भाजप-मगो युती आहे की काय, याबद्दलच शंका वाटायला लागली आहे. २०२७ साली होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजप-मगो युती असणार असे सांगितले जात असले तरी पडद्यामागून वेगळाच खेळ सुरू असल्याचे अनेक उदाहरणावरून प्रतीत होत आहे.
सध्या सरकारात भाजप-मगो युती आहे. मगोचे सर्वेसर्वा सुदिन ढवळीकर हे सरकारात वीज मंत्री आहेत. पण असे असूनसुद्धा या युतीचे पडसाद मात्र नुकत्याच पार पडलेल्या झेडपी निवडणुकीत उमटताना दिसले नाहीत. फोंड्यात तर हे चित्र जास्तच अधोरेखित झाले. या दोन पक्षांच्या फोंड्याच्या कार्यकर्त्यात कुठेही एकवाक्यता दिसली नाही.
बेतकी- खांडोळा या झेडपी मतदारसंघात तर मगो कार्यकर्ते उघडपणे अपक्ष सुनील भोमकर यांच्या प्रचारात वावरताना दिसत होते. आणि त्यांचा जय झाल्यावर हा जय मगोचा असल्याचे अनेक जण प्रतिक्रिया व्यक्त करतानाही बघायला मिळत होते. एवढेच कशाला परवा बांदोडा येथे झालेल्या मगोच्या कृतज्ञता मेळाव्यात भोमकरांचा सत्कारसुद्धा करण्यात आला. आता हा मगोचे ढवळीकर बंधू व प्रियोळचे आमदार गोविंद गावडे यांच्यामध्ये असलेल्या ’खुन्नस’चा परिणाम असे म्हटले जात असले तरी इतर मतदारसंघातही वेगळे चित्र दिसले नाही.
कवळे व प्रियोळ या मगोचे उमेदवार असलेल्या मतदारसंघात भाजपचे (BJP) कार्यकर्ते प्रचारापासून दूरच राहिलेले बघायला मिळाले. कुर्टीत तर वेगळेच चित्र दृष्टीला पडत होते. या मतदारसंघात कालपरवा मगोचे नेते असलेल्या डॉ. केतन भाटीकर यांनी आपला अपक्ष उमेदवार रिंगणात उतरवून भाजपसमोर मोठे आव्हान उभे केले होते. आणि वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांनी युतीच्या म्हणजे भाजपच्या उमेदवाराला मते देण्याचे आवाहन करूनसुद्धा या भागातील बरेच मगो कार्यकर्ते भाटीकरांबरोबर वावरताना दिसत होते. त्यामुळे सरकारात युती असूनसुद्धा या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचे मनोमीलन झाले आहे असे या झेडपी निवडणुकीत कधी वाटलेच नाही.
आता याला एका वर्षाने येणाऱ्या विधानसभा निवडणुकीचे कंगोरे आहेत यात शंकाच नाही. प्रियोळमधून परत एकदा मगो प्रदेशाध्यक्ष दीपक ढवळीकर यांना रिंगणात उतरायचे आहे हे काही लपून राहिलेले नाही. भोमचे सरपंच तथा या भागातील मगोचे नेते सुनील भोमकर यांना अपक्ष म्हणून रिंगणात उतरवणे हा मगोच्या रणनीतीचा एक भाग असल्याचेसुद्धा आता उघड होत चालले आहे. कुर्टी झेडपी मतदारसंघातून भाटीकरांनी अपक्ष उमेदवाराला पुढे करून भाजपला शह देण्याचा प्रयत्न करणे हाही याच रणनीतीचा भाग असू शकतो.
यावेळी जरी भाटीकरांचा अपक्ष उमेदवार निवडणूक हरला असला तरी त्या उमेदवाराला मिळालेली साडेपाच हजार मते नजरेआड केली जाऊ शकत नाहीत. आता लवकरच फोंडा मतदारसंघाची पोटनिवडणूक होणार असल्यामुळे ही मते महत्त्वाची ठरू शकतात. हे पाहता भाजप-मगो युती आहे की काय, याबद्दलच शंका वाटायला लागली आहे.
२०२७ साली होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजप-मगो युती असणार असे सांगितले जात असले तरी पडद्यामागून वेगळाच खेळ सुरू असल्याचे अनेक उदाहरणावरून प्रतीत होत आहे. मगोचे सर्वेसर्वा तथा विद्यमान वीजमंत्री सुदिन ढवळीकर (Sudin Dhavalikar) यांची ही शेवटची विधानसभा निवडणूक असू शकते. मडकई मतदारसंघातून सलग सहा वेळा तेही वाढत्या मताधिक्क्यांनी निवडून येऊनसुद्धा सुदिन अजूनपर्यंत मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत ही खंत अनेक मगो कार्यकर्त्यांना सलते आहे. आणि ही निवडणूक या दृष्टीने सुदिनाकरता शेवटची संधी ठरू शकते. यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत नवीन समीकरणे उदयाला येण्याची शक्यताही नाकारता येत नाही. ही झेडपी निवडणूक याची ’नांदी’ही ठरू शकते. यावेळी मगोचा त्यांना दिलेल्या तीनही मतदारसंघात विजय झालेला आहे.
बेतकी- खांडोळ्यातील विजय धरल्यास ही संख्या चारपर्यंत जाते. कुर्टी झेडपीचा थोडक्यात हुकलेला विजय ही विधानसभेच्या दृष्टीने त्यांची जमेची बाजू ठरू शकते. आणि विधानसभा निवडणुकीत पाच जागांवर विजय मिळविल्यास मगो म्हणजे ‘सुदिन’ हे ‘किंगमेकर’ ठरू शकतात आणि आगामी सरकार बनवताना त्याचा त्यांना फायदाही होऊ शकतो.
हे पाहता ही झेडपी निवडणूक मगोकरता आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने अनेक सकारात्मक बाबी घेऊन आल्याचे दिसत आहे. ढवळीकर बंधूंबरोबर मगो कार्यकर्त्यांचाही आत्मविश्वास वाढला असल्याचेही स्पष्ट व्हायला लागले आहे आणि यामुळेच भाजप-मगो युतीवरच प्रश्नचिन्ह उमटायला लागल्याचे दिसत आहे. आता हे प्रश्नचिन्ह कायम राहते का त्याचे स्वल्पविरामात रूपांतर होते याचे उत्तर मात्र येणारा काळच देणार आहे हे निश्चित.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.