Goa History Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Panaji Municipal Garden: काँक्रिटच्या विळख्यात पणजीची हिरवाई जपणारं एक अद्भूत स्थान; 'जार्दिम गार्सिया द ओर्ता'

Panaji Municipal Garden: गार्सिया द ओर्ता हे नाव पोर्तुगीजधार्जिणे असल्याचे समजून, स्वातंत्र्य सैनिकांनी त्याला प्रखर विरोध केला होता.

दैनिक गोमन्तक डिजिटल

राजेंद्र पां. केरकर

गार्सिया द ओर्ता हे नाव पोर्तुगीजधार्जिणे असल्याचे समजून, स्वातंत्र्य सैनिकांनी त्याला प्रखर विरोध केला होता. परंतु पुढे डॉ. गार्सिया द ओर्ता यांनी भारतीय औषध शास्त्राचा अनमोल वारसा ग्रंथाद्वारे जागतिक स्तरावर समोर आणल्याची महती समजताच, हा विरोध मावळत गेला.

पणजी शहरात गार्सिया द ओर्ता यांच्या नावे चर्च स्केवरच्या परिसरात वृक्षवेलींनी नटलेले उद्यान आहे. आज पणजी महापालिका झपाट्याने काँक्रिटच्या विळख्यात आपले हिरवाईचे वैभव हरवत असताना, गार्सिया द ओर्ता यांच्या स्मरणार्थ पोर्तुगीज अमदानीत निर्माण केलेले उद्यान, पणजीसाठी जणुकाही एक फुफ्फूस ठरलेले आहे.

आज आपण विकासाच्या नावाखाली शेकडो वर्षांचा इतिहास सांगणारे महाकाय वृक्ष निर्दयपणे तोडत आहोत आणि दुसऱ्या बाजूला वन महोत्सवाच्या नावाखाली नव्या रोपांची लागवड करत आहोत. पोर्तुगीज सरकारच्या धर्म समीक्षणाच्या कारकिर्दीत गोव्यात आलेल्या या युरोपियन डॉक्टरने इथल्या पारंपरिक वनौषधशास्त्राचा आत्मीयतेनं अभ्यास केला आणि गावोगावीच्या वनस्पतीविषयक ज्ञान वारश्याचे परिश्रमपूर्वक संकलन केले होते.

युरोपातल्या स्पॅनिश धर्मसमीक्षणाच्या वावटळीची झळ पोहचल्याने, धर्माने ज्यु असलेला हा आधुनिक वैद्यक , चिकित्सक आणि मुलतः संशोधनाचा पिंड असलेला गार्सिया पळून पोर्तुगीज इंडियात आला आणि आपल्या ज्यू धर्माच्या अस्मितेचा धर्मद्वेष्टया तत्कालीन धार्मिक यंत्रणेला लवलेष न दाखवता, पोर्तुगीज विसरई आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचा डॉक्टर म्हणून कार्यरत राहिला.

१५६३ साली प्रकाशित झालेल्या ग्रंथाद्वारे त्यांनी इथल्या औषधी आणि आर्थिकरित्या महत्वपूर्ण असलेल्या वनस्पतींच्या पारंपरिक ज्ञानाचा वारसा जगाला उपलब्ध करून दिला. या ग्रंथाचा लॅटिन भाषेत अनुवाद झाल्याने, पौर्वात्य वनौषधीच्या ज्ञानाचा महत्वपूर्ण संदर्भग्रंथ म्हणून त्याचा परिचय युरोपियन वनस्पतीशास्त्रज्ञ आणि संशोधकांना झाला.

अंदाजे दोन एकरातले हे उद्यान, रंगबेरंगी फुलझाडे, आंबा, पामवृक्षांची झाडे आणि हिरव्यागार तृणाच्छादनाने नटलेले असून, पोर्तुगीज अमदानीत इथे प्रतिष्ठापित केलेला दर्यावदी वास्को द गामा यांचा पुतळा, स्वातंत्र्य सैनिकांच्या तीव्र विरोधामुळे तेथून हलवला आणि त्याजागी भारतीय राष्ट्रीयत्वाचे मानदंड असणारे सारनाथ येथील अशोक स्तंभावरून स्वीकारलेले बोधचिन्ह स्थापन करण्यात आलेले आहे.

स्पेन येथील विश्व विद्यालयात वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर, गार्सियाने १५२५ ते १५३४ या कालावधीत पोर्तुगालच्या कोइंब्रा विश्व विद्यालयात वैद्यकीय अध्यापक म्हणून काम पाहिले आणि त्यानंतर पोतुगालचा राजा दो जुआंव (तृतीय) यांच्यासाठी डॉक्टर म्हणून कामगिरी पाहिली. १५३४ च्या सुमारास त्याने गोव्यात प्रवेश करून पोर्तुगीज विसरई आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचा डॉक्टर म्हणून आपल्या कर्तृत्वाची नाममुद्रा कोरली.

त्याच्या वैद्यकीय ज्ञान आणि कौशल्य याची दखल घेऊन, पोर्तुगीज विसरईने, त्याला त्याकाळी मच्छिमारांची वस्ती असणारे मुंबई बेट भाडे तत्वावर दिले होते. सुमारे तीन दशके गोव्यात रहाणाऱ्या, या डॉक्टराचे वास्तव्य जुन्या गोव्यातल्या रुआ दुयश नामोरादुयश ज्याला प्रेमिकांचा रस्ता म्हणून ओळखले जायचे तेथे होते. तेथील सेंट फ्रान्सिस ऑफ असिसी चर्चपासून ४०० मीटर परिसरात वनौषधींनी समृद्ध उद्यानाची निर्मिती त्यांनी केली होती.

१५६८ साली ओर्ताचा मृत्यू झाला. परंतु त्याच्या मृत्यूपश्चात, जेव्हा ओर्ता ज्यू असल्याची कबुली त्याच्या कातरिना या बहिणीनी दिली, तेव्हा तिला तर प्रत्यक्ष जीवंत जाळण्यात आले आणि धर्मांध आणि माथेफिरू पोर्तुगीजांनी क्रौर्याची परिसिमा गाठत, ओर्ताचे थडगे शोधून काढले आणि १५७९ त्याच्या अस्थीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी, त्यांना मांडवीत कायमची जलसमाधी दिली. २२ मार्च, १८४३ रोजी पणजीचे नामकरण ‘नोव्हा गोवा’ असे करण्यात आले आणि गोवा, दमण आणि दीवसह पोर्तुगीजांच्या पौर्वात्य साम्राज्याची राजधानीचा लौकिक पणजी शहराला लाभला.

१८५५ ते १८६४ या कालावधीत काऊंट ऑफ तोर्रिस नोव्हा जेव्हा गोव्याचा राज्यपाल झाला, तेव्हा त्यांनी १८५५ साली तत्कालीन प्रिमेरो सिनादो द गोवाच्या ( नगर पालिका )विरुद्ध दिशेला असणाऱ्या प्राका द फ्लोरेस या फुलांच्या मैदानात नगरपालिका उद्यान १८७८ साली निर्माण केले. त्या उद्यानाला प्रारंभी १८६१ ते १८८९ काळात पोर्तुगालचा राजा असणाऱ्या दो लुईज यांचे नाव देण्यात आले होते. कालांतराने १९१० साली जेव्हा पोर्तुगाल देश प्रजासत्ताक झाला, तेव्हा या उद्यानाला जार्दिम गार्सिया द ओर्ता यांचे नाव देण्यात आले.

गोवा मुक्त झाल्यावर जार्दिम गार्सिया द ओर्ता हे नाम बदलून त्याला पणजी म्युनिसिपालिटी गार्डन असे करण्यात आले. प्रारंभी गार्सिया द ओर्ता हे नाव पोर्तुगीजधार्जिणे असल्याचे समजून, स्वातंत्र्य सैनिकांनी त्याला प्रखर विरोध केला होता. परंतु कालांतराने डॉक्टर गार्सिया द ओर्ता यांनी भारतीय औषध शास्त्राचा अनमोल वारसा परिश्रमपूर्वक ग्रंथद्वारे जागतिक स्तरावर समोर आणल्याच्या कार्याची महती समजताच, हा विरोध मावळत गेला.

२०१० साली पणजी नगरपालिकेचे जेव्हा महानगरपालिकेत रुपांतर झाले, तेव्हा या उद्यानाचे नूतनीकरण करण्यात आले आणि तिचे पुन्हा नामकरण जार्दिम गार्सिया द ओर्ता असे करण्यात आले. भारतातील वनौषधीचा समृद्ध आणि विविधतेने नटलेला वारसा, युरोपाला जेव्हा ज्ञात नव्हता आणि हा देश अडाणी, निरक्षर लोकांचा अशी धारणा मोठ्या प्रमाणात निर्माण झाली होती,

तेव्हा डॉक्टर गार्सिया द ओर्ता यांच्या Coloquio Dos Simples E Drogas E Cousas Medicinais Da India या ग्रंधाने हा संभ्रम दूर करण्यासाठी महत्त्वाचे योगदान दिले होते. त्या काळी ओर्ताचा हा ग्रंथ भारतीय वनौषधीचे ज्ञान देणारा जुना आणि प्रमाण ग्रंथ मानला गेला. त्याचे लॅटिन भाषांतर झाल्याने, हा ग्रंथ वनौषधींचे अधिकृत ज्ञान देणारा संदर्भग्रंथ म्हणून नावारूपास आला. आज पणजी महापालिका क्षेत्रातील हे उद्यान, पशुपक्ष्यांबरोबर नागरी कोलाहलात थकलेल्यांसाठी विश्रांतीस्थान ठरलेले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan ODI Cricket Record: वनडे क्रिकेटमधील लाजिरवाणा रेकॉर्ड; एकाच डावात 6 फलंदाज 'डक'वर आऊट, क्रिकेट विश्वात पाकड्यांची पुन्हा नाचक्की

Crime News: 15 व्या वर्षी लग्न, दोनदा तीन तलाक अन् हलालाचा 'नरक'! लैंगिक शोषणाच्या प्रकरणावर हाय कोर्टाने ओढले ताशेरे; म्हणाले, 'अशा प्रथा...'

Shukra Chandra Yuti 2026: 16 जुलैला आकाशात महासंयोग! शुक्र-चंद्राची युती 'या' 5 राशींना बनवणार करोडपती; लव्ह लाईफमध्येही मिळणार गूड न्यूज

PF New Rules Update: एक चुकीचा निर्णय अन् निवृत्तीचा फंड धोक्यात! इपीएफओचा नवा 1800 रुपयांचा नियम; जाणून घ्या सविस्तर

Goa land Conversion: विविध तालुक्यांत 16 भूखंडांच्या विभाग बदलास अंतिम मंजुरी; उसगावात सर्वाधिक 8 भूखंडांचा समावेश

SCROLL FOR NEXT