Rivona: सफर गोव्याची! पांडवांचा पदस्पर्श लाभलेले, देवदेवतांची प्राचीन मंदिरे असणारे तपस्वींचे ऋषीवन; हिरवेकंच 'रिवण'

Rivona Village Goa: रिवण या गावचे खरे नाव ऋषीवन होते, असा या नावामागचा इतिहास आजही सांगितला जातो. त्याकाळच्या त्या खेड्यात घनदाट अरण्यात ऋषीमुनी तपश्चर्येला बसायचे.
Rivona Village Goa
Rivona Village GoaDainik Gomatnak
Published on
Updated on

श्री विमलेश्वर देवाच्या पावन अस्तित्वाने आणि कृपाशीर्वादाने संपन्न असा माझा रिवण गाव. दक्षिण गोव्यातील सांगे तालुक्यात वसलेला नारळी पोफळीच्या कुळागरांनी संपन्न असा हा माझा जन्मगाव. वाऱ्यावर डोलणाऱ्या शेतांनी लगडलेला हिरवाकंच निसर्गाचा परिसस्पर्श लाभलेला असा समृद्ध गाव.

रिवण या गावचे खरे नाव ऋषीवन होते, असा या नावामागचा इतिहास आजही सांगितला जातो. त्याकाळच्या त्या खेड्यात घनदाट अरण्यात ऋषीमुनी तपश्चर्येला बसायचे आणि त्यामुळे या गावाला ऋषीवन नाव पडले होते. पुढे पोर्तुगीज राजवटीत या गावचे नांव ‘रिवोना’ अर्थात Rivona म्हणजे रिवण असे झाले.

या गावात खरिप व रब्बी हंगामी भात शेती तसेच नारळी पोफळी, आंबा, काजू, फणस, केळी, पेरू,चिकू अशा फळांनी लगडलेल्या तसेच समृद्ध कुळागरांनी गाव सजलेला,नटलेला आहे. कुशावती नदीच्या गोड रुचकर जलाने गाव समृद्ध आहे. श्री दामोदर देवाच्या अस्तित्वाने पावन झालेला. जांबावली गावच्या शेजारी असलेला या माझ्या रिवण गावात झुळझुळ वाहणाऱ्या औषधी गुणधर्म असलेल्या कित्येक झरी आहेत. पैकी ‘ताकांची झर’ आणि ‘मठावयली झर’ या प्रसिद्ध आहेत.

गावच्या मध्यभागी असलेले श्री विमलेश्वर हे गावचे ग्रामदैवत आणि आराध्य दैवतही आहे. चारी बाजूंनी भात शेती व मध्यभागी मंदिर असा हा सुंदर निसर्गरम्य परिसर .या मंदिर परिसरात मारुती आणि श्री पुरुष तसेच जवळपास श्री महालक्ष्मी, रवळनाथ या देवदेवतांची प्राचीन मंदिरे आहेत याशिवाय गावात श्रीमद विद्याधीश तीर्थ वडेर स्वामींचा एक प्राचीन मठही येथे आहे. या मठा शेजारीच ‘पांडवा युवर’ म्हणजे पांडव गुहा दगडात कोरलेल्या आहेत.

पांडव काही काळ तेथे वास्तव्यास होते आणि त्यानंतरच्या काळात बौद्ध भिक्षुकही काही काळ वास्तव्याला होते, असे मानले जाते आणि हे सांगणाऱ्या खुणा आजही तेथे सापडतात. गावच्या माथ्यावर ‘चिवंणी डोंगर’ आहे त्यात दुर्मिळ वनस्पती झाडे प्राणी यांचे वास्तव आजही पाहायला मिळते, या डोंगरावर घनदाट अरण्यात ‘वाघऱ्या उमास’ पारंपारिक महत्त्व असलेला उत्सव साजरा केला जातो.

Rivona Village Goa
Mardol: सफर गोव्याची! तळीजवळ गेल्यावर स्वच्छ, थंड हवा फुफुस्सांत पसरते; निसर्गसंपन्न 'म्हार्दोळ'

वाघ स्वतः येऊन त्याला अर्पण केलेल्या भोजनाचा नैवेद्य खाऊन जातो, अशी आख्यायिका आहे. गावच्या विमलेश्वर मंदिरात शिगमोत्सव दसरा पिंडिकोत्सव, कालोत्सव असे उत्सव धुमधडाक्यात साजरे केले जातात.गावात सार्वजनिक गणेशोत्सव तसेच नाताळ सण अगदी आनंदाने आणि एकोप्याने हिंदू आणि ख्रिश्चन बांधव आजही साजरे करतात.

Rivona Village Goa
Sonal: सफर गोव्याची! कडेकडेने वाहणारी नदी, शेते-भाते; सोन्यासारखा गाव 'सोनाळ'

मध्यंतरी या गावाला ‘मायनिंग’च्या क्रूर विळख्याने घेतले होते. पण आता ती परिस्थिती नाही आणि परत निसर्ग ‘हिरवाकंच’ होऊ लागलेला आहे. आधुनिकतेचा वारा या गावातही वाहू लागलेला आहे. गावची भरभराट व्हायलाच पाहिजे. पण गावचा हिरवाकंच निसर्ग तसाच राहायला पाहिजे, हीच एक प्रबळ इच्छा.

शर्मिला विनायक प्रभू

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com