

Bengaluru IT Professional Turns Rapido Auto Driver: बंगळुरुतील एका आयटी प्रोफेशनल तरुणीची प्रेरणादायी कहाणी सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. सुस्थितीत असलेली कॉर्पोरेट नोकरी सोडून या तरुणीने रॅपिडो ऑटो चालवण्याचा साहसी मार्ग पत्करला. यामागील तिची संघर्षमय आणि प्रेरणा देणारी पार्श्वभूमी पाहून नेटकरी तिचे कौतुक करत आहेत. वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी या तरुणीवर आली.
आयटी (IT) क्षेत्रातील उशिरापर्यंत चालणाऱ्या नाईट शिफ्ट्समुळे ती आपल्या घरी एकट्या असलेल्या आईला वेळ देऊ शकत नव्हती. आईची काळजी घेण्यासाठी आणि कामाच्या वेळेतील फ्लेक्सिबिलिटीसाठी तिने कॉर्पोरेट जगताला रामराम ठोकत ऑटो चालवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचा फायदा असा झाला की, तिला आता आईसाठी वेळ देता येतो.
डिजिटल कंटेंट क्रिएटर तन्वीने या तरुणीची मुलाखत घेऊन इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केल्यानंतर तिचा हा प्रवास जगासमोर आला. व्हिडिओमध्ये तिने सांगितले की, हा निर्णय घेणे तिच्यासाठी अजिबात सोपे नव्हते. सुरुवातीला एका मुलीने ऑटो चालवावा यावर तिच्या कुटुंबीयांचाही विरोध होता. समाजात नेहमीच 'लोक काय म्हणतील?' अशी भीती घातली जाते, परंतु तिने या गोष्टीची पर्वा न करता स्वातंत्र्य आणि आत्मविश्वासाचा मार्ग निवडला. ऑटो चालवणे हे कोणतेही छोटे काम नाही, असे ती अभिमानाने सांगते. विशेष म्हणजे, आयटी सेक्टरमधील नोकरीपेक्षा आता ती ऑटो चालवून अधिक कमाई करत आहे. अनेकदा प्रवासी जेव्हा तिला अस्खलित इंग्रजी बोलताना पाहतात, तेव्हा ते थक्क होतात.
इन्स्टाग्रामवरील पोस्टमध्ये तिने समाजातील त्या जुनाट मानसिकतेवर कडक प्रहार केला, जी महिलांच्या प्रत्येक निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करते. कोणाच्याही मंजुरीची वाट पाहण्यापेक्षा आपल्या आयुष्याची सूत्रे स्वतःच्या हातात घेण्याचा निर्णय तिने घेतला. एकुलती एक मुलगी म्हणून तिने पुरुषांचे वर्चस्व मानल्या जाणाऱ्या क्षेत्रात पाऊल ठेवले. बहादुरी म्हणजे नेहमीच काहीतरी खूप मोठे किंवा असाधारण करणे नव्हे, तर अनेकदा फक्त एवढी हिंमत दाखवणे असते की, 'मला हे आवडते आणि मी माझ्या आवडीचा मार्ग निवडत आहे.' तिचा हा आत्मविश्वास आणि स्वावलंबन आज अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.