Konkani Drama Competition Goa, Lava Bhuta Play Review Dainik Gomantak
मनरिजवण

Konkani Drama Competition: लावां भुतां, शापित घराची कहाणी सांगणारे नाट्य; नाट्यसमीक्षा

Lava Bhuta Play Review: काही नाटके अशी असतात, की ती प्रेक्षकांनाच बुचकळ्यात टाकतात. ओम कला सृष्टी, बांदोडे या संस्थेचे ‘लावां भुतां’ हे नाटक पाहून याचा प्रत्यय आला.

Sameer Panditrao

पणजी: काही नाटके अशी असतात, की ती प्रेक्षकांनाच बुचकळ्यात टाकतात. ओम कला सृष्टी, बांदोडे या संस्थेचे ‘लावां भुतां’ हे नाटक पाहून याचा प्रत्यय आला. तशी या प्रकारची अनेक नाटके यंदाच्या स्पर्धेत पाहायला मिळाली. त्यामुळे गेल्या वर्षीचा विचार करता यंदाची आतापर्यंतची कोकणी नाट्य स्पर्धा फिकी व रसहीन वाटू लागली आहे.

ओम कला सृष्टी संस्थेने गेल्या वर्षी ‘काळमाया’ या डॉ. जयंती नायक यांनी लिहिलेल्या संहितेचा सुबक प्रयोग सादर केला होता. त्यामुळे चार दिवसांच्या विश्रांतीनंतर सुरू झालेल्या या स्पर्धेत या संस्थेतर्फे काहीतरी नवीन पाहायला मिळेल, अशी अपेक्षा होती; पण ठिसूळ संहितेवर तेवढीच कच्ची बांधणी केल्यामुळे प्रयोगाचा डोलाराच कोसळला.

हॅन्रिक इबसन यांच्या मूळ ‘घोस्ट’ या संहितेचा कोकणी अनुवाद केला आहे तो ओलीव्हीन्यू गोम्स यांनी. मुळात ही संहिता नेमकी काय आहे, ती काय सांगू इच्छिते, हे शेवटपर्यंत कळत नाही. मंथन केल्यानंतर हाताला लागली ती कथा अशी... ऑलीविंगबाब हा व्यसनी माणूस असतो. त्याचे घरातील मोलकरणीसोबत वाईट संबंध असतात. त्यामुळे ते घर शापित ठरते. तो गेल्यानंतरही ते घर शापितच राहते. यालाच त्याची बायको ऑल्विंग बाय लावां - भुतां म्हणत असते.

मोलकरणीला आपल्या नवऱ्यापासून झालेली मुलगी रेजिना ती आपल्या घरात वाढवते; पण जेव्हा तिचा मुलगा ऑसॉल्ड रेजिनाला आपली बायको करू पाहतो, तेव्हा ऑल्विंग बायला खरे खरे सांगावे लागते. ऑसॉल्ड मानसिक रुग्ण असतो. आता यात रेजिनाचा ‘सो कॉल्ड’ पिता जेकब व एक फादर हेही धुमाकूळ घालताना दिसतात. आता या सर्वांचा शेवट काय होतो, हा या नाटकाचा उत्तरार्ध. त्या उत्तरार्धात काही ठोस हाती लागले, असेही नाही.

त्यामुळे ही संहिता म्हणजे भरपूर ठिगळे लावलेल्या गोधडीसारखी झाली आहे. आता यामुळे असली जान नसलेली संहिता स्पर्धेकरता का निवडली, हा प्रश्न उपस्थित होतो आणि तशी चर्चही नाटकाच्या मध्यंतरावेळी सुरू होती. बरे... या नाटकावर दिग्दर्शकाने काही संस्कार केले आहेत, असेही दिसले नाही. मुळात दिग्दर्शकाचे अस्तित्वच जाणवले नाही. नाही म्हणायला मध्यंतरावेळी पिता व पुत्राचा एकाच वेळी दाखवलेला व्यभिचार व ऑल्विंग बायने केलेला आक्रोश दिग्दर्शनातील थोडीफार चुणूक दाखवून गेला.

नाही तर सगळा आनंदी-आनंदच होता. काही पात्रे तर चक्क प्रेक्षकांकडे पाठ करून बोलत होती, तर काही पात्रे फक्त बोलतानाच दिसत होती. वाक्यात पूर्णविराम, स्वल्पविराम असतो आणि त्याप्रमाणे पॉज घ्यायचा असतो, हे त्यांच्या गावीच नसावे, असेच त्यांची ‘डायलॉग डिलिव्हरी’ ऐकून वाटत होते. परत संवादात काही अर्थ आहे, असेही दिसले नाही. भूमिकांबाबत बोलायचे तर ऑल्विंग बायच्या प्रमुख भूमिकेत सायली नाईक यांनी जीव तोडून काम केल्याचे दिसले. त्यांचा मुद्राभिनय ही वाखाणण्यासारखाच होता. त्यांच्या सजग अभिनयामुळे ‘डुबनेवाले को तिनके का सहारा’ या उक्तीची प्रेक्षकांना आठवण येत होती; पण त्यांचा अभिनय नाटकाला मात्र तारू शकला नाही.

पाद्री झालेले देवराज गावडे हे पाद्री कमी आणि रॉबिनहूड जास्त दिसत होते. पाद्री कसे बोलतात, हे एक तर त्यांना माहीत नसावे किंवा दिग्दर्शकांनी त्यांना तसे सांगितले नसावे, असेच त्यांच्या बोलण्यावरून वाटत होते. रेजिना झालेल्या आकांक्षा प्रभू त्या मानाने बऱ्या वाटल्या. बाकी पात्रे ‘यथा-तथा’च होती. नेपथ्य, प्रकाश योजना, पार्श्वसंगीत सर्व काही सामान्य श्रेणीत मोडण्यासारखे होते. नाटकाच्या सुरुवातीचे पावसाचे पार्श्वसंगीत वगळता पार्श्वसंगीतात उल्लेख करण्यासारखे असे काहीच आढळले नाही. एकंदरीत या नाटकाचा प्रयोग प्रेक्षकांच्या सहनशक्तीची परीक्षा घेण्याबरोबरच स्पर्धेत १५ नाटके होऊनही स्पर्धेची गोळाबेरीज काय, हा प्रश्न उपस्थित करून गेला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Arpora Nightclub Fire: बेकायदा नाईटक्लबवर कारवाई न करणं पडलं महागात, हडफडे पंचायतीच्या सचिवाची सेवेतून केली हकालपट्टी; गोवा सरकारचा मोठा दणका

सारा तेंडुलकरच्या हातातील 'त्या' बाटलीवरुन सोशल मीडियावर गदारोळ! गोव्यातील व्हिडिओ व्हायरल; नेटकऱ्यांनी सचिनच्या लेकीला केलं ट्रोल VIDEO

Bollywood: 2025 गाजवले छावा, धुरंधरने! सलमानसह अनेक स्टार्सचे सिनेमे फ्लॉप; वाचा 'या' वर्षाचा बॉलिवूडचा आलेख

परंपरेच्या नावाखाली निष्पापांचा बळी! खतना विधीदरम्यान 41 तरुणांचा मृत्यू, पालकांच्या हलगर्जीपणावर संतापले मंत्री; 41 जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

जर्मनीत बँकेची भिंत फोडून चोरी केले 290 कोटी रुपये; ख्रिसमसच्या सुट्ट्यांमध्ये केला होता मास्टर प्लॅन

SCROLL FOR NEXT