n Goa forest Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Chorao Island: कचरा हटावा, निसर्ग वाचवा: चोडणकरांनी उचलले जबाबदारीचे पाऊल

Chodan Locals Drive Cleanup Set an Eco-Conscious Example: चोडण येथील स्थानिकांनी सामाजिक बांधीलकीसोबत पर्यावरणीय जाणीव जपत सर्व गोमंतकीयांसाठी एक चांगला वस्तुपाठ समोर ठेवला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

इव्हेलिन फर्नांडिस

चोडण येथील स्थानिकांनी सामाजिक बांधीलकीसोबत पर्यावरणीय जाणीव जपत सर्व गोमंतकीयांसाठी एक चांगला वस्तुपाठ समोर ठेवला आहे. येथील स्थानिकांनी स्वत: पुढाकार घेत ’टुगेदर फॉर चोडण’ आणि ’सेव्ह चोडण’ या संस्थांच्या स्थानिक पर्यावरण कार्यकर्त्यांच्या साहाय्याने स्वच्छता मोहीम राबवली. चोडण-माडेल फेरी घाट परिसरातील वाढत्या कचऱ्याच्या संकटावर मात करण्यासाठी स्वच्छता मोहिमा स्थानिकांनी आपणहून सुरू केल्या आहेत. हा परिसर म्हणजे चोडण बेट आणि डॉ. सलीम अली पक्षी अभयारण्य यांचे प्रवेशद्वार म्हणायला हरकत नाही. पर्यटक व स्थानिक या दोघांसाठीही हे ठिकाण महत्त्वाचे आहे.

या ठिकाणी खानावळी, स्टॉल्स आणि बस थांबा असल्याने इथे कायम वर्दळ असते. सध्या हा परिसर प्लास्टिक, काचेच्या बाटल्या व बल्ब, उष्टेखरकटे, थर्मोकोल, विद्युत तारा आणि अन्य कचऱ्याने बरबटलेले अस्वच्छ ठिकाण बनले होते. केवळ दिसायलाच ओंगळवाणे दिसते असे नव्हे तर हा कचरा जवळील खारफुटीच्या जंगलात वाहून गेल्याने तो पर्यावरणासाठी धोकादायक बनला होता. येथील खारफुटीचे जंगल, गोव्यातील अतिशय नाजूक आणि समृद्ध परिसंस्थांपैकी एक आहे. माशांचे, खेकड्यांचे, तसेच स्थलांतरित व स्थानिक पक्ष्यांचे इथे निवासस्थान आहेत.

पाणथळीच्या काही ठिकाणे पूर्वी उघड्यावर मलमूत्र विसर्जन आणि कचरा टाकला जात असे. या समस्येचे गांभीर्य स्थानिक पर्यावरण कार्यकर्ते आणि ’सेव्ह चोडण’ तसेच ’टुगेदर फॉर चोडण’ या गटांचे प्रणेते युसेबियो डिसिल्वा यांनी ओळखले. त्यांनी जनजागृती केली, लोकांना परावृत्त केले. त्यांनी व स्थानिकांनी एकत्रित केलेल्या मागील दोन स्वच्छता मोहिमांमुळे बराच फरक पडला आहे. तरीही अजून अनेक कचऱ्याच्या (Plastic) पिशव्या गाळात अडकलेल्या आहेत, त्या काढणे गरजेचे आहे.

भटकी कुत्री त्या फाडतात आणि भरतीच्या वेळी कचरा अधिक आत जंगलात वाहून जातो, ज्यामुळे ही नाजूक परिसंस्था अधिक प्रदूषित होते. केवळ पर्यावरण (Environment) कार्यकर्त्यांनी व स्थानिकांनी स्वच्छता मोहीम राबवली म्हणून कचऱ्यापासून मुक्ती मिळणार नाही. त्यासाठी सरकार व प्रशासनानेही काही सुविधा पुरवणे आवश्यक आहे. येथे ‘सुलभ शौचालय’ आणि कचरापेट्यांची नितांत गरज आहे.

या बेटाला समृद्ध परंपरा व इतिहास आहे. प्राचीन काळी या बेटाचे नाव ‘चूडामणि’ होते. ‘चूडामणि’प्रमाणेच या परिसरातील बेटांच्या समूहात हे बेट नैसर्गिकदृष्ट्या खूपच महत्त्वाचे व प्रमुख होते. या मोहिमेत सहभागी झालेल्या मेगन मॅक्रिंडल या ग्रामस्थाला हा इतिहास माहीतही आहे व त्याचा अभिमानही आहे. त्याचबरोबर येथे होणारी पर्यावरणाची हानीही त्यांना विषण्ण करते. समृद्ध इतिहास लाभलेल्या या भूमीचे वर्तमान इतके गलिच्छ असलेले त्यांना पाहवले नाही. ते हिरीरीने या स्वच्छता मोहिमांत सहभागी झाले.

दि. ६ आणि दि. १२ एप्रिल रोजी झालेल्या स्वच्छता मोहिमांमध्ये कोणताही लोकप्रतिनिधी उपस्थित नव्हता. उलट लहान मुलांपासून ते ७७ वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकांपर्यंत अनेकांनी स्वच्छता केली. हातमोजे, फावडी, झाडू आणि कचऱ्याच्या पिशव्या घेऊन हे ‘स्वच्छतादूत’ पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी सरसावले. ही मोहीम पुढील काही आठवडेही सुरू राहणार आहे. काही रहिवाशांनी कचऱ्याच्या पिशव्यांचे दान केले आहे. एका स्थानिक खासगी कंपनीने कचरापेटी दान दिली आहे. तरीही, शाश्वत कचराप्रबंधनासाठी सीएसआर भागीदारीसाठी सामंजस्य असले तरी स्थानिक स्वराज्य संस्थांकडून परवानग्या आणि मंजुरी मिळवण्यामध्ये अडथळे येत आहेत.

गोव्याच्या (Goa) सर्वांत मोठ्या पाणथळ क्षेत्राचा भाग असलेल्या चोडण बेटावर खाजन जमीन आहे. लोकर असलेले पाणमांजर, निवटी, खेकडे, दलदलीतली मगर, आणि विविध प्रकारचे पाणथळ व स्थलांतरित पक्षी यांचा इथे अधिवास आहे. चोडण-माडेल पंचायत, स्थानिक शाळा व स्वयंसेवी संस्था, मंदिर-चर्च संस्था आणि सर्व नागरिकांनी आता पुढे येऊन या नैसर्गिक वारशाचे रक्षण करणे अत्यावश्यक आहे. ‘बदल नको’ असे कुणाला वाटत नाही; फक्त त्यासाठी सुरुवात करावी लागते. तशी सुरुवात झाली आहे. चोडणकर बदलाची वाट पाहत बसले नाहीत, ते स्वतः बदल घडवत आहेत.

(लेखिका केपे येथील शासकीय कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात साहाय्यक प्राध्यापिका आहेत.)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Acid Attack Goa: 'त्याच्या' आईनेच आत्महत्येस प्रवृत्त केलं... अ‍ॅसिड हल्ल्याप्रकरणी मृत मुलीच्या आईचा खळबळजनक आरोप

E-Sakal: ई-सकाळची गरुडझेप! पुन्हा ठरले देशातील नंबर 1 मराठी न्यूज पोर्टल

Vijai Sardesai: 'आत्ताच्या हुकूमशाहीपेक्षा पोर्तुगीज परवडले'; विजय सरदेसाईंचा भाजप सरकारला टोला

Shubman Gill Double Century: कर्णधार शुभमन गिलचा डबल धमाका, इंग्लंडविरुद्ध झळकावले 'द्विशतक'

IND Vs ENG: गिल दा मामला...! शुभमननं मोडला किंग कोहलीचा रेकॉर्ड; पहिल्यांदाच भारतीय कर्णधाराने केली अशी कामगिरी

SCROLL FOR NEXT