पारंपरिकतेची कात टाकून आधुनिकता अंगीकारणाऱ्या भवतालात सामाजिक दडपण, लोकलज्जा हे मुद्दे जिवापेक्षाही जड झालेत. त्याचे ओझे डोईजड झाल्यावर अनेकदा टोकाचे पाऊल उचलले जाते. नाईकनगर-बोर्डे येथे मुलाचा गळा घोटून वडिलांनी कीटकनाशक प्राशन करून जीवनयात्रा संपविल्याची घटना समाजासाठी हादरा आहे.
ती केवळ म्हापसेकर कुटुंबाची शोकांतिका नाही; बदलत्या समाजरचनेत निर्माण होणाऱ्या दडपणांचे भयावह रूप आहे. आपण मुलाच्या खांद्यावरून जावे, अशी इच्छा सामान्यतः वडिलांची असते; पण इथे वडिलांनी मुलाचा खून करून स्वत:चे जीवन संपविण्याइतपत काय घडले होते? याचा विचार होणे आवश्यक आहे. मागील वर्षभरात अशा आणखी दोन घटनांनी समाजमन हेलावलेय.
वर्षभरापूर्वी आंबेडे येथील श्रवण बर्वे या तारुण्याच्या उंबरठ्यावर पोहोचलेल्या, नव्या आशा-आकांक्षांना कवेत घ्यायची स्वप्ने पाहण्याच्या वयातील कोवळ्या मुलाचा वडील, सख्खा भाऊ या संशयितांनी केलेली हत्या तसेच धारगळ येथील ॲसिड हल्ला! समवयस्क युवकाशी पोटच्या पोरीचा झालेला परिचय; जडलेले एकतर्फी प्रेम, त्यातून मुलीचा झालेला मृत्यू आणि त्यास मुलीच्या वडिलांनी युवकास जबाबदार धरून त्याच्यावर केलेला ॲसिड हल्ला आजही अनेकांच्या स्मरणात आहे.
ह्या घटना एखाद्या वेबसीरीजमधील भयंकर कथानकाहून तसूभरही कमी नाहीत. आजच्या वेगवान, स्पर्धात्मक आणि ताणतणावपूर्ण जीवनशैलीत माणूस अधिकाधिक एकाकी होत चालला आहे. कुटुंबात राहूनही संवाद हरवत आहे. पालक आणि मुलांमधील नात्यांमध्ये विश्वास आणि समजूतदारपणा कमी होताना दिसतो. शिस्त लावण्याच्या नावाखाली कठोरता वाढते, तर स्वातंत्र्याच्या नावाखाली बंधनांचा विरोध वाढतो. या दोन टोकांमध्ये अडकलेले नाते कधी तुटते, हे कळतही नाही. वरील घटना त्याचाच परिपाक.
बोर्डे येथील संजय म्हापसेकर हे सामाजिक जीवनात सक्रिय होते. ते भाजपचे स्थानिक पातळीवर पदाधिकारी असल्याची माहिती समोर आलीय. त्यांचे चौकोनी कुटुंब. पण दोन वर्षांपूर्वी पत्नीच्या निधनानंतर थोरली कन्या व चौदा वर्षांच्या मुलासह संजय जीवन व्यतित करत होते. पोलिस तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार - नववीत शिकणारा मुलगा व वडिलांचे पटत नव्हते. एकदा वडिलांकडून मारहाण झाल्याने मुलाने पोलिसस्थानकही गाठले होते. त्यानंतर सारे वातावरण बदलले. म्हापसेकर बहुधा स्वत:ला एकटे समजू लागले होते, असा कयास शेजारी व्यक्त करतात.
शिस्तीसाठी बडगा उचलल्यावर पोटचा मुलगा पोलिसांत जातो, कदाचित तो डोईजड होईल, बहिणीला त्रास देईल, अशा शक्यतेमधून संजय यांनी टोकाचे पाऊल उचलले, असे सकृतदर्शनी समोर आले आहे. मृत्यूपूर्वी त्यांनी तेरा पानी पत्र लिहिले. त्यात काय उल्लेख आहे, हे अद्याप पोलिसांनी स्पष्ट केलेले नाही. त्यानंतर नेमके कारण समोर येईल. तथापि उपलब्ध तपशिलांवरून एक नक्की होते- मानसिक तणाव व संवादाचा अभाव भयानक परिणाम घडवू शकतो. वडिलांच्या मनात साचलेली निराशा, राग, असहाय्यता यांना योग्य मार्ग मिळाला नाही.
त्याचवेळी, मुलाच्या वागणुकीतील बदल, त्याचे मानसिक स्थिती आणि त्याला योग्य मार्गदर्शन मिळाले का, याचाही विचार करणे आवश्यक आहे. प्रत्येक समस्येचे उत्तर हिंसा किंवा आत्मघातकी निर्णय असू शकत नाही. वरवर सौम्य वाटणाऱ्या अशा नाजुक समस्या, आईच्या मायेने व हळुवार हातांनी सोडवल्या गेल्या पाहिजेत. बोर्ड्यासह वर उल्लेखीत तीनही घटनांमध्ये एक महत्त्वाचा समान धागा म्हणजे, तीनही प्रकरणांत पोलिस तक्रारी झाल्या होत्या.
नात्यांतील गुंता ओळखून संबंधित व्यक्तींना समुपदेशनाची, उपचारांची गरज असते, हे पोलिसांनी आता लक्षात घेण्याची गरज आहे. पोलिसांनी तेव्हा आंबेडेतीवल श्रवणला मनोविकार तज्ज्ञांकडे नेले नव्हते वा म्हापसेकर प्रकरणात मुलगा संचित व वडिलांत संवादाचा प्रयत्न झाला नव्हता. धारगळ प्रकरणात पोलिसांकडून न्यायास विलंब होत असल्याच्या चिंतेतून ॲसिड हल्ला घडला. दाखल झालेली तक्रार गुन्ह्याच्या कलमांतून न पाहता मानसोपचारतज्ज्ञांच्या सहकार्याने सोडवल्यास अनेक अप्रिय घटनाक्रम खात्रीने टळतील.
कुटुंबामध्ये कायिक, वाचिक आणि मानसिक हिंसा घडते तेव्हा पोलिसांनी त्याकडे फक्त एक तक्रार या कायदेशीर दृष्टिकोनातून पाहिले जाते. समाजात पुन्हा असे घडू नये यासाठी काय प्रयत्न होतात? त्यासाठी समुपदेशक, मानसोपचारतज्ज्ञ, बिगर सरकारी संस्थांना सहभागी करून घेतले जाणार आहे का? गोवा पोलिस ते करतील का?
आणखी एक धोक्याची घंटा! राज्यात चोरपावलांनी अमली पदार्थांनी युवा वर्गाला कह्यात घेतले आहे. अनेक भागांत त्याचा उपद्रव होतोय. अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत. या वास्तवाकडे आपण डोळेझाक करणार का? या एका घटनेला अनेक कंगोरे आहेत. प्रत्येकाचा विचार होईल, तेव्हाच भविष्यात असे घडण्याची शक्यता कमी होईल. बदलत्या जीवनशैलीत, समाजात कुटुंब, नाती हे ‘संचित’ काचेसारखे हाताळावे लागते; कधी, कुठे व का तडा जाईल हे सांगणे कठीण असते!
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.