

राजेंद्र पां. केरकर
पश्चिम किनारपट्टीशी अंतर्गत जलमार्गांनी ही भूमी अज्ञात काळापासून देश विदेशातल्या प्रदेशांशी जोडली गेलेली असल्याने इथे शेकडो वर्षांपासून भिन्न संस्कृतींच्या आणि भिन्न वंशांच्या लोकसमूहाचे आगमन, निर्गमन झाले. त्यांच्यात संघर्ष, समन्वय झाले आणि विभिन्न संस्कृतीच्या आदानप्रदानाची प्रक्रिया इथे घडत गेली.
भारतीय उपखंडात जेव्हा सिंधू-सरस्वती संस्कृतीचा उद्गम झाला तेव्हा सागर किनाऱ्यावरील जलवाहतुकीद्वारे त्याचप्रमाणे घाट माथ्यावरील खिंडीमुळे गोव्याच्या सध्याच्या भूमीचा संबंध आफ्रिका, अरबस्थान, युरोपाशी जसा आला तसाच तो पश्चिम व पूर्व किनारा बंगाल, आसाम, म्यानमार आणि आशिया खंडातल्या विविध प्रांतांशी आला. सागर किनारे, नद्यांची खोरी, दख्खनचे पठार इथे आदिमानवाचा संचार, वास्तव्य यांच्या ज्या खाणाखुणा, दगडी हत्यारे आढळलेली आहेत, त्यावरून अश्मयुगाचा वेध घेता येतो.
गोव्यात मध्यअश्मयुगीन मानवाच्या अस्तित्वाच्या खुणा क्वॉर्टझ दगडाची तासणी, बाणाची टोके, छोट्या हातकुर्हाडी, कोयते, छिन्नी फातर्पेसारख्या भागांत आढळलेली आहेत.
कुंकळ्ळीजवळच्या मौलांगिणीतील महाकाय गुंफेत आदिमानवाचे वास्तव्य असल्याचे पुरातत्वीय पुरावे पुरातत्त्व शास्त्रज्ञ डॉ. एम. नंबीराजन यांना आढळलेले आहेत. त्यांनी या गुंफेत पुरातत्वीय दृष्टिकोनातून सविस्तरपणे उत्खनन हाती घेऊन या गुंफेतील अश्मयुगीन मानवाशी संबंधित दगडी हत्यारे आणि अन्य पुरातत्वीय संचितांचे संकलन आणि संशोधन करून, इथे वास्तव्यास असणाऱ्या मानवी समूहाविषयी, त्यांच्या जगण्याच्या धारणा, परिसरातील पर्यावरणविषयक आपली निरीक्षणे नोंदवलेली आहेत.
सांग्यातील रिवण जवळच्या फणसायमळ, केप्यातील कावरे पिर्ला, बार्देशातील सुकूर आणि डिचोलीतील सुर्ल येथील जांभ्या; तर केप्यातील काजूर येथील ग्रेनाइट त्याचप्रमाणे गोकुलडे आणि सत्तरीतील म्हाऊस येथील टणकदार दगडांवरची प्रामुख्याने कोरलेली प्रस्तर चित्रे आदिम संस्कृतीची प्रचिती आणून देतात. या प्रस्तरचित्रांवरून तत्कालीन मानवाच्या भावविश्वाची, त्याच्या सामाजिक मूल्यांची कल्पना करणे शक्य झालेले आहे.
गोव्यात पाऊण शतकापूर्वी पुरातत्त्वशास्त्रज्ञ शंकर साळी यांनी केलेल्या त्यांच्या सर्वेक्षणात इथल्या विविध ठिकाणी अश्मयुगीन मानवांच्या खाणाखुणा आढळलेल्या आहेत, त्याची नोंद त्यांनी अहवालात केल्याने अभ्यासकांना इथल्या इतिहास पूर्वकाळातल्या संचितांचा धांडोळा घेता येतो.
भारतात आलेल्या पहिल्या नेग्रीटो जमातीचे आगमन गोव्यातून दक्षिणेकडे झाले असल्याचे मानले जाते. परंतु नेग्रीटो जमातीच्या गोव्यातल्या वास्तव्याचे पुरावे मात्र अभ्यासकांना आजतागायत सापडलेले नाहीत. इतिहास लेखक का. दा. नायक यांनी गोव्यातील पहिले वसाहतकार प्रोटो-ऑस्ट्रॉलाईड मुंडा तर अनंत धुमे यांनी असुर वंशीय महार, प्रोटो ऑस्ट्रॉलाईड वंशीय कोल, गोंड, मुंडारीनंतर कुश, सुमेरियन आणि त्यानंतर सारस्वत, मराठे, कर्हाडे, हविग असल्याचे म्हटले आहे. आज गोव्यात गावडा, कुणबी आणि वेळिप यांना अनुसूचित जमाती म्हणून भारत सरकारने २००३साली मान्यता दिलेली आहे. आदिम वसाहतकार म्हणून या जमाती प्रोटो ऑस्ट्रोलाईड वंशीय असल्याचे मत बऱ्याच संशोधकांनी मांडलेले आहे.
गोव्यातल्या महिष आणि बकरी पालक धनगर जमातीचे वास्तव्य कधीकाळी डोंगरकपारी आणि माळरानावरती एकाजागी असले तरी ते शेकडो वर्षांपूर्वी भटके होते आणि कालांतराने त्यांनी आपणास, आपल्या म्हशी व बकऱ्यांसाठी जेथे पोषक वातावरण मिळाले, तेथे स्थायिक होण्यास प्राधान्य दिले होते. नानाविध जाती आणि जमाती गोव्याच्या विविध प्रांतांत विखुरलेल्या आहेत. नाचणी, वरी, कांगो, राळो, पाखड, तीळ, कुळीथ यांची प्रारंभी पैदास करणाऱ्या इथल्या समाजाने माड, पोफळी, मसाल्याच्या पिकांबरोबर भाताच्या बेळो, आसगो, कोरगुट या पिकांचे खाजन शेतीत उत्पन्न घेऊन माशांच्या आमटीद्वारे शीतकडीचा आस्वाद घेतला होता.
मानवी संस्कृतीचा भारतीय उपखंडातून गोव्यात विस्तार झाला. रामायण आणि महाभारत या महाकाव्यांचा इथल्या लोकमानसावर प्रचंड प्रभाव पडलेला असल्याने गोव्यात प्रभू रामचंद्र आल्याचे संदर्भ रामाचे भूशिर, रामनाथ दैवताद्वारे त्याचप्रमाणे कृष्ण, बलराम, अर्जुन, भीम आदी पांडव यांच्याशी निगडीत भीवगो गुणो, पांडव गुंफा, देवकी कृष्णाचे मंदिर, मल्लिकार्जुन आदी संकल्पनांतून येते. इसवी सन पूर्व सहाव्या शतकात उद्गम पावलेल्या जैन आणि बौद्ध परंपरांची इथे आढळलेली धार्मिक आणि सांस्कृतिक संचिते गोव्याच्या समृद्ध प्राचीन इतिहासाची प्रचिती देतात. मौर्यांच्या साम्राज्याचा विस्तार करताना त्यांचे सैन्य कोकणातून तामीळ प्रदेशात गेल्याने गोवा त्यांच्या ताब्याखाली आला.
अपरान्तात शूपारिक आणि दक्षिणीतील कुंतलातील वनवासीचे संदर्भ येतात. श्रीकृष्णानंतर यादव कुळे कोकणमार्गे दक्षिणेत गेली, त्यात सातवाहनाचे मांडलिक भोज गोव्यात राज्य करत असल्याचे मानले जाते. यदुकूल चंद्रवंशीय होते आणि त्यामुळे गोव्यात प्रचलित चंद्रमंडळ, राजधानी चंद्रपूर (चांदोर), चंद्रनाथ पर्वताचा स्वामी चंद्रेश्वर यांचा संबंध भोजाशी जोडला जातो.
फोंडा तालुक्यातल्या शिरोड्यात जो ताम्रपट आढळला होता, त्यात चंद्रपुरहून देवराज भोजाने गोविंदस्वामी व इंद्रस्वामी यांना घरबांधणी आणि गुरांच्या चाऱ्यासाठी जमीन दिल्याचा उल्लेख आहे. बांदोडा येथील दोन्ही ताम्रपटांत भोज राजा पृथ्वीमल्लवर्मन यांनी शेतजमीन तर दुसऱ्यात खाजन शेत जमीन दान दिल्याचे उल्लेख आहे.
हिरेगुट्टी (कुमठा) ताम्रपटात असंकितराजाने दीपक विषयातील सुंदरिका येथील बौद्ध विहाराला जमीन दान केल्याचा जो उल्लेख येतो, त्याचा संबंध इतिहासकारांनी डिचोलीतील लामगावच्या (लाम्हाग्राम ) बौद्ध गुंफेशी जोडलेला आहे.
भोजाची सत्ता जेव्हा गोव्यात होती तेव्हा त्यांच्याकडे नौकांचा वापर विविध कारणांसाठी व्हायचा. १९२९साली फादर हेनरी हेरास यांनी जेव्हा चांदोरला उत्खनन केले तेव्हा त्यांना चंद्रपूरच्या धार्मिक सांस्कृतिक वारशाचे संचित असणाऱ्या जुन्या मंदिराचे अवशेष सापडले होते. त्यानंतर पुरातत्त्व शास्त्रज्ञ एस. आर. राव यांनी केलेल्या उत्खननात चंद्रपूरच्या नगरीच्या विस्तार आणि गतवैभवाची कल्पना येते.
तेथे महाकाय नंदी आणि आढळलेल्या भग्नावशेषांवरून प्राचीन तटबंदी, शिवमंदिराची प्रचिती येते. कार्निवालनंतर कवडी आणि चांदोर येथे संपन्न होणारे मुसळ नृत्य क्षात्रधर्मिय यादवकुलीन भोज राजकर्त्याची स्मृती जागवत असल्याचा इतिहासकारांचा कयास आहे. गोव्याच्या इतिहास आणि पुरातत्त्व विषयक हरवलेल्या दुव्यांचा शोध घेण्याची म्हणूनच नितांत गरज आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.