

डिचोली: देश-विदेशात ख्याती असलेल्या डिचोली तालुक्यातील साळ गावातील पारंपरिक गडे उत्सवाला प्रारंभ झाला. यंदा उत्सव काळात मद्य व गोबी मंच्युरियन विक्रीवर पूर्ण बंदी घालण्याचा निर्णय देवस्थान समितीने घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी आजपासून करण्यात आली असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
होळी पौर्णिमेच्या मध्यरात्री पारंपरिक होळी प्रज्वलित केल्यानंतर गड्यांना प्रारंभ झाला. गुरुवारपर्यंत (ता. ५) तीन दिवस हा उत्सव परंपरेप्रमाणे साजरा होणार आहे. साळ येथील गडे उत्सवाची कीर्ती गोव्यासह अन्य राज्यांत पसरली असून, दरवर्षी हजारो भाविक तसेच देशी-विदेशी पर्यटक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. त्यामुळे गावात उत्साहाचे वातावरण असून तिन्ही रात्री मोठी गर्दी उसळते.
उत्सव सुरळीत पार पडावा यासाठी देवस्थान समितीने आवश्यक व्यवस्था केली आहे. भाविकांनी शिस्त व नियमांचे पालन करावे, असे आवाहन समितीने केले आहे. साळ गावात दारूची दुकाने नाहीत. पण काही बाहेरील गावांतील लोक येताना सोबत दारू आणून पितात असे आढळून आले आहे. त्यामुळे गावात कोणी मद्यपान वा मद्यपार्ट्या करताना आढळल्यास कारवाई करण्यात येणार आहे.
डिचोली तालुक्यातील एका गावात गडे उत्सवावेळी केलेला अतिशहाणपणा युवकांच्या एका गटाच्या अंगलट आला. गडे उत्सव चालू असताना कारमध्ये बसून मजा करणाऱ्या गाडीतील तिघा युवकांना चक्क गड्यांनीच ‘प्रसाद’ दिला. हा प्रकार सोमवारी रात्री घडला. स्थानिकांकडून प्राप्त माहितीनुसार गड्यांनी अवसरासहित एका युवकाला तेथील तळीत ढकलून दिले.
तर अन्य एकाला गाडीतून ओढत गड्यांच्या मांडावर आणले. गाडीचीही तोडफोड केली, अशी माहिती संबंधित गावातील लोकांकडून मिळाली आहे. ज्या युवकांना मारहाण झाली ते युवक डिचोलीतील प्रतिष्ठित कुटुंबातील आहेत. पैकी एक युवक पालिकेशी संबंधित असल्याचे समजते. असे प्रकार टाळण्यासाठी गडे उत्सवाला येणाऱ्या भक्तांनी नियम पाळावा, असे आवाहन संबंधित गावातील जनतेकडून करण्यात आले आहे.
भाविकांच्या वाढत्या गर्दीमुळे निर्माण होणारा अडथळा लक्षात घेऊन यंदा श्री भूमिका मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यालगत स्टॉल्स उभारण्यास बंदी घालण्यात आली आहे. दुकानदारांसाठी पर्यायी जागेची व्यवस्था करण्यात आली असून, त्यामुळे पहिल्याच दिवशी संबंधित रस्ता मोकळा दिसून आला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.