Ganesh History Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Ganesh History: 'चतुर्थीची कथा' महादेवांच्या रागातून शिरच्छेद, हत्तीमुखासह गणेश म्हणून झाला पुन्हा जीवंत

Ganesh Festival 2025: तो गणांचा ईश (देव) म्हणून गणेश आहे. तो गणांचा अधिपती असल्याने गणपती म्हणून ओळखला जातो. ज्याचा याच अर्थाने विचार, उल्लेख ऋग्वेदातील सुक्तांत, मंत्रांत येतो.

Sameer Amunekar

तो गणांचा ईश (देव) म्हणून गणेश आहे. तो गणांचा अधिपती असल्याने गणपती म्हणून ओळखला जातो. ज्याचा याच अर्थाने विचार, उल्लेख ऋग्वेदातील सुक्तांत, मंत्रांत येतो. काळाच्या ओघात मूर्ती नष्ट होतात; पण त्या मूर्ती ज्या विचारातून निर्मिलेल्या असतात, तो विचार मंत्रांतून, मौखिक साहित्यातून तसाच राहतो. हा विचार पुन्हा मूर्ती घडवायला, तसे नेतृत्व घडवायला प्रेरणा देत राहतो.

श्रावणातला ऊनपावसाचा खेळ आवरता घेत सृष्टी नवसृजनाने सजते. तिची शुभ, मंगल आणि कल्याणकारक पावले जीवनाचे रहाटगाडगे सुरू ठेवण्याची प्रेरणा देतात. निर्मितीपासून विलयापर्यंतचा हाच सृजनोत्सव आपण दरवर्षी साजरा करतो, ज्याला गणेशचतुर्थी म्हटले जाते! हा सण व हा देव सर्व अबालवृद्धांना अत्यंत आवडतो.

दरवर्षी मातीचा गणपती तयार करण्यापासून ते त्याचे वाहत्या पाण्यात विसर्जन करण्यापर्यंत हा सण अक्षरश: साजरा केला जातो. गणेश हे भारतातले सर्वांत लोकप्रिय दैवत. तो गणांचा ईश (देव) म्हणून गणेश आहे. तो गणांचा अधिपती असल्याने गणपती म्हणून ओळखला जातो. ज्याचा याच अर्थाने उल्लेख ऋग्वेदाच्या दुसऱ्या मंडलातील तेविसाव्या सुक्ताच्या ‘ग॒णानां॑ त्वा ग॒णप॑तिं हवामहे क॒विं क॑वी॒नामु॑प॒मश्र॑वस्तमम्। ज्ये॒ष्ठ॒राजं॒ ब्रह्म॑णां ब्रह्मणस्पत॒ आ नः॑ शृ॒ण्वन्नू॒तिभिः॑ सीद॒ साद॑नम्॥’ या पहिल्या मंत्रात येतो व ऋग्वेदाच्या दहाव्या मंडलातील एकशेबाराव्या सुक्ताच्या ‘नि षु सी॑द गणपते ग॒णेषु॒ त्वामा॑हु॒र्विप्र॑तमं कवी॒नाम् । न ऋ॒ते त्वत्क्रि॑यते॒ किं च॒नारे म॒हाम॒र्कं म॑घवञ्चि॒त्रम॑र्च ॥’ या नवव्या मंत्रातही येतो.

काळाच्या ओघात मूर्ती नष्ट होतात; पण त्या मूर्ती ज्या विचारातून निर्मिलेल्या असतात, तो विचार मंत्रांतून, मौखिक साहित्यातून तसाच राहतो. हा विचार पुन्हा मूर्ती घडवायला, तसे नेतृत्व घडवायला प्रेरणा देत राहतो. गणपती सर्व संकटे, विघ्ने, अडथळे आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर दूर करतो. हा गणपती गजानन (गज - हत्ती व आनन - तोंड = हत्तीचे तोंड असलेला) कसा झाला, याच्या अनेक कथा शिवपुराण, भविष्यपुराण, स्कंदपुराण अशा अनेक पुराणांमध्ये येतात.

वानगीदाखल तिथे आलेल्या तपशिलात शिरायचे नसते; त्यात असलेले तप आणि शील पाहायचे असते. तत्त्वांना प्रतीकात्मक रूपात रंजक पद्धतीने मांडणे म्हणजे पुराण. प्रतीकांतून पुराणकथा नेमके काय सांगू पाहते, याचा विचार होणे गरजेचे आहे. समुद्रमंथनाची कथा कार्यकर्ता कसा असावा, हे सांगते तर गणेशजन्माची कथा नेता कसा असावा, हे सांगते!

अमृत प्राशन करतात ते देव आणि हलाहल विष प्राशन करतो तो महादेव. एरव्ही कापरासारख्या गोऱ्या असलेल्या महादेवास आपण संपूर्ण निळा रंगवतो; वास्तविक त्याचा कंठ फक्त निळा आहे. समाजात वावरताना कार्यकर्त्याला अनेक मंथनांना सामोरे जावे लागते. त्यातून निर्माण झालेले हलाहल प्राशन करणे क्रमप्राप्त असते. ते पोटात गेले तर आपला जीव जातो आणि बाहेर ओकले तर समाज नष्ट होतो. म्हणून त्या नीलकंठाप्रमाणे ते गळ्यातच ठेवावे लागते. कार्यकर्ता असावा तर तो महादेवासारखा आणि नेता असावा तर त्याच्याच मुलासारखा म्हणजे गणपतीसारखा!

चतुर्थीच्या दिवशी माता पार्वतीने स्नानासाठी जात असताना आपल्या अंगावरील मळापासून एक लहानशा मुलाची मूर्ती तयार करून, त्यात प्राण टाकले होते. मग देवी पार्वती आपले स्नान होईपर्यंत आपल्या कक्षाबाहेर पहारा देण्यास या लहान मुलाला सांगते आणि कोणालाही आत प्रवेश न देण्याची सूचना देते. हा मुलगा कक्षाबाहेर पहारा देत असतो त्याच वेळी देवी पार्वतीला भेटण्यासाठी महादेव तिथे येतात. लहान मुलगा महादेवांना माता पार्वतीच्या कक्षात प्रवेश करण्यास मनाई करतो. महादेवदेखील ते मान्य करीत नाहीत आणि हा लहान मुलगाही मागे हटत नाही.

त्यामुळे महादेवांना राग अनावर होतो आणि दोघांमधील वाद टोकाला जातो. मग शंकर आपल्या त्रिशूळाने त्या मुलाचे शिर धडापासून वेगळे करतता. तोपर्यंत माता पार्वती स्नान आटोपून बाहेर येते आणि आपल्या मुलाची अशी अवस्था पाहून अत्यंत दुःखी व संतप्त होते. आपल्या मुलाला पुन्हा जिवंत करण्याचा हट्ट ती भगवान शंकराकडे धरते.

त्यावेळी भगवान शंकर त्याच्या देवतांना उत्तर दिशेला सर्वांत पहिल्यांदा ज्या प्राण्याचे डोके दिसेल ते आणण्यास सांगतात. त्यानुसार देवतांना हत्तीचे डोके सापडते. अखेर भगवान शंकर ते हत्तीचे डोके त्या लहान मुलाच्या धडाला जोडतात आणि श्रीगणेशाचा जन्म होतो, अशी ही कथा आहे.

निर्मिती, विनाश आणि पुन्हा नवनिर्मितीची ही प्रतीकात्मक कथा आहे. गणेशाचा जन्म शिव आणि शक्ती या दोन तत्त्वांतून झाला आहे. तो बुद्धिमत्ता आणि चैतन्याचे प्रतीक आहे. त्याला ‘गणपती’ म्हटले गेले आहे, ‘गजपती’ नाही. अगदी, गजमुख असले तरी तो हत्तींचा अधिपती नाही, गणांचा अधिपती म्हणजेच नेता आहे. हत्तीचेच तोंड का बरे या कथेत निवडले असावे? हा प्रश्न आपल्याला त्या प्रतीकामागील विचाराकडे घेऊन जातो.

या गजमुखामध्येच नेता कसा असावा, याचे सारे सार दडले आहे. तोंडावळ्यास पाहता गजमुखाचे डोळे खूपच लहान आहेत. नेत्याची दृष्टी बारीक व दृष्टिकोन सूक्ष्म असायला हवा. या शूर्पकर्णाचे कान सुपासारखे आहेत. नेत्याने प्रत्येकाचे म्हणणे ऐकावे व निवडून योग्य असेल ते आत घ्यावे. हत्तीला परिसराचा सुगावा सोंडेमुळे लागतो. सुईसारखी लहानातली लहान व ओंडक्यासारखी मोठ्यातली मोठी गोष्ट उचलण्याचे सामर्थ्य त्या सोंडेत असते. हे दोनही गुण नेत्यात असाव्या लागतात. हे सर्व सांभाळणारी, समतोल साधणारी कुशाग्र, प्रवाही बुद्धिमत्ता हे गणपतीचे वैशिष्ट्य आहे. बुद्धी, संतुलन आणि स्पष्टता यांचे जतन करून परिवर्तन घडवणे हे नेत्याचे काम आहे.

बुद्धिमत्ता म्हणजे माहितीवर प्रक्रिया करून तिचा संचय करण्याचे सामर्थ्य नव्हे. अस्तित्वाशी सुसंगत राहण्याची, प्रतिकार न करता प्रवाहित होण्याची, अडथळ्यांना संधीमध्ये रूपांतरित करण्याची आणि मर्यादांच्या पलीकडे विस्तारत जाण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता! म्हणूनच अडथळे दूर करणारी, समरसतेने सर्वांना एकत्र आणणारी व जीवनात संतुलन जपणारी बुद्धिमत्ता जोपासणे आवश्यक आहे. अशी बुद्धिमत्ता असलेल्या नेतृत्वाला जपणे गरजेचे आहे.

खरी बुद्धिमत्ता कधीही निष्ठूर, एककल्ली व एकाच जागी साचलेली नसते. ती प्रवाही आणि अबाधित असते. शुद्ध चैतन्याचे प्रकट रूप असलेली हीच बुद्धिमत्ता ऋषींनी निसर्गाशी प्रामाणिक असलेल्या कृषी संस्कृतीत रुजवली. निसर्गचक्राशी जुळणारी व्यवस्था मानवी जीवनाशी जोडली. भावनेशी, उपासनेशी जोडली.

म्हणूनच गणेशचतुर्थीसारखे सगळे सण निसर्गचक्राशी बांधलेले आहेत. त्याचबरोबर ते शुद्ध चैतन्याच्या प्रवाही असण्याच्या विचाराशीही ऋषींनी जोडले. मूर्ती तयार करण्याची आणि नंतर विसर्जित करण्याची पद्धत ही अस्तित्वाच्या प्रवाही स्वरूपाची ओळख पटवण्याचा एक सांस्कृतिक मार्ग आहे. हा मार्ग वेदकाळापासून ऋषी व कृषी संस्कृतींचा संगम आहे. मूर्त प्रतीकांपलीकडे जात त्यांचे गुण आत्मसात करणे म्हणजे गणेश चतुर्थी; हा साकारातून निराकाराकडे जाण्याचा, जड (मॅटर) हे शुद्ध चैतन्याचेच (प्युअर कॉन्शिअसनेस) रूप आहे हे ओळखण्याचा उत्सव आहे! ही गणेशचतुर्थी आम्हा सर्वांमध्ये असलेल्या शुद्ध चैतन्यास ओळखण्याचे सामर्थ्य आम्हांला देवो. संस्कार, संकेत आणि संस्कृती यांची नाळ या मातीशी घट्ट जोडून ठेवणारे गणांचे अधिपती आम्हांस लाभो!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Monthly Horoscope September 2025: सप्टेंबरमध्ये 'या' 5 राशींचे भाग्य उजळणार! ‘भद्र राजयोग’ देणार सुख-समृद्धी; धन-संपत्तीत होणार मोठी वाढ

Velsao Gram Sabha: वेळसाव ग्रामसभेचा मोठा निर्णय! मेगा प्रकल्पांच्या बांधकामावर बंदी; 'कचरा, पाणी आणि रस्त्यांची भेडसावतेय समस्या

Data Protection Law: चिंता मिटली! खरेदी करताना नाही द्यावा लागणार मोबाईल नंबर, ग्राहकांच्या गोपनीयतेसाठी सरकार आणतयं नवा कायदा

Kabul Bus Accident: काबूलमध्ये भीषण अपघात, प्रवासी बस उलटून 25 जणांचा मृत्यू; 27 जखमी

Love Horoscope: जोडीदाराला थोडा वेळ द्या! अनुभवा 'मोठे' बदल; वाचा प्रेम राशीफळ

SCROLL FOR NEXT