्षी’ अनेक गुन्ह्यांमध्ये पोलिसांना ‘वॉन्टेड’ होता. गुन्हा शाखेच्या नेतृत्वाखाली त्याला शेवटी गोव्यात पकडण्यात यश आले.

गोवा पोलिसांच्या सायबर गुन्हा विभागाने नुकतीच एक यशस्वी कामगिरी करून सासष्टी तालुक्यातील एका व्यक्तीस अडीच कोटी रुपयांच्या ऑनलाइन फसवणूक प्रकरणी एका संशयितास ज्याचे नाव संजय एम. चव्हाण असे आहे, त्यास महाराष्ट्रात जाऊन अटक करण्यात आली आहे.

तर मुंबईवरील २६|११च्या हल्ल्यात सामील असलेला विदेशी नागरिक डेव्हिड कोलमन हेडली भारतात हेरगिरी करत होता. त्याने त्याच्या भारतातील वास्तव्यात गोव्यासह मुंबई, दिल्ली, जयपूर, पुणे आदी भागातील शहरांची रेकी केली होती. जिथे विदेशी पर्यटक मोठ्या संख्येने येतात अशा गोव्यासही दहशतवादी हल्ल्याचे लक्ष्य करण्याचे ठरविले होते, असेही उघडकीस आले आहे.

अर्थात, विस्तारभयास्तव आणखी काही उदाहरणांचा उल्लेख टाळावा लागत असला, तरी ज्या वाचकांचा गोव्यातील वृत्तपत्रांशी सदासर्वकाळ संबंध असतो, त्यांना याबाबत आणखी काही विशेष सांगण्याची गरज नाही.

सुरुवातीस म्हटल्याप्रमाणे गोमंतभूमीचा प्रवास, ‘देवभूमी’पासून ‘भोगभूमी’पर्यंत राहिला आहे. आता देश-विदेशातील गुन्हेगारीसाठी गोवा ही ‘आश्रयभूमी’ ठरू नये, याची संबंधितांनी फार गंभीरपणे दखल घेणे, ही काळाची गरज आहे. नाहीतर काळ सोकावतो आणि गुन्हेगार यत्र तत्र सर्वत्र बोकाळतो, असे होऊ नये.

आपण आपले गोवा राज्य हे सर्वार्थाने आदर्श राज्य बनावे असे स्वप्न पाहत आहोत. यात गुन्हेगारांच्या अस्तित्वाचा, वास्तव्याचा नको तो आदर्श आड येऊ नये, हीच सदिच्छा!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

KL Rahul Century: लॉर्ड्सच्या मैदानावर राहुलची बादशाही, आशियात कुणालाच जमलं नाही ते करुन दाखवलं

Goa Tourism: पावसाळ्यातही गोव्यातील पर्यटन फुल्ल; बीचवर पर्यटकांची गर्दी

प्रेमात धोका दिलेल्या व्यक्तीला पुन्हा जवळ करावं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं रंजक उत्तर; म्हणले...

Joe Root Record: क्रिकेटच्या देवाचा कसोटीतील महान विक्रम धोक्यात, जो रूट करणार राडा? आहे इतिहास रचण्याची संधी...

Viral Video: तुमच्या पाया पडतो! भाजप नेत्याचे स्मशानभूमीत अश्लील उद्योग, विवाहित महिलेसोबत रेड हँड सापडला

SCROLL FOR NEXT