अनेक यशस्वी व्यक्तींचे उदाहरण पाहिले तर सुरुवातीचे निकाल सरासरी असले तरी त्यांनी पुढे उत्कृष्ट कामगिरी करून मोठे यश मिळवले आहे. त्यामुळे दहावीचा निकाल महत्त्वाचा असला तरी तो अंतिम मापदंड नाही.'
अलीकडच्या दहा वर्षांत दहावी, दहावीचा निकाल ‘प्रतिष्ठे’चा मुद्दा बनला आहे. यंदा बारावीचा निकाल ९२.९६ टक्के, त्या पाठोपाठ दहावीचा ९४.५१ टक्के निकाल लागला. रिझल्ट जवळ आल्यावर बऱ्याच मुख्याध्यापकांना झोपही लागत नाही. ‘शंभर टक्के’ निकालाचे लक्ष्य असते. त्यातही ‘दहावी’ निकालात १७८ शाळांनी ‘पैकीच्या पैकी’ यश मिळवले.
यंदा बारावीचा निकाल २.३३ टक्क्यांनी वाढला असताना दहावीच्या निकालात किंचित घट झाली. पण, दोन्ही निकालांत समान दुवा राहिला तो ग्रामीण भागातील वाढलेल्या टक्केवारीचा. दोन्ही परीक्षांमध्ये मुलींनी बाजी मारलीच; पण पेडणे, धारबांदोडा तालुक्यांनी विशेष चमक दाखवली, जी लक्षवेधी आहे.
गुणवत्तेत ग्रामीण भागातील विद्यार्थी कोणत्याही अर्थाने मागे नाहीत, पुन्हा सिद्ध झाले. मर्यादित साधनसुविधा असूनही विद्यार्थी जिद्दीच्या जोरावर अव्वल ठरू शकतात. दोन्ही तालुक्यांनी ९८ टक्क्यांकडे घेतलेली झेप तेच दर्शवते. मुलींनी मुलांपेक्षा अधिक यश संपादन करून पुन्हा गुणवत्तेचा ठसा उमटवला. दिव्यांग विद्यार्थ्यांचा ९८.७३ टक्के निकाल व विशेष शाळांचा शंभर टक्के यशदर समावेशक शिक्षणाच्या यशाची वाटचाल म्हणता येईल.
योग्य मार्गदर्शन तसेच संधी मिळाल्यास प्रत्येक विद्यार्थी उत्तम कामगिरी करू शकतो. ग्रामीण आणि शहरी भागातील शैक्षणिक दरी हळूहळू कमी होत होत आहे. ४१७ विद्यार्थ्यांना ‘एटीकेटी’ देण्यात आली आहे, ही गोष्ट शिक्षण व्यवस्थेतील लवचिकतेचे उदाहरण आहे.
अपयश आले तरी विद्यार्थ्यांना दुसरी संधी मिळणे गरजेचे होतेच. त्याचबरोबर गुण पडताळणी, पुनर्मूल्यांकनाची सुविधा पारदर्शकतेच्या दृष्टीने स्वागतार्ह आहे. असे असले तरी दहावीचा निकाल अंतिम टप्पा नाही. विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एका नव्या प्रवासाची सुरवात आहे. यश साजरे करताना अपयशातून शिकण्याची वृत्ती जोपासणे तितकेच महत्त्वाचे आहे.
शिक्षण व्यवस्थेनेही या यशाला पुढील गुणवत्तापूर्ण वाटचालीचे पाऊल बनवणे गरजेचे आहे. करिअरमध्ये दहावीच्या निकालाचा वाटा असतो, पण तो मर्यादित. याची सुरुवातीलाच स्पष्टता हवी. दहावीचा निकाल हा मुख्यतः पायाभूत टप्पा असतो. तो पुढील शिक्षणाची दिशा ठरवतो. विज्ञान, वाणिज्य किंवा कला शाखा निवडताना त्याचा उपयोग होतो.
पुढे बारावीचे गुण, पदवी, व्यावसायिक शिक्षण, कौशल्ये, अनुभव आणि व्यक्तिमत्त्व विकास यांना अधिक वजन मिळते. खऱ्या अर्थाने करिअर घडवताना कौशल्ये, सातत्य, मेहनत आणि योग्य संधींचा उपयोग यांचा मोठा वाटा असतो. अनेक यशस्वी व्यक्तींचे उदाहरण पाहिले तर सुरुवातीचे निकाल सरासरी असले तरी त्यांनी पुढे उत्कृष्ट कामगिरी करून मोठे यश मिळवले आहे. त्यामुळे दहावीचा निकाल महत्त्वाचा असला तरी तो अंतिम मापदंड नाही.
करिअरच्या दीर्घ प्रवासात हा निकाल फक्त सुरुवातीचा संदर्भ राहतो. असे असले तरीही राज्यातील दहावीचा निकाल अनेक अंगांनी अभ्यास करण्यासारखा आहे. महत्त्वाचे म्हणजे ग्रामीण व शहरी भागांतील शैक्षणिक दर्जाची, साधनसुविधा यांची दरी कमी झाली आहे. महाराष्ट्र राज्य पाहिल्यास याच एका घटकाचा अंतिम निकालावर फार मोठा प्रभाव दिसतो.
शिक्षण समाजाच्या तळागाळात पोहोचणे गरजेचे आहे. केवळ टक्केवारी वाढणे यावरून या गोष्टी ठरत नाहीत. निकालात गुणवत्ता किती आणि ग्रामीण व शहरी भागांत तफावत आहे का, हे दोन निकष त्यासाठी महत्त्वाचे ठरतात. यात झालेली प्रगती खरोखरच लक्षणीय आहे. समाजाच्या सर्व स्तरांत शिक्षणाची काय स्थिती आहे, तेही यावरून लक्षांत येते.
एसटी आणि ओबीसी या प्रवर्गामधून सर्वाधिक १९९ विद्यार्थ्यांनी कुंकळ्ळी परीक्षा केंद्रावर परीक्षा दिली, त्यांपैकी १९७ उत्तीर्ण झाले आहेत. पेडणे, वेर्णा, मंगेशी, डिचोली, पणजी, वास्को, हळदोणा, साखळी, म्हापसा यांसह अनेक केंद्रांवर याच प्रवर्गातून १००% निकाल लागला आहे. जेवढे विद्यार्थी बसले होते तेवढेही उत्तीर्ण झाले आहेत. ही खरोखरच लक्षणीय बाब आहे. यासाठी त्या विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे आणि विद्यालयाचे कौतुक होणे आवश्यक आहे.
एक काळ असा होता जेव्हा हाच समाज मुख्य प्रवाहातून, शिक्षणापासून वंचित होता. आज त्याच समाजातून बहुसंख्य केंद्रांवर बसलेले सगळेच विद्यार्थी उत्तीर्ण होत आहेत, ही समाजामध्ये शिक्षणाची जाणीव, जागृती व त्या क्षेत्रात भरीव कामगिरीही होत आहे.
खरे यश इथे आहे. या शिक्षणाचा विनियोग समाजा-समाजांमधील दरी मिटवण्यासाठी याच विद्यार्थ्यांनी पुढे जाऊन केला तर खऱ्या अर्थाने शैक्षणिक प्रगती ठरेल. दहावीचा निकाल हा एक टप्पा असे गृहीत धरले तरी यातूनच पुढील शिक्षणाची दिशा ठरते. हेच विद्यार्थी पुढे जाऊन उच्च शिक्षणात गोव्याचे नाव उज्ज्वल करतील यात शंका नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.