मिलिंद म्हाडगुत
कॉंग्रेस पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंच्या सभेमुळे राज्यात वातावरण निर्मिती निश्चितच झाली आहे. आता या वातावरण निर्मितीला पताका लावण्याचे काम स्थानिक काँग्रेस नेत्यांनी करायला हवे. आणि तसे झाले तरच भाजपचा अश्वमेध रोखणे शक्य होईल. पण तरीही कॉंग्रेस मुसंडी मारू शकेल का; हा प्रश्न कायम आहे.
काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नुकत्याच वेर्णा येथे झालेल्या जाहीर सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांचे मनोधैर्य वाढले आहे, यात शंकाच नाही. आता येत्या निवडणुकीत आम्ही भाजपवर मात करू शकू, असा विश्वासही त्यांच्या बोलण्यातून व्यक्त व्हायला लागला आहे. हा सकारात्मक दृष्टिकोन चांगला असला तरी शेवटी संकल्प आणि सिद्धी यात बरीच तफावत असते हेही तेवढेच खरे आहे. गेल्या निवडणुकीच्या वेळीही थोड्याफार प्रमाणात असेच वातावरण होते. पण असे असूनही काँग्रेस ११चा उंबरठा ओलांडू शकली नाही.
तसे पाहायला गेल्यास सध्या राज्यात भाजप सरकारला पूरक, असे वातावरण नाही. वाढलेली बेरोजगारी, गुन्हेगारी , प्रशासनातली ढिलाई यामुळे सामान्य नागरिक मेटाकुटीला आल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. त्यात परत अनेक आंदोलने डोके वर काढताना दिसत आहेत. आदिवासींकरता चार मतदार संघ आरक्षित होणार असे वाटत असले तरी हे आरक्षण या निवडणुकीत होणार की नाही याबद्दल अजूनही संभ्रम आहे. म्हणूनच तर आदिवासी इशाऱ्यांमागून इशारे देताना दिसत आहेत.
मराठी गोव्याची राजभाषा व्हावी म्हणूनही काही घटकांकडून आवाज उठवला जात आहे. ‘इनफ इज इनफ’ची चळवळ ही मी म्हणताना दिसू लागली आहे. युवा पिढी ‘जेन-झी’च्या माध्यमातून सरकारला ललकारू लागली आहे. त्यात परत अनेक मतदारसंघात भाजपातच गट-तट पडलेले दिसताहेत. अनेकजण भाजपच्या उमेदवारीकरता इच्छुक असल्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये बंडखोरी होऊ शकते, असा कयासही व्यक्त होत आहे. असे बरेच मुद्दे सध्या भाजपच्या विरोधात असले तरी भाजपला हरविणे वाटते तेवढे सोपे नाही हेही तेवढेच खरे आहे. लक्षात घ्या, मागच्या वेळी ६७ टक्के जनता विरोधात असून सुद्धा भाजपने सत्ता पटकावून दाखवली होती.
त्यावेळी भाजपचे वीस आमदार निवडून आले असले तरी त्यातले पाच अगदी काठावर उत्तीर्ण झाले होते. आता असे काठावर येऊनही त्यांचा पराभव का होऊ शकला नाही, याचे उत्तर काँग्रेसने प्रथम शोधायला हवे. त्याचप्रमाणे भाजपकडे असलेल्या, ‘हेवी वेट’ नेत्यांचा काँग्रेस खरेच पराभव करू शकेल का, याचाही आढावा घेतला पाहिजे. सध्या भाजप जवळ किमान दहा तरी असे नेते आहेत जे स्वबळावर आरामात निवडून येऊ शकतात. त्यामुळे दहापासून भाजपची सुरुवात होण्याची शक्यता सध्या तरी दिसत आहे.
तसे काँग्रेस जवळ नेते नाहीत. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव चा थोडाफार अपवाद वगळता स्वबळावर खात्रीने निवडून येऊ शकेल, असा एकही नेता सध्या तरी काँग्रेसकडे दिसत नाही. आता भाजपची उमेदवारी न मिळालेले काही प्रबळ नेते काँग्रेसमध्ये येऊन उमेदवारी मिळवू शकतात. पण हे असले भाजप वृत्तीचे नेते काँग्रेसमध्ये किती दिवस टिकतील, हे सांगणे मात्र कठीण आहे. याची साक्ष इतिहासच देताना दिसत आहे. त्यामुळे खर्गेनी आगामी निवडणूक जिंकण्याचा कितीही विश्वास दाखवला तरी वस्तुस्थिती तसे सांगत नाही. याचा अर्थ हे उद्दिष्ट गाठणे अशक्य आहे, असेही नाही.
१९७७ साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लावलेल्या आणीबाणीला कंटाळून जनतेने तेव्हापर्यंत अपराजित राहिलेल्या इंदिरा गांधी आणि काँग्रेसचा पराभव घडवून आणला होता, याचे दाखले इतिहास देत आहे. पण त्यावेळी तो लोकांचा उत्स्फूर्त उद्रेक होता. याचा अर्थ राजकारणात काहीही घडू शकते, असाच होतो. त्याकरता तशी तयारी मात्र हवी. खर्गेंच्या या सभेमुळे वातावरण निर्मिती निश्चितच झाली आहे. आता या वातावरण निर्मितीला पताका लावण्याचे काम स्थानिक काँग्रेस नेत्यांनी करायला हवे. आणि तसे झाले तरच भाजपचा अश्वमेध रोखणे शक्य होईल. अन्यथा काँग्रेसचे पुन्हा मुसंडी मारण्याचे स्वप्न हे ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ सारखे ठरू शकेल हे निश्चित.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.