DR. Ram Manohar Lohia Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

DR. Ram Manohar Lohia Journey: अकबरपूर ते बर्लिन अन् पुढे थेट गोव्याचा स्वातंत्र्यसंग्राम! डॉ. राममनोहर लोहियांच्या जागतिक जडणघडणीचा इतिहास

Indian Socialist Leader Berlin History: भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात डॉ. राममनोहर लोहिया हे एक विलक्षण व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात.

दैनिक गोमन्तक डिजिटल

डॉ. नंदकुमार कामत

भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात डॉ. राममनोहर लोहिया हे एक विलक्षण व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. ते केवळ स्वातंत्र्यसैनिक नव्हते, केवळ समाजवादी नेते नव्हते, केवळ संसदपटू नव्हते, तर ते आधुनिक भारतातील सर्वांत स्वतंत्रपणे विचार करणाऱ्या राजकीय बुद्धिजीवींमध्ये गणले जातात. त्यांच्या राजकीय जीवनाचा अभ्यास करणाऱ्यांना त्यांच्या समाजवादाबद्दल, काँग्रेस समाजवादी पक्षातील भूमिकेबद्दल, नेहरूंशी असलेल्या मतभेदांबद्दल वा जातिव्यवस्थेवरील त्यांच्या विचारांबद्दल बरीच माहिती असते. परंतु या सर्व विचारांची बीजे कुठे पेरली गेली, हा प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर भारतात नव्हे, तर जर्मनीतील बर्लिनमध्ये सापडते.

१९२९ ते १९३३ या काळात लोहियांनी जर्मनीमध्ये घालविलेली साडेतीन वर्षे ही त्यांच्या आयुष्यातील सर्वांत महत्त्वाची घडण होती. त्या काळात त्यांनी अर्थशास्त्राचा अभ्यास केला, जर्मन भाषा आत्मसात केली, युरोपियन राजकारण जवळून पाहिले, भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा जागतिक संदर्भसमजून घेतला आणि लोकशाही कशी कोसळते, याचाही प्रत्यक्ष अनुभव घेतला. पुढे भारतीय राजकारणात त्यांनी जो स्वतंत्र मार्ग स्वीकारला त्याची बौद्धिक पायाभरणी याच काळात झाली. लोहियांचे बालपण उत्तर प्रदेशातील अकबरपूर येथे गेले.

त्यानंतर त्यांचे शिक्षण मुंबई, बनारस आणि कलकत्ता येथे झाले. भारतीय राष्ट्रवादाच्या वाढत्या लाटेच्या काळात ते तरुण होते. त्यांच्या कुटुंबात स्वातंत्र्यलढ्याबद्दल सहानुभूती होती. महात्मा गांधींच्या चळवळींचा प्रभाव त्यांच्यावर पडला होता. भारतीय संस्कृती, भाषा आणि इतिहास यांविषयी त्यांना अभिमान होता. पण हा अभिमान आंधळा नव्हता. त्यांना भारत समजून घ्यायचा होता आणि जगालाही समजून घ्यायचे होते. कलकत्ता विद्यापीठातून पदवी घेतल्यानंतर त्यांनी परदेशात उच्च शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. त्या काळात भारतातील महत्त्वाकांक्षी विद्यार्थ्यांसाठी इंग्लंड हा जवळजवळ स्वाभाविक पर्याय होता. गांधी, नेहरू, जिना आणि आंबेडकर यांसारख्या अनेक भारतीय नेत्यांनी इंग्लंडमध्ये शिक्षण घेतले होते.

लोहियाही सुरुवातीला इंग्लंडला गेले. परंतु काही दिवसांतच त्यांनी तेथून निघून जाण्याचा निर्णय घेतला. उपलब्ध पुराव्यांवरून असे दिसते, की त्यांच्या राष्ट्रवादी मनाला ब्रिटिश साम्राज्याच्या मध्यवर्ती वातावरणात सहजपणे रमणे शक्य झाले नाही. इंग्लंड त्यांना शिक्षण देऊ शकत होता; पण बौद्धिक प्रेरणा देऊ शकत नव्हता. त्यामुळे त्यांनी जर्मनीची निवड केली. हा निर्णय त्या काळात अत्यंत असामान्य मानला जात होता.

जर्मनी हे पहिल्या महायुद्धात पराभूत राष्ट्र होते. त्याची अर्थव्यवस्था संकटात होती. तरीही जर्मनीतील भारतविद्या अभ्यासकांनी संस्कृत भाषा, वेद, उपनिषदे आणि भारतीय तत्त्वज्ञानाच्या अभ्यासात महत्त्वाचे योगदान दिले होते. भारतीय संस्कृतीकडे आदराने पाहणारी परंपरा तेथे होती. त्याचबरोबर विज्ञान, अर्थशास्त्र, समाजशास्त्र आणि तत्त्वज्ञानातील जर्मन संशोधन जगभर प्रसिद्ध होते. मॅक्स वेबर, कार्ल मार्क्स, हेगेल, नीत्शे आणि आइन्स्टाईन यांच्या बौद्धिक परंपरेचा प्रभाव अजूनही जिवंत होता.

१९२९ च्या शरद ऋतूत लोहिया बर्लिनमध्ये पोहोचले. योगायोग असा की, त्याच काळात जागतिक इतिहासाने एक निर्णायक वळण घेतले. न्यूयॉर्क शेअर बाजार कोसळला आणि जग महामंदीच्या विळख्यात अडकले. जगभर उद्योगधंदे डळमळू लागले. बेरोजगारी वाढू लागली. आर्थिक संकटाचे परिणाम सर्वाधिक तीव्रतेने जर्मनीत जाणवत होते.

लोहियांनी ज्या जर्मनीत प्रवेश केला तो केवळ युरोपातील एक देश नव्हता; तो एका मोठ्या ऐतिहासिक प्रयोगाचा रंगमंच होता. बर्लिन त्या काळी जगातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर होते. उद्योगधंदे, विद्यापीठे, संशोधन संस्था, चित्रपटसृष्टी, नाट्यसंस्था, कलाचळवळी, साहित्यिक वर्तुळे आणि राजकीय संघटना यांचे ते केंद्र होते. शहराच्या एका भागात विलक्षण सांस्कृतिक चैतन्य होते तर दुसऱ्या भागात बेरोजगारी, असुरक्षितता आणि राजकीय हिंसा वाढत होती. आधुनिकता आणि अस्थिरता यांचा असा संगम जगात क्वचितच आढळत असे.

बर्लिनमध्ये आल्यानंतर त्यांच्यासमोर पहिली अडचण होती भाषा. जर्मन भाषा न येता विद्यापीठीन शिक्षण शक्य नव्हते. त्यामुळे त्यांनी ‘Deutsches Institut für Ausländer’ या संस्थेत प्रवेश घेतला. येथे जर्मन इतिहास, अर्थव्यवस्था, समाजजीवन, कला आणि संस्कृती यांचीही ओळख करून दिली जात असे. लोहिया या अभ्यासात पूर्णपणे रमले. पुढे त्यांनी जर्मन भाषा इतकी आत्मसात केली की, ते सहजपणे त्या भाषेत लिहू-बोलू लागले. अनेक दशकांनंतर त्यांनी जर्मन भाषेत पत्रव्यवहार केला आणि अल्बर्ट आइन्स्टाईन यांच्याशीही जर्मन भाषेत संवाद साधला. भाषा शिकणे हे प्रत्यक्षात एका नव्या बौद्धिक जगात प्रवेश करण्याचे साधन ठरले.

५ मे १९३० रोजी त्यांची बर्लिनच्या फ्रिड्रिख-विल्हेल्म्स विद्यापीठात नियमित विद्यार्थी म्हणून नोंदणी झाली. आजचे हम्बोल्ट विद्यापीठ म्हणून ओळखले जाणारे हे विद्यापीठ त्या काळी जर्मन बौद्धिक जीवनाच्या केंद्रस्थानी होते. येथे विद्यार्थ्यांना स्वतंत्रपणे वाचन करणे, संदर्भ शोधणे, चर्चामध्ये सहभागी होणे आणि संशोधन करणे अपेक्षित असे. लोहियांनी राष्ट्रीय अर्थशास्त्र हा प्रमुख विषय निवडला. त्या काळी या विषयात राज्यव्यवस्था, समाज, करव्यवस्था, उत्पादन, उद्योग, सार्वजनिक वित्त आणि इतिहास यांचा एकत्रित अभ्यास होत असे. पुढे त्यांच्या राजकीय विचारांवर याचा खोल परिणाम झाला.

त्यांचे प्रमुख शिक्षक होते प्राध्यापक हर्मन शूमाखर. सार्वजनिक वित्त आणि आर्थिक धोरणावरील त्यांचे संशोधन प्रसिद्ध होते. लुडविग बर्नहार्ड यांनी अर्थशास्त्राचा प्रत्यक्ष जीवनाशी असलेला संबंध समजावून सांगितला. परंतु ज्यांचा प्रभाव सर्वाधिक दीर्घकाळ टिकला ते म्हणजे वर्नर झॉम्बार्ट. झॉम्बार्ट यांनी अर्थशास्त्राचा अभ्यास इतिहास, संस्कृती आणि समाज यांच्या संदर्भात करण्याची पद्धत दिली. लोहियांनी नंतर त्यांच्या प्रभावाचा विशेष उल्लेख केला. इतिहासाचे प्राध्यापक हर्मन ऑन्केन आणि तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक मॅक्स देसोआर यांनीही त्यांच्या बौद्धिक विकासात महत्त्वाची भूमिका बजावली.

एका बाजूला अर्थशास्त्र त्यांना राज्य आणि समाजातील आर्थिक शक्ती समजावून सांगत होते. इतिहास त्यांना साम्राज्ये, राष्ट्र आणि सामाजिक बदलांची कथा सांगत होता. तत्त्वज्ञान त्यांना प्रश्न विचारण्याची पद्धत शिकवत होते. पुढे भारतीय राजकारणात त्यांनी जी बहुआयामी विचारसरणी विकसित केली तिची पायाभरणी याच शिक्षणातून झाली.

याच काळात त्यांनी आपल्या डॉक्टरेट संशोधनासाठी विषय निवडला - ‘भारतातील मीठकर’. गांधींच्या मिठाच्या सत्याग्रहामुळे हा विषय त्या काळात अत्यंत महत्त्वाचा बनला होता. मीठ हा केवळ अन्नातील घटक नव्हता; तो ब्रिटिश आर्थिक शोषणाचे प्रतीक बनला होता. लोहियांनी भारतातील मीठकराची रचना, त्याचा गरिबांवर होणारा परिणाम, भारतीय वित्तव्यवस्थेतील त्याचे स्थान आणि संभाव्य पर्याय यांचा सखोल अभ्यास केला. परीक्षकांच्या नोंदींवरून असे दिसते की, त्यांच्या पहिल्या मसुद्यात राष्ट्रवादी आवेश अधिक होता; परंतु पुनर्लेखनानंतर त्यांनी तो अधिक वस्तुनिष्ठ आणि संशोधनाधिष्ठित बनवला. ही घटना महत्त्वाची आहे, कारण येथे आपण राष्ट्रवादी कार्यकर्त्यापासून संशोधक बनणारा लोहिया पाहतो.

२४ जानेवारी १९३३ रोजी त्यांनी आपला प्रबंध सादर केला. त्यानंतर झालेल्या तोंडी परीक्षेत अर्थशास्त्र, इतिहास आणि तत्त्वज्ञान या तिन्ही विषयांवरील त्यांच्या ज्ञानाची कसोटी घेण्यात आली. त्यांनी ही परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण केली आणि परीक्षकांची प्रशंसा मिळवली. तथापि त्या काळच्या विद्यापीठीय नियमांनुसार प्रबंधाच्या १५० छापील प्रती विद्यापीठात जमा करणे आवश्यक होते. काही कारणांमुळे ही प्रक्रिया पूर्ण झाली नाही आणि त्यामुळे त्यांना औपचारिक डॉक्टरेट पदवी मिळाली नाही. परंतु हा केवळ प्रशासकीय तपशील होता.

अधिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी संशोधनाची पद्धत, चिकित्सक विचार आणि बौद्धिक स्वातंत्र्य यांचा जो अनुभव बर्लिनमध्ये घेतला तो त्यांच्या पुढील संपूर्ण आयुष्याला दिशा देणारा ठरला. बर्लिनमध्ये त्यांचे शिक्षण केवळ विद्यापीठाच्या वर्गखोल्यांमध्ये झाले नाही. जर्मनीतील भारतीय विद्यार्थ्यांचा समुदाय, निर्वासित क्रांतिकारक, युरोपातील राजकीय संघर्ष, महामंदीचे परिणाम आणि नाझीवादाचा उदय या सर्वांचा एकत्रित परिणाम त्यांच्या विचारविश्वावर होत होता. वायमार प्रजासत्ताक आर्थिक आणि राजकीय संकटांनी वेढले होते. बेरोजगारी वाढत होती.

मध्यमवर्ग असुरक्षित होत होता. समाजवादी, कम्युनिस्ट आणि राष्ट्रवादी-उजव्या संघटना रस्त्यावर उतरून प्रचार करत होत्या. सभा, मोर्चे, निदर्शने, संघर्ष आणि राजकीय हिंसा हे बर्लिनच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनले होते. लोहियांनी या सर्व घडामोडी केवळ वृत्तपत्रांतून वाचल्या नाहीत; त्या त्यांनी प्रत्यक्ष पाहिल्या. ते विविध पक्षांच्या सभा ऐकत. समाजवादी, कम्युनिस्ट आणि नाझी नेत्यांची भाषणे ऐकत. कोणत्याही एका विचारधारेच्या प्रभावाखाली न जाता सर्व बाजू समजून घेण्याचा प्रयत्न करत. बौद्धिकदृष्ट्या त्यांचे नाते समाजवाद्यांशी जुळत होते; परंतु त्या काळातील विविध राजकीय प्रवाहांचे आकर्षण आणि मर्यादा दोन्ही त्यांनी जवळून पाहिल्या. यामुळे पुढे ते कोणत्याही विचारसरणीचे अंध अनुयायी बनले नाहीत.

बर्लिनमधील भारतीय समुदाय हा त्यांच्या घडणीतला आणखी एक महत्त्वाचा घटक होता. ‘हिंदुस्तान असोसिएशन ऑफ सेंट्रल युरोप’ या संस्थेत विद्यार्थी, व्यापारी, क्रांतिकारक आणि विविध विचारसरणींचे भारतीय सहभागी होत. भारताच्या स्वातंत्र्याचा मार्ग, गांधींच्या चळवळी, ब्रिटिश धोरणे आणि भविष्यकालीन भारत यांवर चर्चा होत असे. लोहिया या चर्चाचा नियमित भाग होते.

त्यांना भेटलेल्या भारतीयांमध्ये विरेंद्रनाथ चट्टोपाध्याय हे अत्यंत प्रभावी व्यक्तिमत्त्व होते. सरोजिनी नायडू यांचे बंधू असलेले चट्टोपाध्याय जर्मनीतील भारतीय राजकीय जीवनाचे एक केंद्र होते. एम. एन. रॉय यांच्याशी झालेला परिचयही तितकाच महत्त्वाचा ठरला. राष्ट्रवाद, समाजवाद आणि आंतरराष्ट्रीयता यांतील संबंध समजून घेण्यात या संपर्काचा मोठा वाटा होता. ब्रजेश सिंह, ज्युलियांव मेनेझिस आणि इतर अनेक भारतीय विद्यार्थ्यांशी त्यांचा संपर्क आला. या अनुभवांमुळे भारतीय राष्ट्रवादाला जागतिक संदर्भ मिळाला.

दरम्यान जर्मनीतील परिस्थिती अधिकाधिक गंभीर होत चालली होती. १९३२ पर्यंत नाझी पक्ष मोठी राजकीय शक्ती बनला होता. विद्यापीठांमध्येही त्यांचा प्रभाव वाढत होता. ३० जानेवारी१९३३ रोजी अडॉल्फ हिटलर जर्मनीचा चान्सलर बनला. काही आठवड्यांतच राइखस्टागला आग लागली आणि विरोधकांवर व्यापक कारवाई सुरू झाली. कम्युनिस्ट, समाजवादी आणि लोकशाहीवादी कार्यकर्त्यांवर अटकसत्र सुरू झाले. लोहिया त्या वेळी बर्लिनमध्ये होते. त्यांनी लोकशाहीचे संस्थात्मक विघटन प्रत्यक्ष पाहिले.

आर्थिक संकट लोकांना हुकूमशाहीकडे कसे ढकलते, राष्ट्रवाद कधी विषारी रूप धारण करतो आणि भीतीच्या राजकारणाने लोकशाही कशी कमकुवत होते याचे त्यांनी जिवंत उदाहरण अनुभवले. याच काळात त्यांनी ‘द हिंदू’ साठी जर्मनीतील परिस्थितीवर लेख लिहिला. हिटलरचा उदय, फॅसिझमची वाढ आणि युरोपातील बदलत्या राजकारणाचे त्यांनी विश्लेषण केले. पुढे भारतीय समाजवादी चळवळीत कार्यरत असताना त्यांनी जर्मनीतील अनुभवांचा संदर्भ वारंवार दिला.

मार्च १९३३ मध्ये लोहिया भारतात (India) परतले. जेव्हा ते बर्लिनला आले होते तेव्हा ते एक उत्साही राष्ट्रवादी विद्यार्थी होते. जेव्हा ते भारतात परतले तेव्हा ते इतिहास, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राष्ट्रवाद, लोकशाही आणि आंतरराष्ट्रीय राजकारण यांचा परस्परसंबंध समजणारे परिपक्व विचारवंत बनले होते. जर्मन विद्यापीठातील बौद्धिक स्वातंत्र्य, बर्लिनची सांस्कृतिक ऊर्जा, महामंदीचे आर्थिक वास्तव, लोकशाहीचा ऱ्हास, नाझीवादाचा उदय आणि भारतीय राष्ट्रवाद्यांशी झालेला संवाद या सर्वांनी मिळून त्यांची वैचारिक घडण केली.

बर्लिनमधील वास्तव्यात लोहिया आणखी एक महत्त्वाचा धडा शिकले. तो म्हणजे कोणताही समाज केवळ आर्थिक शक्तींनी किंवा केवळ राजकीय विचारधारांनी घडत नाही. संस्कृती, भाषा, इतिहास, सामूहिक स्मृती, धर्म, वर्ग, शिक्षण आणि सामाजिक संबंध या सर्वांचा परस्पर परिणाम समाजाच्या प्रवासावर होत असतो. विज्ञान, तंत्रज्ञान, उद्योग, विद्यापीठे आणि सांस्कृतिक वैभव यांत आघाडीवर असलेला जर्मनी काही वर्षांतच हुकूमशाहीच्या मार्गावर जाऊ शकतो, हा अनुभव त्यांच्या मनावर खोलवर कोरला गेला. म्हणूनच पुढे भारतात त्यांनी लोकशाहीला केवळ घटनात्मक व्यवस्था म्हणून पाहिले नाही; तर ती सतत जागृत राहणाऱ्या नागरिकांची जीवनपद्धती आहे, असा आग्रह धरला.

बर्लिनने त्यांना जागतिक दृष्टी दिली, परंतु त्याचबरोबर भारताकडे नव्या नजरेने पाहण्याची संधीही दिली. परदेशात राहून त्यांनी भारतातील गरिबी, जातिभेद, भाषिक विषमता, स्त्रियांची स्थिती आणि वसाहतवादी शोषण यांचा अधिक चिकित्सक विचार केला. त्यामुळे भारतात परतल्यानंतर ते कोणत्याही एका पाश्चात्त्य विचारधारेचे अनुकरण करणारे नेते बनले नाहीत. त्यांनी भारतीय वास्तवातून भारतीय समाजवादाची संकल्पना विकसित करण्याचा प्रयत्न केला. सामाजिक न्याय, विकेंद्रीकरण, भाषिक समानता आणि लोकसहभाग या प्रश्नांवरील त्यांची भूमिका याच व्यापक अनुभवातून घडली. त्यांच्या विचारांमध्ये राष्ट्रवाद होता, परंतु तो संकुचित नव्हता; समाजवाद होता, परंतु तो यांत्रिक नव्हता; लोकशाही होती, परंतु ती केवळ निवडणुकांपुरती मर्यादित नव्हती. बर्लिनमध्ये ज्युलियांव मेनेझिस यांच्याशी निर्माण झालेली मैत्री पुढे गोव्याच्या इतिहासात महत्त्वाची ठरली.

अनेक वर्षांनंतर त्यांच्या निमंत्रणावरूनच लोहिया १० जून १९४६ रोजी गोव्यात आले, असोळणे इथे राहिले आणि १८ जून १९४६ च्या नागरी स्वातंत्र्य चळवळीमुळे गोव्याच्या निद्रिस्त स्वातंत्र्य संग्रामाला एक नवे वळण मिळाले. त्यामुळे गोव्याच्या इतिहासातील लोहिया समजून घ्यायचा असेल, तर त्यामागे उभ्या असलेल्या बर्लिनमधील साडेतीन वर्षांचाही विचार करावा लागतो. म्हणूनच बर्लिन हा लोहियांच्या जीवनातील केवळ एक भौगोलिक टप्पा नव्हता; तो त्यांच्या बौद्धिक पुनर्जन्माचा काळ होता. अकबरपूरमध्ये जन्मलेला, कलकत्त्यात शिक्षण घेतलेला आणि बर्लिनमध्ये घडलेला हा तरुण पुढे भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील एक अद्वितीय आवाज बनला. त्यांना जर्मनीतून औपचारिक पीएच.डी. पदवी मिळाली नसली, तरी त्यांना त्यापेक्षा मोठी गोष्ट मिळाली- स्वतंत्र विचार करण्याची क्षमता. आणि कदाचित हीच बर्लिनने दिलेली त्यांची सर्वांत मोठी पदवी होती. लोहियांच्या गोव्यातील ऐतिहासिक कामगिरीची ८० वर्षे पूर्ण होत आहेत म्हणून, हा लेखन प्रपंच.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Calangute Theft: अवघ्या 20 मिनिटांत गाडीचा दरवाजा उघडला अन्...; कळंगुटमध्ये पर्यटकांना लुटणारी आंतरराज्य टोळी गजाआड! 21 महागडे मोबाईल जप्त

Goa Cyber Crime: ...अन् व्हॉट्सॲपवरील 'त्या' मेसेजने केला घात! 'ट्रेडिंग'च्या नावाखाली मडगावच्या महिलेला 33 लाखांचा गंडा; बंगळुरुच्या भामट्याला अटक

ED Raid: 155 कोटींचा बँक घोटाळा अन् 'ईडी'चा थेट गोव्यात छापा! 'या' बड्या कंपनीवरील कारवाईने देशभरात खळबळ

Goa Assembly Election: 2027 मध्ये राज्यात पुन्हा भाजपच येणार, स्पष्ट बहुमत मिळणार! रोहन खंवटेंनी विरोधकांच्या 'भूलथापां'चा उडवला धुव्वा

FIFA World Cup: 'रोनाल्डो महान आहे आणि राहील!' थिएरी हेन्रीच्या 'स्वार्थी' टीकेला चाहत्यांचे सणसणीत प्रत्युत्तर, सोशल मीडियावर काढले वाभाडे

SCROLL FOR NEXT