

सूर्यकांत काळोखे
त्यावेळी आमच्या घरातल्या वातावरणातच देशप्रेम भरलेलं होतं. माझी आई जरी त्यावेळच्या बहुतेक बायकांप्रमाणे पूर्णवेळ गृहिणी होती, तरी मनाने ती गोवामुक्ती संग्रामात बुडली होती, असं म्हटलं तरी चालेल. बाबांचा तिला पूर्ण पाठिंबा होता. पण आपल्या नोकरीमुळे ते सगळं छुप्यारीतीने चालवणं त्यांना भाग होतं.
त्यावेळी तिच्याकडे मोहन रानडे, सिंधूताई देशपांडे, मित्रा बीर(पूर्वाश्रमीच्या मित्रा काकोडकर) अशी अनेक मंडळी यायची. त्यांनी दिलेली पत्रकं पिशवीत घालून आई आम्हां सगळ्या भावंडाकडे द्यायची. ती आम्ही तिथल्या सगळ्या हिंदू कुटुंबात वाटायचो. आम्ही त्यावेळी खोर्ली, म्हापशाच्या सीमेवरील भागात भाड्याच्या घरात राहायचो.
ते घर होतं पिरीस या ख्रिश्चन कुटुंबाचं आपल्या घरातल्या एका भागात त्यांनी म्हापसा पोलिस स्टेशनमधला एक पोलीससुद्धा भाडेकरू म्हणून ठेवला होता. पण याचा कुणालाच पत्ता न लावता आई, आमच्या मदतीनं गोवामुक्ती संग्रामातला आपला खारीचा वाटा उचलत होती.
त्यावेळी डॉ. गायतोंडे हे म्हापशाच्या जुन्या मार्केटात ‘मडक्यांचा बाजार’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या भागात ‘वल्लावाचे हॉस्पिटल’ म्हणजे आताच्या आजिलो इस्पितळात काम करायचे.
ते इस्पितळ डॉ. गायतोंड्यांमुळे सुप्रसिद्ध होते. कित्येक पेशंट थेट मडगाववरून त्यांच्याकडून इलाज करून घ्यायला यायचे. त्या काळात आतासारखी हॉटेलं नव्हती. त्यामुळे वडिलांच्या ओळखीचे कित्येक लोक इलाजाच्या काळात आमच्याकडे जेवायला, राहायला असायचे. आमची आई सगळ्यांची आवभगत अगदी निगुतीने करायची.
गोवा हा पोर्तुगिजांचा भाग आहे. किंबहुना तो ‘पोर्तुगालच आहे’ असं म्हणणाऱ्या एका पोर्तुगीज अधिकाऱ्याच्या वक्तव्याचा निषेध केला म्हणून डॉ. गायतोंड्यांना पोर्तुगिजांनी इस्पितळातच अटक केली.
आणि रात्रीच्या रात्री त्यांना परस्पर पोर्तुगालला रवाना केलं. डॉक्टरांनी एका पोर्तुगीज मुलीशीच प्रेमविवाह केला होता. तरीसुद्धा त्यांनी पोर्तुगिजांचा जाहीर निषेध करण्याचं धाडस दाखवलं. पण डॉक्टरांच्या अटकेमुळे जनमत खवळलं.
डॉक्टरांच्या प्रेमापोटी सगळीकडे पोर्तुगिजांच्या जुलमी राजवटीविरुद्ध निषेध सभा होऊ लागल्या. डॉक्टरांच्या अटकेला एक वर्ष पूर्ण झालं तरी त्यांची पोर्तुगालच्या तुरुंगातून सुटका व्हायची चिन्हे दिसेनात तेव्हा १७ फेब्रुवारी १९५५ रोजी संपूर्ण गोव्यातून अनेक सत्याग्रही म्हापशाला जमा झाले. कडक पोलिस बंदोबस्त झाला. सभांवर बंदी घातली गेली. अनेक शाळकरी मुलांनी सत्याग्रहात भाग घ्यायची तयारी केली.
म्हापशाच्या त्यावेळच्या मांद्रेच्या देसाई गुरूजींनी स्थापन केलेल्या देसाई हायस्कूल जे आता ‘मंत्रवादी हायस्कूल’ म्हणून ओळखलं जातं, त्यातल्या आम्ही ७ विद्यार्थ्यांनी या सत्याग्रहात भाग घ्यायचं ठरवलेलं.
त्या सगळ्यांची नाव आता आठवत नाहीत. पण अकरावीत शिकणारा श्रीकांत बांदोडकर, गवळी, शंभू शेट एवढीच नाव आता आठवतात. आम्ही सगळे महिनाभर आधीपासूनच हायस्कूलच्या मागे असलेल्या डोंगरावर, एकमेकांच्या पोटात गुद्दे लगावयाचे, लाठ्या-काठ्या घेऊन पाठीपोटावर मारायचे अशी प्रॅक्टिस करत होतो. का, तर पाखले पोलिस मारहाण करतात. त्याची सवय व्हावी म्हणून!
अशी जय्यत तयारी करून त्या दिवशी आम्ही दोस्त म्हापसा गार्डनमध्ये संध्याकाळी ५ वाजता जमलो. तिथल्या एका बाकड्यावर शांत बसलो. मिस्तीस पोलिस ऍन्ड्रयू फिरतच होता. त्याने आम्हाला हटकलं. ‘‘इथं काय करताय?’’ निरागस तोंड करून मी सांगितलं, ‘‘काही नाही.
सहज बसलोय.’’ माझा निष्पाप चेहरा बघून तो पुढं निघून गेला. तो बराच पुढे गेल्यावर आम्ही खिशात लपवलेले इवले-इवले तिरंगे काढले आणि जोराजोरात घोषणा सुरू केल्या, ‘जय हिंद’, ‘पोर्तुगिजांनो चालते व्हा!’
अॅन्ड्रयू रागाने काळानिळा होऊन धावत आला. चवताळून दोन-दोन तडाखे लगावून आम्हाला फरफटत पोलिस स्टेशनवर नेलं. त्याच्या अगोदरच आमच्यातल्या एकाला कडकडून लघवी लागली म्हणून तो आडोशाला गेला होता तो बचावला. आम्हा सहाजणांना त्यानं पोलिसस्टेशनात नेलं. श्रीकांतला तर त्यांनी इतक्या जोरानं कानपटीत लगावल्या की आम्ही घाबरलोच.
आणि त्यानंतर ‘काम्पूस काब’ या मिस्तीस सोल्जरानं आम्हाला कोठडीत लोटलं आणि ‘‘तुम्हाला नेहरू हवाय की दंडुका हवाय?’’, असे विचारत फुटक्या ‘काऊटेल’ या चाबकानं असं झोडपलं की त्या आठवणीने आजही अंगावर भीतीचे शहारे उठतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.