Civic Discipline Importance Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

हक्कांची जाणीव आहे, पण कर्तव्यांचे काय? समाजासमोरील मोठा प्रश्न

Civic Discipline Importance: मी माझ्या मुलीला शाळेत घ्यायला गेले होते. शाळा सुटण्याची वेळ असल्यामुळे रस्त्यावर नेहमीपेक्षा जास्त वर्दळ होती.

दैनिक गोमन्तक डिजिटल

सुलक्षा मनेष गावस

जेव्हा नियम पाळणे आपल्याला सहज शक्य असते किंवा त्यातून काही वैयक्तिक फायदा होत असतो, तेव्हा आपण त्यांचे महत्त्व मान्य करतो; परंतु त्याच नियमांचे पालन थोडेसे गैरसोयीचे वाटले की, त्यांना वळसा घालण्याचा प्रयत्न करतो.

मी माझ्या मुलीला शाळेत घ्यायला गेले होते. शाळा सुटण्याची वेळ असल्यामुळे रस्त्यावर नेहमीपेक्षा जास्त वर्दळ होती. पालक आपल्या मुलांना घेण्यासाठी आले होते, काही मुले घरी जाण्याच्या घाईत होती, तर काही जण मित्रांसोबत गप्पा मारत रस्त्यावरून चालत होती. अशातच अनेक वाहनांच्या मधून वाट काढत एक मोटारसायकल भरधाव वेगाने पुढे निघून गेली. त्या मोटारसायकलवर तीन शाळकरी मुले बसली होती.

वाहतूक नियमांचे उघडपणे उल्लंघन करताना त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा बेफिकीर आत्मविश्वास आणि थरार अनुभवण्याचा भाव होता. क्षणभर माझे लक्ष त्यांच्यावर खिळून राहिले. मनात नकळत एकच प्रार्थना उमटली, त्यांची आणि त्यांच्या मार्गात येणाऱ्या इतर सर्वांची सुरक्षितता अबाधित राहो. घटना तशी साधीच होती. परंतु अशा साध्या दिसणाऱ्या प्रसंगांतून आपल्या समाजातील एका मोठ्या वास्तवाचे दर्शन घडते.

आपण सर्वजण आपल्या सोयीच्या परिघात बसेल, तसे नियम पाळतो किंवा मोडतो. जेव्हा नियम पाळणे आपल्याला सहज शक्य असते किंवा त्यातून काही वैयक्तिक फायदा होत असतो, तेव्हा आपण त्यांचे महत्त्व मान्य करतो; परंतु त्याच नियमांचे पालन थोडेसे गैरसोयीचे वाटले की, त्यांना वळसा घालण्याचा प्रयत्न करतो. म्हणूनच नागरी अनुशासन आणि नियम पालन या विषयावर प्रत्येकाने आत्मचिंतन करण्याची गरज आहे असे मला मनापासून वाटते.

आपल्या गोव्यात गेले काही दिवस ज्या घटना घडत आहेत त्याकडे सजगपणे पाहिले तर समाजाच्या सामूहिक मानसिकतेचे अनेक पैलू उलगडतात.रस्त्यावर घडलेले अपघात, निष्काळजीपणामुळे झालेली जीवितहानी, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्यासारख्या कृतीत, समाजहितापेक्षा वैयक्तिक सोयीला दिले जाणारे प्राधान्य, सामाजिक मालमत्तेची होणारी नासधूस, वाढते अपघात, आत्महत्या, गुन्हेगारी आणि नियमभंगाच्या असंख्य घटना या सर्व गोष्टी केवळ स्वतंत्र घटना नाहीत. त्या आपल्या सामाजिक मूल्यव्यवस्थेचे प्रतिबिंब आहेत.

अशा वेळी मनात एक प्रश्न वारंवार डोकावतो , ‘आपण आपल्या समाजाला नेमके कुठे घेऊन चाललो आहोत?’ अलीकडे मी भारतीय वायुदलातील एका महिला अधिकाऱ्याची कथा सांगणारा ‘तेजस’ हा चित्रपट पाहिला. त्यामध्ये नायिकेचे एक प्रेरणादायी भाषण आहे. ती म्हणते की, जर प्रत्येक नागरिकाने देशाकडे आपल्या मोठ्या घराप्रमाणे पाहिले, तर त्याची काळजी घेणे ही आपली नैसर्गिक जबाबदारी बनेल. हा विचार मला अत्यंत महत्त्वाचा वाटतो. त्याला जोडून मी एवढेच म्हणेन की, सामाजिक जबाबदारी पार पाडताना आपण कोणावर तरी उपकार करत नाही.

आपण आपल्या स्वतःच्या घराची, आपल्या स्वतःच्या परिसराची आणि आपल्या स्वतःच्या समाजाची काळजी घेत असतो.एका अर्थाने हे आपण स्वहितासाठीच करत असतो. ‘हे माझे आहे आणि त्याचे जतन करणे ही माझी जबाबदारी आहे’, ही भावना समाजात रुजणे आवश्यक आहे. सुरवातीला नियम म्हणून पाळलेल्या गोष्टी पुढे जाऊन आपल्या शिस्तबद्ध जीवनशैलीचा भाग बनून जातात. अमेरिकन मानसशास्त्रज्ञ लॉरेन्स कोहलबर्ग यांनी मांडलेल्या नैतिक विकासाच्या सिद्धांतात व्यक्तीची नैतिक विचारसरणी कशी विकसित होत जाते हे स्पष्ट केले आहे.

सुरुवातीला माणूस शिक्षेच्या भीतीने नियम पाळतो. पुढे सामाजिक मान्यता मिळावी वा कायद्याचा आदर राखावा म्हणून नियमांचे पालन करतो. परंतु नैतिक विकासाची सर्वोच्च पायरी अशी असते, की जिथे व्यक्ती न्याय, समानता, परस्पर आदर आणि सामूहिक कल्याण या मूल्यांच्या आधारे निर्णय घेते. नियम पाळण्यामागे भीती नसते; तर योग्य ते करण्याची अंतःप्रेरणा असते. हा प्रवास सहज घडत नाही.

त्यासाठी व्यक्तीची जडणघडण महत्त्वाची असते. म्हणूनच माझी सर्वाधिक आशा मुलांवर आहे. पालकांशी आणि मुलांशी संवाद साधताना मी नीतिमूल्ये, कर्तव्यभावना, परस्पर सहकार्य, शिस्तप्रियता आणि सामूहिक हिताची जाणीव या विषयांवर वारंवार चर्चा करण्याचा प्रयत्न करते. दुर्दैवाने, मुलांना घडवताना शैक्षणिक यश, स्पर्धा आणि करिअर यांना जसे महत्त्व दिले जाते, तसे सामाजिक जबाबदारी आणि नागरी कर्तव्यांना दिले जात नाही.

मुलं शब्दांपेक्षा कृतीतून अधिक शिकतात. घरातच जर पालक नियमांचे उल्लंघन करत असतील, वाहतुकीचे नियम मोडत असतील, सार्वजनिक जागांची काळजी घेत नसतील किंवा शिस्तीला दुय्यम स्थान देत असतील, तर मुलांसमोर नकळत चुकीचे आदर्श उभे राहतात. शाळांमध्ये शिस्तीचे धडे दिले जातात; परंतु अनेकदा ते ‘हे करा’ आणि ‘हे करू नका’ या आदेशांच्या चौकटीतच अडकून राहतात. परिणामी, नियमांचे कारण समजून घेण्याऐवजी त्यांच्याविरुद्ध जाण्यातच काही मुलांना मोठेपणा वाटू लागतो.

वाहतूक नियमांच्या बाबतीतही हेच चित्र दिसते. लाखो रुपये खर्च करून वाहन खरेदी करणारा व्यक्ती दर्जेदार हेल्मेट वापरण्यात किंवा सीटबेल्ट लावण्यात मात्र हलगर्जीपणा करतो. वाहनांमध्ये सुरक्षा यंत्रणा म्हणून दिलेले इशारे बंद करण्यासाठी नवनवीन युक्त्या शोधल्या जातात. नियमांचे पालन ही स्वतःच्या आणि इतरांच्या सुरक्षेची गरज आहे, हे समजून घेण्याऐवजी त्याकडे त्रासदायक बंधन म्हणून पाहिले जाते.

खरे तर कोणतेही नियम हे केवळ प्रशासनाची सोय व्हावी म्हणून बनवलेले नसतात, वा त्यात कुणाचा जाच करण्याचा हेतू असतो. त्यामागे समाजाचे हित, सुरक्षितता आणि सुव्यवस्था यांचा विचार असतो. परंतु नागरी शिस्त ही प्रशासनाची जबाबदारी आहे आणि आपण फक्त त्यावर टीका करणारे प्रेक्षक आहोत, अशी मानसिकता आपल्यात वाढताना दिसते. आपण सतत ‘सिस्टम’ला दोष देतो; पण त्या सिस्टमचा अविभाज्य भाग आपण स्वतः आहोत, हे विसरतो.

जसे आपण आपल्या हक्कांबद्दल जागरूक असतो तेवढीच जागरूकता आपल्या जबाबदारीबद्दल असणे महत्वाचे आहे. समाज बदलण्याची सुरवात ही स्वतःपासून होणे अनिवार्य आहे . ती आपल्या दैनंदिन कृतींमधून होते, वाहतूक नियम पाळण्यातून, सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवण्यातून, इतरांच्या हक्कांचा आदर करण्यातून, आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आपल्या मुलांसमोर जबाबदार वर्तनाचा आदर्श ठेवण्यातून. नागरी शिस्त ही बाहेरून लादलेली गोष्ट नसून अंतर्मनातून स्वीकारलेली जीवनशैली बनली, तरच आपण अधिक सुरक्षित, संवेदनशील आणि सुसंस्कृत समाजाकडे वाटचाल करू शकू.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: माहेरी गेलेली बायको परत आली नाही, नैराश्यातून तीन पोरींचा जीव घेऊन स्वतःला संपवलं; सुधाकरनं ओलांडली 'क्रूरतेची सीमा'

PM Kisan Nidhi 23rd Installment: पीएम किसानचा 2,000 रुपयांचा हप्ता उद्या खात्यात! यादीत नाव नसल्यास पैसे अडकू शकतात, आत्ताच अशी करा पडताळणी

Goa Development: गोव्यासाठी दिल्लीतून सुटला तब्बल 2000 कोटींचा निधी! केंद्र आणि राज्य सरकार मिळून गोव्याचा चेहरामोहरा बदलणार; कामतांचा विश्वास

Goa Tourism: 'पर्यटनात विविधता, कुशल मनुष्यबळ निर्मितीवर सरकारचा भर', राज्यात 5 नवीन महाविद्यालयांची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

Goa Water Crisis: "गोव्यातील पाणीटंचाईला सावंत सरकारच जबाबदार", युरी आलेमाव यांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT