मानवी मन षड्रिपूंनी व्यापलेले असते. एक जरी अनावर झाला तरी अनर्थ अटळ. धाक नसला तर हीच प्रवृत्ती गुन्हेगारीला जन्म देते. कुडचड्यातील ‘सेक्स स्कँडल’ हे अशाच विकृतीमधून पोसले गेले. एका नगरसेवकाच्या पुत्राने अल्पवयीन युवतींना जाळ्यात ओढून त्यांच्याशी प्रस्थापित केलेल्या संबंधांच्या चित्रफिती, छायाचित्रे ‘व्हायरल’ करण्याच्या प्रकाराची माध्यमांतून वृत्तांकने प्रसिद्ध होऊनही पोलिसांना सुरवातीला दखल घ्यावीशी वाटली नाही.
अल्पवयीनांवर ओढवलेले संकट, त्यांचे होणारे मानसिक खच्चीकरण याविषयी रकाने भरून येत असतानाही पोलिस हातावर हात ठेवून बसले. रक्षक बनण्याऐवजी पोलिस खर्डेघाशी करणारे कारकून बनले आहेत. राजकीय दबाव असल्याचा आव आणून गुन्हेगाराला पाठीशी घालण्यासाठी समोर थैल्या कधी मोकळ्या होतात, याची लाळ घोटत वाट पाहण्याच्या प्रवृत्तीमुळे समाजमनातून खाकी उतरत चालली आहे.
दृष्कृत्ये करणाऱ्या सोहम नाईकचे वडील सुशांत हे कुडचडे पालिकेचे नगरसेवक. त्यांनी प्रकरण दाबण्यासाठी ताकद खर्ची घातली नसती तर नवलच! समाजातील नवश्रीमंत वर्गाला पैशासोबत जबाबदारीचे भान राहत नाही.
त्यांच्याकडे आर्थिक स्थैर्य पचवण्याची संस्कृती नाही. सत्तेचा माज, पैशांच्या गुर्मीतून कुडचड्यासारख्या घटना घडतात. संबंधित नगरसेवकपुत्राने अनेक अल्पवयीनांसोबत संबंध प्रस्थापित करून ‘ब्लॅकमेल’ केल्याचा दावा होत आहे. अत्याचाराच्या कथा गोवाभर चर्चिल्या जात असताना कुडचडे पोलिस तक्रारीची वाट पाहत बसले.
वास्तविक, अशा प्रकरणांत पोलिस अधिकाऱ्यांना गुन्हा नोंद करून तपास करण्याची पूर्ण मोकळीक असते. पण, पोलिस साक्ष शोधत बसले. हा शुद्ध बोटचेपेपणा, कर्तव्यात कुचराई आहे. एका पत्रकाराने पुढे येऊन पुराव्यांसह जबाब दिल्यानंतर व स्थानिकांच्या संयमाचा अंत होऊ लागल्यावर अखेर पोलिसांनी गुन्हा नोंदवला.
असे प्रकार घडू नयेत म्हणून पोलिस काय कृती करतात? पोलिस राजकीय नेत्यांचे मांडलिक बनलेत. परिणामी धाक लयास गेलाय. गुन्हे घडू नयेत वा त्याची व्याप्ती वाढू नये यासाठी पोलिसांना ‘सिक्रेट सर्विस’ फंडिंगही होते, ज्याची कधीच उघड चर्चा होत नाही. तरीही पोलिस मागे का? कुडचड्यातील प्रकार ही काही दोन प्रौढांतील खासगी बात नव्हती.
प्रश्न पीडित अल्पवयीनांचा होता. त्यांना संरक्षण देणे हे पोलिसांचे कर्तव्य आहे. विशेष म्हणजे देशात बालहक्क कायदा प्रथम स्थापन करणाऱ्या गोव्यात पोलिसांची जबाबदारी अधिक वाढते. अशी प्रकरणे संवेदनशीलपणे हाताळायला हवीत.
पोलिस ठाण्याबाहेर लोक जमण्याची वाट पाहावी, कुणी पीडिता तक्रार देण्यास पुढे येईल, याकडे डोळे लावून बसणे म्हणजे बेमुर्वतखोरपणा नव्हे का? महिलेच्या चारित्र्याची काचेशी तुलना करणाऱ्या समाजात पीडिता तक्रार देण्यास आपणहून पुढे येईल, अशी सुतराम शक्यता नसते. तसे कुणी आल्यास पोलिस विश्वासपात्रही नाहीत.
तिच्यावर दबाव, कुटुंबाला त्रास होऊ शकतो. भारतीय न्याय संहितेअंतर्गत पहिला गुन्हा नोंदवला, अशी स्वत:ची पाठ थोपटून घेणाऱ्या पोलिसांना खरीच चाड असल्यास प्रकरणाचा तपास वेगाने करावा. भक्कम पुरावे निर्माण करा. त्यासाठी विश्वासार्हता निर्माण करावी लागेल, जपावी लागेल. संशयितावर ‘पॉक्सो’ अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहेच.
त्याला कठोर शिक्षा झाली तरच समाजात अशी लिंगपिसाट कृत्ये करण्यास कुणी धजावणार नाही. इथे पालकांनीही वेळीच दखल घेतली नाही. मुलाने काहीही केले तरी सत्ता, संपत्ती याच्या बळावर त्याला वाचवू शकतो, हा अहंगंड मुलाच्या मानसिक विकासाआड आला.
एका जबाबदार लोकप्रतिनिधीचा मुलगा म्हणून आपण कसे वागले पाहिजे, याचे बाळकडूच त्याला मिळाले नसावे. आपला मुलगा काय करतोय, याची जराही कुणकुण आईवडिलांना नसेल हे पटत नाही. ते माहीत झाल्यावर त्याचे कान उपटायचे सोडून त्याला वाचवण्याचा प्रयत्न करणे, म्हणजे एका लिंगपिसाटाला प्रोत्साहन देणे.
हे पालकांच्या लक्षांत येत नसेल तर मग त्याच्या अध:पतनास तेही तितकेच जबाबदार आहेत. एका भोंदू बाबाचा लिंगपिसाटपणा महाराष्ट्रात गाजत असताना, गोव्यातही तेच घडावे? शरमेने मान खाली घालायला लावणारी ही घटना आहे.
आम्ही गेली ६४ वर्षे ज्या विकृतीवर आसूड ओढत राहिलो तिच्यावर आज वर्धापनदिनीच लिहावे लागेल, असे वाटले नव्हते. या विकृतीकडे व ती पोसणाऱ्या सत्तांधतेकडे आणि पाठीशी घालू पाहणाऱ्या पोलिस यंत्रणेकडे फार गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.
स्वत:च्याच घरची अल्पवयीन मुलगी अशाच कुणाकडून तरी फसवली गेली तर काय आभाळ कोसळले असते, याचा विचार या प्रकरणाशी संबंधित सर्व व्यक्तींनी अवश्य करावा. स्वत:च्याच मुलीला त्या मुलींच्या जागी ठेवून पाहावे. निदान याचे गांभीर्य थोडे तरी लक्षात येईल. मुलीशी कसे वागावे, कसे तिचे संरक्षण करावे, याचे शिक्षण मुलांना घरातच दिले जात नाही तेव्हा अशी कृत्ये घडतात.
याला जेवढा तो मुलगा जबाबदार आहे, तेवढेच पालकही जबाबदार आहेत. तडा गेलेल्या काचेच्या भांड्याला जोडले, तरी ‘जोडले आहे’ असे वाटण्याऐवजी ते ‘तुटले होते’ याची जाणीवच जास्त सलते. या मुलींबाबतही तीच अवस्था आहे. हे प्रकरण अत्यंत नाजूक आहे, ते तशाच कुशलतेने हाताळावे लागेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.