गेल्या काही वर्षांच्या मानाने यंदा थंडी जरा जास्तच पडली. गेल्या आठ-दहा वर्षांत न दिसलेल्या धुक्याच्या चादरी या वर्षी परत गावावर पसरलेल्या दिसल्या आणि कित्येक वर्षांनी जाग्या झालेल्या थंडीबरोबरच नकळत धारबांदोडा गावच्या आठवणीही जाग्या झाल्या.
गोव्याच्या संस्कृतीचे वैशिष्ट्य म्हणजे दर ऋतूत इथे वेगळे लोक-उत्सव साजरे केले जातात. थंडी म्हटल्याबरोबर मला आठवतात त्या ‘धालो’. लहानपणापासून या कलाप्रकाराबद्दल मला वेगळीच ओढ होती. माझा आणि ‘धालांचा’ पहिला परिचय शाळेतच झाला. आईने अनुभवलेल्या ‘रंभा’च्या (अवसर) कित्येक घटनाही रंगवून सांगितल्या आणि आजीने आश्वासनदेखील दिलं की ती मला ‘धालांच्या मांडावर’ नक्की घेऊन जाईल.
दरवर्षीप्रमाणे धालोत्सव सुरू झाला. घरच्या प्रथेनुसार पहिल्या दिवशी ‘गोडशें’ करून घरावरही टाकले. रात्रीच्या वेळी बायकांचे घोळके पदर पांघरून कुडकुडत मांडावर येता-जाताना दिसू लागले. परंतु आमचा मांडावर जायचा बेत बेतच राहिला. दहावीत असताना आजी वारली आणि मांडावर जायच्या माझ्या इच्छेवर पूर्णपणे पाणी फिरले.
त्याकाळी दिव्या नाईक यांनी गायलेल्या धालांचा एक व्हिडियो प्रचंड व्हायरल झाला होता आणि मलाही त्या धालो ऐकण्याचा नादच जडला. पण अजूनही प्रत्यक्षात मांडावर जाऊन धालो अनुभवायचा योग काही जुळून येत नव्हता. आमच्या पंचायतक्षेत्रातील एका वाड्यावर धालांच्या दिवसात मांडावर ‘रंभा’ (अवसर) यायच्या.
सात मुलींवर येणाऱ्या ‘रंभा’ आणि त्यांचा एक भाऊ असे एकूण आठ अवसर एकत्र म्हणजे एक अद्भू त अनुभव. या वाड्यावरून कामासाठी येणारी गडी-माणसे या अवसरांचे रसभरित वर्णन करायचे. तिथे मागितलेले नवस पूर्ण होतात, हे अवसर लोकांच्या प्रश्नांची उत्तरे देतात, त्यांच्या समस्या सोडवतात, काय अन् काय...
मोह अनावर झाल्यामुळे मी आणि माझी मावस बहीण एका रात्री या मांडावर गेलो. दिवसभर काम करून थकलेल्या, तारवटलेल्या डोळ्यांच्या १०-१५ कष्टकरी बायका कशाबशा धालो गात खेळत होत्या. त्यांना बघून आमचाही उत्साह पार गळून गेला.
रात्र चढता-चढता अवसर येऊ लागले. तीन ते दहा-अकरा वर्षांच्या वयोगटातल्या सात मुली आणि एक म्हातारा पुरूष बसल्या ठिकाणी तोंडातून विशिष्ट नाद काढत खुदू लागले.लोक त्यांना प्रश्न विचारत होते पण आम्हांला काही धीर झाला नाही. सलग दोन वर्षे धालोत्सव मांडावर जाऊन बघायचा योग जुळून आला. पण शेणाने सारवलेला, नऊवारी नेसून, फांती (फुलांच्या वेण्या) माळलेल्या बायकांनी गजबजून गेलेला कल्पनेतला ‘मांड’ मनात कायम तसाच राहिला.
लग्न होऊन दाभाळला आल्यानंतर कामेऱ्यांकडून समजले की, त्यांना मांडावर जायचा नियम होता, न गेल्यास दंड भरावा लागायचा. बायका रात्री उशिरापर्यंत धालो खेळून थकतात, नवीन सुना-मुलींना लाज वाटते,
अशाने मांडावर जायची टाळाटाळ होते आणि म्हणूनच बऱ्याच ठिकाणचे धालोत्सव आता नामशेष होऊ लागले आणि म्हणूनच हा लोक-उत्सव जपून ठेवण्याच्या हेतूने या उत्सवाचे नियमांत रूपांतर झाले. मी वाचलेल्या आणि माझ्या कल्पनेतल्या मांडावरचा उत्साह प्रत्यक्षातल्या मांडावरून कधीच ओसरून गेला होता. सासर आणि माहेर दोन्ही ग्रामीण भागात असूनही अशा काही गोष्टींपासून मी अनभिज्ञ राहिले, याची सल मात्र कायम मनात राहिल.
गौरी नाडकर्णी प्रभू वेळगेकर, साहाय्यक प्राध्यापक (दाभाळ-धारबांदोडा)
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.