

पणजी: मागील पाच वर्षांत पणजीत जी आवश्यक आहेत, ती कामेच झालेली नाहीत. पार्किंगचा प्रश्न प्रलंबित आहे. पणजीवासीयांना अनेक समस्या भेडसावत आहेत पणजीचे महापौर आणि स्थानिक आमदार हे सत्ताधारी पक्षातील असूनही अकार्यक्षम ठरल्याचे मत आम्ही पणजेकार पॅनलचे नेते उत्पल पर्रीकर यांनी व्यक्त केले.
गुलालोत्सवानिमित्त आले असता ते माध्यमांशी बोलत होते. दरम्यान, पर्रीकर म्हणाले, गुलालोत्सव आणि धुलिवंदन असल्याने सकाळचा वेळ या कार्यक्रमांसाठी देणार असून संध्याकाळी प्रचारात आणि घरोघरी जाऊन गाठीभेटी घेणार आहे. पणजी महानगरपालिकेच्या निवडणुकीला आता अवघे काही दिवसच राहिले आहेत.
प्रत्येक पणजीवासीयाच्या घरी जाऊन भेट देण्याचा प्रयत्न करत असून दिवसाला किमान आठ तास प्रचारासाठी देत आहे. नागरिकांचा अतिशय उत्तम प्रतिसाद लाभत आहे. आमच्या पॅनलच्या कोणीही निवडणुकीतून माघार घेतलेली नाही. काहीजणांकडून अतिरिक्त उमेदवारांचे पर्याय उभे केले होते, त्यांनी माघार घेतली असल्याचे त्यांनी सांगितले.
मागील काही दिवसात रायबंदर येथे प्रत्येक घरी जाऊन मी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या, सध्या आपण पणजी आणि मळा भागात प्रचार करत आहे. रायबंदरमधील नागरिकांनी तेथील आपल्या समस्या मांडल्या. येथे जे क्रीडा मैदानासाठी जागा आहे, तेथील बाजूच्या जागांसंबंधी ३९ अ कलमांतर्गत अर्ज करण्यात आले आहेत. जेटी आहे तेथे योग्य प्रकारे उतरण्यासाठी पायऱ्या बांधण्यात आलेल्या नाहीत. हा प्रकल्प नागरिक, मच्छिमारांसाठी आहे की, व्यावसायिक उपयोगासाठी असा संशय त्यांना येत असल्याचे पर्रीकर यांनी सांगितले.
स्मार्ट सिटी प्रकल्पांमुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. पणजीत पार्किंगचा प्रश्न ऐरणीवर आहे. पीडब्ल्युडी किंवा जुन्ता हाऊसच्या जागेत पार्किंग व्यवस्था उभारल्यास त्याचा लाभ पणजीवासीयांना होईल. पणजी मल्टी पार्किंगची सुविधा आहे, तिच्यात सुधारणा करून क्षमता वाढविणे गरजेचे असल्याचे मत पर्रीकर यांनी व्यक्त केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.