Benaulim: सफर गोव्याची! मध्यरात्री घोड्यांच्या टापांचा आवाज येण्याची दंतकथा, रूपेरी वाळूचा समुद्रकिनारा लाभलेले 'बाणावली'

Banavali Village Goa: दक्षिण गोव्यातील सासष्टी तालुक्यात मडगावपासून दोन किलोमीटर अंतरावर विसावलेला आहे. आज या गावाने पर्यटन नकाशावर आपले नाव अधोरेखित केले आहे.
Banavali Village Goa
Banavali Village GoaDainik Gomantak
Published on
Updated on

माझा गाव बाणावली. दक्षिण गोव्यातील सासष्टी तालुक्यात मडगावपासून दोन किलोमीटर अंतरावर विसावलेला आहे. आज या गावाने पर्यटन नकाशावर आपले नाव अधोरेखित केले आहे. ख्रिश्चनबहुल गाव असला तरी सर्वधर्मीय लोक इथे गुण्यागोविंदाने राहतात. इथे ख्रिश्चनांच्या दोन इगर्जी, दोन कपेले व हिंदूंचे लक्ष्मी देवतेचे देऊळ आहे. प्रत्येकाला असतो, तसा माझ्या गावाचा मलाही सार्थ अभिमान आहे.

बाणावलीला रूपेरी वाळूचा समुद्रकिनारा लाभल्यामुळे पर्यटकांचे हे आवडते असे ठिकाण आहे. पूर्वीपासूनच समुद्रस्नानासाठी मे महिन्यात देशी पर्यटकांची जास्त वर्दळ असते. कारण समुद्राच्या खारट पाण्यापासून रक्तशुद्धी होते, असे मानले जाते. शिवाय विदेशी पर्यटकांनाही माझ्या बाणावली गावचा समुद्रकिनारा भुरळ घालतो. इथे पूर्वीपासून लोकांचा मच्छीमारी व्यवसाय उदरनिर्वाहाचे साधन आहे.

आता पर्यटनाला ऊत आल्याने किनाऱ्यावर जिथे-तिथे शॅक्स आणि निवासी इमारती बांधलेल्या अाहेत. विवाह सोहळ्यासाठीही हे आकर्षक स्थळ मानले जाते. बाणावलीतून नदी वाहते. पूर्वी हिची खोली जास्त असल्यामुळे व्यापारी जहाजांची ये-जा असायची. त्यामुळे दळणवळण या गावातून होत असे. मडगावचा खारेबांद संपल्यावर डाव्या ररस्त्याने गेल्यावर दोन किलोमीटर अंतरावर स्वांतत्र्यसैनिक कुर्रेय आफोन्सा यांचे घर आहे.

तिथून हाकेच्याच अंतरावर एक तळी आहे. ही तळी इतर मोठमोठ्या देवस्थानांसारखीच मोठी खोल व चारही बाजूनी पायऱ्या असलेली. या तळीच्या बाबतीत अशी आख्यायिका आहे की, पूर्वी इथे देऊळ होते व समोर तळी. पण त्याकाळी पोर्तुगिजांची राजवट होती, त्यांनी हिंदू मंदिरांचे अस्तित्व पुसून टाकण्याच्या हेतूने आणि हिंदूंचे धर्मपरिवर्तन करण्याचे धोरण राबवले. गोमंतकीयांचा छळ केला.

Banavali Village Goa
Rivona: सफर गोव्याची! पांडवांचा पदस्पर्श लाभलेले, देवदेवतांची प्राचीन मंदिरे असणारे तपस्वींचे ऋषीवन; हिरवेकंच 'रिवण'

त्या काळी झालेल्या बाटाबाटीवेळी येथील मंदिरही मोडले गेले. व फक्त तळी तिथे राहिली. ही तळी इतिहासाची साक्ष देते. आमच्या वाड्यावरील आमची शेजारीण एक ख्रिश्‍चन बाई सांगायची की, दर सोमवारी मध्यरात्री घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकू येतो. संशोधक तेनसिंग यांनी बाणावली गावाचा संदर्भ गुजरातमध्ये असलेल्या बाणावली गावाशी जोडलेला आहे.

Banavali Village Goa
Mardol: सफर गोव्याची! तळीजवळ गेल्यावर स्वच्छ, थंड हवा फुफुस्सांत पसरते; निसर्गसंपन्न 'म्हार्दोळ'

काही वर्षांपूर्वी पुराणवस्तू संशोधन कार्यालयाने या तळीची डागडुगी केली होती. बाणावली गावात समुद्रकिनाऱ्याजवळ एक मोठे तळे आहे त्याला कमळांचे तळे असे संबोधले जाते. माझ्या बाणावली गावचे स्थानिक उत्पन्न भातशेती, मच्छीमारी आणि नारळ, बाणावलीचा नारळ व कवाथे (लहान नारळाचे झाड) शेजारील प्रदेशांमध्ये प्रसिद्ध आहेत. हे नारळाचे झाड उंच व वाढण्यास वेळ दवडणारे असले तरी उत्पन्न पुष्कळ असते. नारळाची चव (सोय) पुष्कळ दिवस टिकते व चवदार पण असतो, म्हणून मी म्हणते,

‘‘जिथे जिथे जाईल आमचा नारळ बाणावलीचे नाव सदैव राखेल.’’

माणिक पारोडकर

आळवे बाणावली, सध्या रा. मुगाळी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com