Dr Armida Fernandes Padma Shri Goa Connection Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

'कर्करोगात मुलगी गमावली, पण वसा नाही सोडला'! गोव्याची सेवाव्रती कन्या; पद्मश्री डॉ. आर्मिडा फर्नांडिस

Dr Armida Fernandes Padma Shri Goa Connection: भारतात मैलाचा दगड ठरलेल्या गोव्याच्या कन्या, ज्येष्ठ नवजात शिशुतज्ज्ञ डॉ. आर्मिडा फर्नांडिस यांना वैद्यकीय क्षेत्रातील भरीव योगदानासाठी यंदाचा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.

Manaswini Prabhune-Nayak

डॉ. आर्मिडा फर्नांडिस हे नाव पद्म पुरस्कारांच्या यादीत वाचताच या नावाचे गोवा 'कनेक्शन'असू शकते याची जाणीव झाली. तोवर सोशल मीडियावर त्यांची माहिती झळकू लागली होती. डॉ. आर्मिडा फर्नांडिस या केवळ डॉक्टर नाहीत, तर ‘आई आणि बाळ’ यांच्यातील नात्याला आरोग्याच्या केंद्रस्थानी ठेवणाऱ्या एका विचार प्रवाहाच्या प्रतीक आहेत.

नवजात शिशुंच्या आयुष्याला वाचवताना त्यांनी विज्ञान, करुणा आणि सामाजिक भान यांचा दुर्मीळ संगम साधला. धारवाड येथे जन्मलेल्या डॉ. आर्मिडा यांनी हुबळी येथून एमबीबीएस आणि मुंबईतील केईएम हॉस्पिटलमधून पदव्युत्तर शिक्षण घेतले. पुढे सायन येथील लोकमान्य टिळक म्युनिसिपल जनरल हॉस्पिटलमध्ये काम करत असताना त्यांनी भारतातील नवजात आरोग्यव्यवस्थेतील वास्तव अत्यंत जवळून पाहिले.

महानगरपालिका रुग्णालयात दाखल होणारी गरीब, आजारी आणि मुदतपूर्व जन्मलेली बाळं आणि त्यांचा वाढता मृत्युदर डॉ. आर्मिडा यांना अस्वस्थ करायचा. आपण यातून काहीतरी मार्ग काढला पाहिजे या ध्यासाने प्रेरित झालेल्या डॉ.आर्मिडा यांनी १९८९ साली आशियातील पहिली मानवी दूध बँक स्थापन केली. हा निर्णय त्या काळात क्रांतिकारक होता. ''आईचे दूध हे अमृत आहे'' हा त्यांचा आग्रह केवळ भावनिक नव्हता, तर वैज्ञानिक आधारावर उभा राहिलेला होता.

डॉक्टरपणापलीकडे समाजवैद्य

डॉ. आर्मिडा यांचे व्यक्तिमत्व केवळ रुग्णालयाच्या चौकटीत मर्यादित राहिले नाही. रुग्णालयात नवजात मृत्युदर कमी करत असतानाच त्यांना उमगले की, आरोग्याचा लढा अवघड आहे. त्यासाठी आधी समाजाचा विश्वास जिंकावा लागतो. उशिरा नोंदणी, अपुरी तपासणी आणि मातांमधील आरोग्यविषयक अज्ञान ही नवजात बालकांचा मृत्यूदर वाढण्याची खरी कारणे असल्याचे त्यांनी शोधून काढले.

यावर अधिक सखोल काम करण्यासाठी १९९९ मध्ये त्यांनी SNEHA (सोसायटी फॉर न्यूट्रिशन, एज्युकेशन अँड हेल्थ अ‍ॅक्शन) या स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली. माता-नवजात आरोग्य, बालकुपोषण, किशोरवयीन आरोग्य आणि महिलांवरील हिंसाचार अशा व्यापक सामाजिक मुद्द्यांवर ही संस्था काम करते. आज ७०० हून अधिक स्वयंसेवकांच्या मदतीने SNEHA झोपडपट्ट्यांपर्यंत पोहोचली आहे.

दुःखातून उभी राहिलेली करुणा

१३ वर्षांपूर्वी कर्करोगामुळे आपली एकुलती एक मुलगी रोमिला हिचा मृत्यू झाल्यानंतर, डॉ. आर्मिडा यांच्या आयुष्यात वैयक्तिक दुःखाचा मोठा टप्पा आला.

मात्र या दुःखालाच त्यांनी सेवेत रूपांतर दिले. ‘रोमिला पॅलिएटिव्ह केअर’ या उपक्रमातून कर्करोग, स्मृतिभ्रंश, पक्षाघात यांसारख्या गंभीर आजारांनी ग्रस्त रुग्णांसाठी मोफत घरगुती पॅलिएटिव्ह सेवा सुरू करण्यात आली. हे कार्य त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील संवेदनशीलता आणि सामाजिक बांधिलकी स्पष्टपणे अधोरेखित करते.

गोव्याशी नाळ जुळलेली

आई माटिल्डा या मूळच्या तिसवाडी तालुक्यातील दिवाडी बेटावरील. वडील अर्मांडो मिनेझीस हे इंग्रजी साहित्याचे प्राध्यापक होते. पती डॉ. रुई फर्नांडिस हे नामवंत त्वचारोगतज्ज्ञ होते. गोव्याशी असलेले हे नाते केवळ कौटुंबिक नाही, तर भावनिक आहे. आजही कुटुंबीय दरवर्षी गोव्यात एकत्र येतात. तीन पिढ्यांचा संवाद जपणारी ही परंपरा त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील माणुसकी दर्शवते.

सेवाभावाचा पद्मश्री सन्मान

डॉ. आर्मिडा फर्नांडिस यांचा पद्मश्री सन्मान म्हणजे केवळ त्यांच्या कार्याचा गौरव नाही, तर स्तनपान, नवजात शिशु आरोग्य आणि समुदायाधारित आरोग्यसेवेच्या विचारांचा राष्ट्रीय सन्मान आहे. विज्ञानाइतकीच माणुसकी महत्त्वाची आहे, हे त्यांनी आयुष्यभर सिद्ध केले. ८२ व्या वर्षीही सामाजिक आरोग्य, शिक्षण आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्या कार्यरत आहेत. गोव्याच्या या सेवाव्रती कन्येला पद्मश्री सन्मान प्राप्त होणे ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. नवजातांच्या आयुष्यासाठी लढणाऱ्या या ‘दूधमाऊली’ डॉक्टरांचा पद्मश्री सन्मान हा केवळ त्यांच्या कार्याचा गौरव नाही, तर सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील सेवाभावाची पावती आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

KBC 18: पणजीतील 'पहिली चाहती' आजही संपर्कात; अमिताभ बच्चन यांच्या आठवणींनी रंगला 'केबीसी', अजित पुनियांनी जिंकले 12.5 लाख

Goa Politics: भाजप-मगो युती टिकणार? फोंड्यासह 12 जागांवर मगोचा दावा; जागावाटपावरून वाढला पेच

Asian Games 2026: ब्लॉकबस्टर फायनल होणार! श्रीलंकेला 124 धावांनी धूळ चारत भारताचा अंतिम फेरीत प्रवेश, आता जेतेपदासाठी पाकिस्तानशी होणार 'कांटे की टक्कर'

Success Motivation: 'प्रयत्ने वाळूचे कण रगडिता..!'; अपयश आलं तरी थांबू नका, प्रयत्नांची साथच यशाचा मार्ग दाखवते

Mental Health Rehabilitation: मानसिक आजारावर उपचार झाले, पण पुढे काय?; रुग्णाच्या पुनर्वसनासोबत कुटुंबालाही आधाराची गरज

SCROLL FOR NEXT