

पणजी: राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रंजिता पै यांचा कार्यकाळ संपून तब्बल ८७ दिवस उलटले तरीही सरकारकडून नव्या अध्यक्ष आणि सदस्यांची नियुक्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या महिलांमध्ये तीव्र निराशा व्यक्त केली जात आहे.
यापूर्वी माजी अध्यक्षा विद्या गावडे यांचा कार्यकाळ संपल्यानंतर सरकारने उशिरा रंजिता पै यांची ५ मार्च २०२३ रोजी नियुक्ती केली होती. त्या काळातही काही महिने आयोग सदस्यांविना कार्यरत होता. तरीही रंजिता पै यांनी प्रलंबित प्रकरणांवर सुनावण्या घेऊन अनेक खटले निकाली काढले होते.
आयोगाचा कार्यकाळ ५ मार्च २०२६ रोजी संपल्यानंतर महिला व बाल कल्याण खात्याने नवीन नियुक्तीसाठी फाईल सरकारकडे पाठवली होती. मात्र, अद्याप आयोगाची पुनर्रचना झालेली नाही. आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी काही दिवसांपूर्वीच लवकरच नियुक्ती होईल, अशी हमी दिली होती.
दरम्यान, कौटुंबिक व सामाजिक छळाच्या प्रकरणांमध्ये महिलांना महिला आयोग हा महत्त्वाचा आधार असतो. आयोगाकडे सुनावणी, समुपदेशन आणि त्वरित न्याय मिळवून देण्याचे काम केले जाते. आयोग रिक्त असल्याने अनेक पीडित महिला (Women) न्यायापासून वंचित राहत असल्याची भावना व्यक्त होत आहे. महिला संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी सरकारने तातडीने आयोग स्थापन करून प्रलंबित प्रकरणांना न्याय देण्याची मागणी केली आहे.
महिला आयोगासंदर्भातील फाईल सरकार दरबारी असून, नवा अध्यक्ष आणि सदस्यांच्या नेमणुकीबाबत विचारविनिमय सुरू आहे. लवकरच नव्या आयोगाची स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती महिला आणि बाल कल्याण खात्याचे सचिव यतिंद्र मरळकर यांनी दिली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.