Chhatrapati Shivaji Maharaj in Goa Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

History: पोर्तुगीजांचे षड्यंत्र अन् शिवरायांचा गनिमी कावा; गोव्याचा 'भारतीय चेहरा' जपण्यासाठी दिलेला ऐतिहासिक लढा

Chhatrapati Shivaji Maharaj in Goa: छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि कार्याचा प्रभाव पोर्तुगालमध्ये स्थायिक आणि भारतीय संस्कृतीशी नाळ राखून ठेवलेल्या कवी आणि लेखकांवर पडला होता.

गोमंतक ऑनलाईन टीम

छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाही, निझामशाही, मोंगल, सिद्दी, पोर्तुगीज आणि ब्रिटिश सत्तेविरुद्ध कधी प्रत्यक्ष तर कधी गनिमी काव्याने झुंज देत हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. रंजलेल्या, गांजलेल्या नानाविध जातीजमातींत विखुरलेल्या कष्टकऱ्यांना स्वाभिमानी जगण्याचा मंत्र दिला. त्यामुळे दिल्लीच्या सिंहासनावर विराजमान झालेल्या औरंगझेबाला दख्खनात यावे लागले आणि जेथे गवताला भाले फुटतात ते अनुभवताना, हताशपणे जीवनाच्या इतिश्रीला सामोरे जावे लागले.

प्रारंभी आदिलशाही सत्तेच्या छत्रातून त्यांनी सत्तरी, डिचोली आणि महाल मुक्त करून सांगे, काणकोण आणि केपे महालांवरही आपले वर्चस्व प्रस्थापित केले. त्याचबरोबर तिसवाडी, सासष्टी आणि बार्देशातल्या धार्मिक आणि सांस्कृतिक उच्चाटनाला वेसण घालण्यात यश संपादन केले. धर्म समीक्षण संस्थेच्या माध्यमातून पोर्तुगिजांनी गोव्यातील भारतीय धर्म आणि संस्कृती यांच्याशी अनुबंध राखणाऱ्या बहुतांश संचितांचे उच्चाटन करण्याचा आसुरी प्रयत्न केला.

त्याच्या केवळ आठवणी ही वेदनादायी अशाच आहेत. गोव्याचा भारतीय चेहरामोहरा बदलून त्याला पोर्तुगीज ओळख देण्याचे षड्यंत्र शिवाजी महाराज आणि त्यानंतर सत्तास्थानी आलेल्या मराठ्यांनी सहजासहजी सफल होऊ दिले नाही. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे गारूड केवळ मराठी मनावरच पडले नाही तर तत्कालीन हिंदी भाषिक कवींबरोबर, चक्क औरंगझेबाचा चरित्रकार असणाऱ्या काफीखानालाही दखल घेणे भाग पडले.

दक्षिणेतून आलेले कवि भूषण यांनी :

इंद्र जिमि जंभ पर, बाड़व ज्यौं अंभ पर,

रावन सदंभ पर रघुकुल राज है।

पौन बारिबाह पर, संभु रतिनाह पर,

ज्यौं सहस्रबाहु पर राम द्विजराज है।

दावा द्रुमदंड पर, चीता मृगझुंड पर,

भूषन बितुंड पर जैसे मृगराज है।

तेज तम अंस पर, कान्ह जिम कंस पर,

यौं मलेच्छ-बंस पर सेर सिवराज है॥

हे वीर रसाने भारलेले काव्य तर जगप्रसिद्ध आहे.

छत्रपती शिवाजी महाराजाशी पोर्तुगिजांनी अनेकवेळा युद्धे लढली तरी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची प्रचंड छाप त्यांच्यावर पडली होती त्यामुळे पोर्तुगीज विसरई कोंदि द सां विसेंत यांनी आपल्या एका पत्रात शिवाजी महाराजांची धूर्तता, शौर्य, चपळाई व शहाणपण पाहता त्यांची सीझरशी व अलेक्झांडरशी तुलना करता येईल असे नमूद केले होते.

शिवाजी महाराजांनी जेव्हा कुडाळ, भतग्राम आणि पेडणे या दक्षिण कोकणातील प्रदेशांवर स्वारी केली तेव्हा तेथील कुडाळचे लखम सावंत, पेडणेचे केशव नाईक व केशव प्रभू तसेच भतग्रामचे रवळू शेणवी या आदिलशाहीच्या सत्तेखाली असणाऱ्या देसायांनी महाराजांशी युद्ध छेडले. परंतु त्यांचा महाराजाविरुद्ध मात्र निभाव न लागल्याने त्यांनी आपल्या कुटुंबासह आश्रय पोर्तुगिजांच्या छत्रछायेत घेतला होता त्यामुळेच महाराजांनी १६६७साली बार्देशवर स्वारी करून त्याचा यशस्वीरीत्या वचपा काढला होता.

शिवाजी महाराजांचा पोर्तुगीज चरित्रकार कोस्मे द ग्वार्द याने महाराज शत्रूच्या बायकांस अत्यंत आदराने वागवत असल्याचे नमूद केलेले आहे. जुन्या गोव्याच्या मांडवी नदीपल्याड असणाऱ्या भतग्रामातल्या नार्वे येथे महाराजांनी १६६८साली गोवा कदंबांचे राजदैवत असणाऱ्या श्रीसप्तकोटेश्वराच्या मंदिराचा जो जीर्णोद्धार केला, त्याद्वारे त्यांनी धर्मांधांना खैर केली जाणार नाही असा जणू काही इशाराच दिला होता.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि कार्याचा प्रभाव पोर्तुगालमध्ये स्थायिक आणि भारतीय संस्कृतीशी नाळ राखून ठेवलेल्या कवी आणि लेखकांवर पडला होता आणि त्याची प्रचिती आदेवोदातु बार्रेतु या कवीच्या कवितांतून प्रकर्षाने येते. १९२८साली पोर्तुगालच्या कोइंब्र शहरात त्यांनी ‘शिवाजी’ या शीर्षकाच्या कवितेत कवी पोर्तुगालच्या सागराकडे पाहून म्हणतो की, त्याचे कृत्य वादळासारखे विश्वासघाताचे आहे. मग भवानीदेवीला आर्त हाक मारून विचारतो, तुझ्या मंदिराच्या संरक्षणासाठी आणि तुझ्या लोकांच्या विमोचनासाठी भारतात तू पुन्हा एकदा शिवाजी का निर्माण करत नाही? असा प्रश्न विचारतो .

गोव्यातल्या लोकमानसाला शिवाजी महाराजांचे विलक्षण आकर्षण होते आणि त्यांच्या कार्यावर अढळ विश्वासही होता. त्यामुळे पोर्तुगिजांविरुद्ध सातत्याने लढणाऱ्या कुंकळ्ळीच्या लढवय्या गावकऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजाशी स्नेहबंध प्रस्थापित केले होते, त्याची ग्वाही देणारे पुरावे उपलब्ध आहेत .

३० एप्रिल १६७५ रोजी शिवाजी महाराजांचे सैन्य काही देसायांचा पाठलाग करीत पोर्तुगिजांच्या ताब्यात असलेल्या चांदर गावात शिरले होते व खुद्द शिवाजी महाराज रणमस्त खानाचा पाठलाग करीत कुंकळ्ळीत शिरले होते.

हा प्रश्न गोव्याच्या व्हिसेरेइने राज्य सल्लागार मंडळासमोर मांडला असता सल्लागारांनी विसरइला सल्ला दिला की, शिवाजी महाराजांकडून प्रस्तुत आगळिकीचा फायदेशीर खुलासा करून घेण्यासाठी त्यांच्या गोवा दरबारांतील वकिलास स्थानबद्ध करून ठेवावे. ३० एप्रिल १६७५ या दिवशी गोवा शहरात विसरई आणि हिंदुस्थानचे कॅप्टन जनरल कौंट द लावरादिव यांनी राज्य सल्लागार मंडळाच्या सभासदांची सभा बोलविली.

त्यांनी सभेला निवेदन केले की, ‘काल दि. २९ एप्रिलला दुपारी शिवाजीचे सैन्य काही देसायांचा पाठलाग करण्याच्या मिषाने आमच्या साष्टी प्रांतांतील चांदर गावात शिरले व त्याने तीन घरांची लुटालूट करून तेथील चर्चच्या नोकरास ठार केले असल्याचे पत्र मला रासई येथील ठाण्याच्या कॅप्टनने लिहिले आहे’. तो म्हणतो की, शिवाजीचे सैन्य कुंकळ्ळीच्या बाजारात येऊन दाखल झाल्याचे नमूद करतो. त्याचवेळी शिवाजी महाराजांचे वास्तव्य कुंकळ्ळीत होते असे संदर्भ आढळतात.

शिवाजी महाराजांनी नव्या काबिजादीतल्या प्रदेशाला शिवशाहीशी जोडून तिथल्या लोकांचे जगणे सुसह्य आणि समृद्ध करण्यात राज्यकर्ता म्हणून महत्त्वाचे योगदान दिले होते. त्यांच्या देव, धर्म आणि संस्कृतीचे संरक्षण आणि संवर्धन केल्यामुळे प्रजाहितदक्ष, कर्तव्यनिष्ठ आणि धर्मपरायण राजाविषयीचे प्रेम कित्येक शतकांनंतरही गोव्यात अभंग राहिले. त्याची प्रचिती त्यामुळे गोव्यातल्या कष्टकरी जातीजमातींत प्रामुख्याने येते. फुगडीसारख्या पारंपरिक लोकनृत्यांत त्यामुळे स्त्रिया गाऊ लागतात -

मालवण समुद्रात किल्ला

शिवाजी आत कसा शिरला ?

लाटा येती झराझर

किल्ला दिसे मनोहर....

- राजेंद्र पां. केरकर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतने सोडले लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद! अपयशाची स्वीकारली संपूर्ण जबाबदारी; पण संघात राहणार का?

NEET Paper Leak: 'फक्त बळीचा बकरा बनवून चालणार नाही, खऱ्या मास्टरमांइडला शोधा'; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि NTA ला सक्त ताकीद

Budh Gochar 2026: गुंतवणुकीतून बंपर नफा आणि परदेश प्रवासाचा योग! बुधाचे गोचर ठरणार वरदान; 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस

VIDEO: अंदाज चुकला की चपलेचा सणसणीत दणका! सोशल मीडियावर अतरंगी गेमचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी हसून हसून लोटपोट

स्मार्ट चष्म्यांच्या वापरातून फिक्सिंग... आयपीएल फायनलपूर्वी खळबळ, BCCI ॲक्शन मोडमध्ये! 'या' गोष्टीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT