Birsa Munda Jayanti 2024 Dainik Gomantak
मनरिजवण

Birsa Munda Jayanti 2024: गोमंतकात ‘धरती अबा’चा पुतळा हवाच, तोही भव्य दिव्य...

Goa Birsa Munda Rally: आज देशभर केंद्र व राज्य पातळीवर ‘धरती बा म्हणजे भगवान बिरसा मुंडा यांची सलग शताब्दी (म्हणजे दीडशेवी) जयंती साजरी होत आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

डॉ. मधू घोडकिरेकर

आज देशभर केंद्र व राज्य पातळीवर ‘धरती बा म्हणजे भगवान बिरसा मुंडा यांची सलग शताब्दी (म्हणजे दीडशेवी) जयंती साजरी होत आहे. गोव्यातील जिल्हा स्तरावरील आयोजनाची जबाबदारी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात आली आहे. पेडणे ते काणकोणपर्यंत चार दिवस चालणाऱ्या भव्य रॅलीचे आयोजन आले आहे.

यंदा हे आयोजन आदिवासी खात्यातर्फे करण्यात आले आहे. या आधी म्हणजे मागील दोन तीन वर्षांपासून राज्य स्तरावरचा कार्यक्रम गोवा राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाकडून आयोजित जात आहे. यंदाही हा आयोग आपला कार्यक्रम करणार आहे, पण थोडा उशिरा. एकंदरीत यंदाची बिरसा मुंडा जयंती एवढ्या मोठ्या प्रमाणात का साजरा करावी, याचे स्पष्टीकरण माननीय पंतप्रधानांनी यापूर्वीच आपल्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून बोलताना दिले आहे.

माननीय पंतप्रधानांनी आपल्या या वार्तालाप कार्यक्रमाची सुरुवात, ‘जीवनात असे काही क्षण असे असतात की ते विसरू शकत नाही. गेल्या वर्षीच्या १५ नोव्हेंबरला मी भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त, त्यांच्या जन्मगावी म्हणजे झारखंडमधील उलिहाती येथे गेलो. येथील जमिनीवर माथे ठेवताच स्वातंत्र्यसंग्रामाची स्पंदने मला जाणवली!’, अशा शब्दांत केली. हाच धागा पुढे नेत त्यांनी ३१ ऑक्टोबरला होणारी भारताचे लोहपुरुष सरदार पटेल यांची १५०वी जयंती तसेच १५ नोव्हेंबरला होणारी बिरसा मुंडा यांचीही १५०वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्याचे आवाहन केले.

सरकारने लोहपुरुष सरदार पटेल यांच्या जयंतीला ‘राष्ट्रीय एकता दिवस’ असे, तर भगवान बिरसा मुंडा जयंतीला ‘राष्ट्रीय जनजाती दिवस’ असे नाव का नाव दिले, याची चर्चा त्यांनी केली. त्या दोघांच्या महानतेची एकमेकाशी तुलना केली. शिवाय, या दोघांची परत महात्मा गांधी व विवेकानंद स्वामी यांच्या कार्याशी तुलना केली.

तसेच महात्मा गांधी व विवेकानंद स्वामी यांच्या १५०व्या जयंत्या कशा थाटामाटात साजरा केल्या होत्या याची याची आठवण करून दिली. याद्वारे माननीय पंतप्रधानांनी भविष्यात स्वातंत्र्यसैनिकांची आठवणी कशा चढत्याक्रमाने जिवंत ठेवता येतील, याचा ‘रोडमॅप’ जनतेसमोर ठेवला. पंतप्रधानांनी गुजरतात सरदार पटेलांचा १८२ मीटर उंचीचा (म्हणजे जवळजवळ ४५ मजली इमारतीएवढा) पुतळा व स्मारक उभारून, पुतळा उभारणीचे संदर्भच बदलून टाकले. भगवान बिरसा मुंडांबाबत सांगायचे झाल्यास झारखंडमध्ये आपल्याकडे शिवाजी महाराजांचे पुतळे चौकाचौकांत दिसतात तसे बिरसा मुंडांचे पुतळे तेथे आहेत.

केंद्र सरकारच्या वतीने यंदा वीस फूट उंच पुतळा राजधानी दिल्ली येथे उभारला असून त्याचे उद्घाटन आज होणार आहे. रांचीजवळ एक १५० फूट उंचीच्या पुतळ्याच्या उभारणीची पायाभरणी सात आठ वर्षांपूर्वी झाली झाली आहे. त्यासाठी ‘हर घर एक पत्थर’ अशी संकल्पना पुढे आणली आहे. गोव्यातही त्यांचा पुतळा असावा अशी शिफारस आदिवासी खात्याने सरकारकडे केली आहे.

गेल्या वर्षी झालेल्या राष्ट्रपतींच्या भेटीदरम्यान, मी स्वत: हा विषय त्यांच्या समक्ष माननीय मुख्यमंत्र्यासमोर ठेवला होता. या पुतळ्यात भव्यता का असावी, याचे कारण त्यावेळी सांगितले होते. महामहीम राष्ट्रपतींनी, ‘तुमचे लाडके मुख्यमंत्री नक्कीच त्यासाठी प्रयत्न करतील’, असे सांगितले, तर माननीय मुख्यमंत्र्यांनी ‘आपल्याला हा विषय कळला’ असा आश्वासक प्रतिसाद दिला. पुतळा होणार हे नक्की, पण कसा व्हावा यावर विचार आजच्या दिवशी करणे समयोचित आहे.

गोव्यातील पुतळ्याची परंपरा पाहिल्यास पोर्तुगीज सरकारने उभारलेले आबा फरिया व दादा वैद्य यांचे पुतळे. मुक्तीनंतर महात्मा गांधी, आंबेडकर, हुतात्मा, स्वातंत्र्यसैनिक, दिवंगत स्वातंत्र्यसैनिक, शिवाजी महाराज यांचे पुतळे व खुर्चीवर असताना स्वर्गवासी झालेल्या दोन मुख्यमंत्र्यांचे पुतळे. हल्ली समुद्रकिनारी उभारलेला भगवान परशुरामाचा पुतळा या पंक्तीत बसत नाही, कारण पर्यटन खात्याने जास्त करून एक पर्यटकांनी पाहण्याचे प्रतीक म्हणून उभारले आहे.

गुजरातमध्ये उभारलेला सरदार पटेल यांचा पुतळा ही शोभेची वस्तू नसून तो महाकाय धातू पुतळा आहे. शोभेचे पुतळे कसे असतात याचे उदाहरण म्हणून महाराष्ट्रामध्ये हल्लीच कोसळलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे उदाहरण देता येईल. त्यामुळे बिरसा मुंडाच्या पुतळ्याची तुलना या परशुरामाच्या पुतळ्याशी करता येणार नाही. तसे पाहिल्यास, भगवान बिरसा मुंडा यांचा पुतळा सरकारने उभारला नाही तरी काहीच फरक पडणार नाही. याचे कारण म्हणजे आपल्याकडे हजारो वर्षांपासून आपल्या राखणदाराची स्मारके जळीस्थळी आहेत. भगवान बिरसा या राखणदाराची इतिहासात नोंद घेतली गेली व आतापर्यंत त्याची ख्याती देशभर पसरली आहे. हजारो वर्षांपूर्वीच्या राखणदाराचा मानवी चेहरा उपलब्ध नाही, पण भगवान बिरसा मुंडांचा आहे.

पौराणिक प्रतीकाच्या मूर्ती तयार करून भजतात तर ऐतिहासिक प्रतीकांचे पुतळे करून त्यांना मानवंदना देतात. भगवान मुंडा यांनी गोमंतकीय आदिवासीप्रमाणेच धर्मांतर होऊनही आपले आदिवासी अस्तित्व जिवंत ठेवले. आदिवासींना एकत्र आणण्यासाठी त्यांचा ‘बुदवंत’पणा कामी आला. त्यांच्या वनस्पती उपचार पद्धतीतील नैपुण्यामुळे ते लोकांसाठी ‘भगवान’ झाले. भूमी स्वाभिमानामुळे ‘धरती अबा’ झाले. जेथे आदिवासी तेथे भगवान बिरसा मुंडांचे यथायोग्य प्रतीक हवे, ते याचसाठी. आदिवासींच्या गतकाळातील नेतृत्व वैभवाची ती ऐतिहासिक साक्ष आहे.

आज दादा वैद्यांचा पुतळा आहे तो खुद्द पोर्तुगीज राजवटीत बांधला होता. त्यांनी केलेल्या उपचारांमुळे पोर्तुगीज व्हाइसरॉयच्या नातलगाचा इलाज झाला होता, त्यामुळे पोर्तुगिजांनी त्यांना मोठा मान दिला होता असे सांगितले जाते. त्यांची माहिती देणारे असेही सांगतात की दादा वैद्यांनी आपली स्वत:ची उपचार पद्धती तयार करताना, त्यांच्या परिसरात असलेल्या काळू गावडे या आदिवासी वैद्याच्या पारंपरिक आदिवासी वैद्यक ज्ञानाचा आधुनिक पद्धतीने वापर करून घेतला होता. दादा वैद्यांचा काळ व बिरसा मुंडाचा काळ जवळजवळ सारखाच. मूळ आदिवासी उपचार पद्धतींवर आधारीत दादा वैद्यांचा प्रभाव पोर्तुगिजांवर पडू शकला हे पाहता बिरसा मुंडा ही काय चीज असेल याची कल्पना करता येते.

आदिवासी राखणदाराची झाडे, उंच टेकडीवर असतात, त्यामुळे आज जे समुद्र किनारी शे-दीडशे मीटर उंचीचे पुतळे उभारतात त्या तुलनेत आदिवासी राखणदाराची स्मारके समुद्र पातळीपासून आधीपासूनच शे-दीडशे मीटर उंचीवर आहे. त्यामुळे भव्यता व दिव्यता आपोआप येते. भगवान बिरसच्या पुतळ्याचे नियोजन करताना, आपण राष्ट्रीय स्तरावरील आदिवासी राखणदाराचे आपण स्मारक उभारीत असून तेथे दर्शनासाठी गेलेल्या आपण एका ‘देवाच्या झाडा’कडे पोहोचलो आहे अशी अनुभूती यावी, अशा तर्‍हेचे नियोजन करावे. शेवटी काय, ‘दिव्यत्वाची जेथे प्रचिती, तेथे कर माझे जुळती’.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: नोकऱ्यांचा चोरबाजार! 'त्या' ऑडिओतील मोन्सेरात कोण? महसूलमंत्री संतापले, सखोल चौकशीची केली मागणी

Goa Today's News Live: मंत्री बाबूश यांना माझा पाठिंबा; सर्वच घोटळ्यांची व्हावी न्यायालयीन चौकशी - उत्पल पर्रीकर

Jonty Rhodes: राहण्यासाठी गोवा का निवडला? पर्यटन वादात दक्षिण आफ्रिकेच्या माजी क्रिकेटरने दिलेल्या उत्तराने मने जिंकली

PWD Goa: फक्त एका एक्लिवर मिळणार पिण्याच्या पाण्याचे सर्व अपडेट्स; PDW ची गोवेकरांसाठी नवीन उपाययोजना

Sreejita De: जर्मन नवरा, बंगाली नवरी! प्रसिद्ध अभिनेत्रीने गोव्यात प्रियकरासोबत दुसऱ्यांदा केले लग्न; पाहा Photo

SCROLL FOR NEXT