Nilkanth Halarnkar Thivim Candidate Dainik Gomantak
गोवा निवडणूक

थिवीत नीळकंठ हळर्णकर ‘बॅक फूट’ वर?

दैनिक गोमन्तक

पणजी : थिवी हा म्हापशानजीकचा मतदारसंघ. थिवी, शिरसई, नानोडा, रेवोडा,पीर्ण, अस्नोडा, कोलवाळ, कामुर्ली या पंचायती थिवी मतदारसंघात येतात. थिवी हा तसा ग्रामीण मतदारसंघ. नीळकंठ हळर्णकर हे इथले विद्यमान आमदार. मागच्या वेळी हळर्णकरांनी कॉंग्रेसतर्फे भाजपचे किरण कांदोळकर यांचा सातशे मतांनी पराभव केला होता. आता यावेळी हळर्णकरांचा ‘सामना’ किरण यांची पत्नी तथा जि.पं. सदस्य कविता कांदोळकर यांच्याशी आहे. त्या सध्या तृणमूल कॉंग्रेसतर्फे रिंगणात उतरल्या आहेत. किरण हे कांदोळकर हे हळदोणे मतदारसंघातील तृणमूलचे उमेदवार असून त्यांनी थिवीची जागा पत्नी कविता कांदोळकर यांना रिक्त करून दिली आहे. (Nilkanth Halarnkar Thivim Candidate News Updates)

किरण कांदोळकर यांनी 2012 साली राष्ट्रवादीतर्फे (NCP) लढणाऱ्या नीळकंठ हळर्णकर यांचा पराभव केला होता. त्यापूर्वी म्हणजे 2007 साली राष्ट्रवादी तर्फे हळर्णकर हे निवडून आले होते. त्यांनी भाजपच्या सदानंद तानावडे यांचा पराभव केला होता. 2007 साली तानावडे यांनी हळर्णकरांचा पराभव करून विधानसभा गाठली होती. तर 1994 व 1999 साली माजी उपसभापती दयानंद नार्वेकर यांनी कॉंग्रेसतर्फे विजयाची ‘मोहोर’ उमटविली होती. यावरून या मतदारसंघात कसे बदल झाले, हे दिसून येतात. आता दयानंद नार्वेकर जरी रिंगणात नसले तरी त्यांनी तृणमूलच्या कविता कांदोळकर यांना पाठिंबा दिल्याचे जाहीर केले आहे. नार्वेकरांची अजूनही या मतदारसंघात ताकद असल्यामुळे याचा फायदा कांदोळकर यांना होऊ शकतो.

कॉंग्रेसमधून भाजपमध्ये (BJP) केलेले पक्षांतरही त्यांच्या अंगाशी येते की काय, असे त्यांच्या काही समर्थकांना वाटू लागले आहे. सध्या थिवीतील हवा त्यांच्या विरोधात असल्यासारखे वाटत असलेतरी हळर्णकर हे ‘मुरब्बी’ खेळाडू असल्यामुळे ते चमत्कार घडवू शकतात, असा आशावाद त्यांचे कार्यकर्ते व्यक्त करताना दिसत आहेत. पण आता दिवस कमी राहिल्यामुळे हा आशावाद प्रत्यक्षात येण्यास हळर्णकरांना बरेच प्रयत्न करावे लागणार, हे निश्चित. कॉंग्रेसतर्फे अमन लोटलीकर रिंगणात असले तरी त्यांचा विशेष प्रभाव जाणवत नाही. मागच्या वेळी कॉंग्रेसने बाजी मारल्यामुळे त्याचा लोटलीकरांना फायदा मिळतो की काय हे पाहावे लागेल. आम आदमी पक्षातर्फे उदय साळकर हे रिंगणात असून या पक्षाच्या कार्याचा सध्या बराच गवागवा होत असल्यामुळे त्याचे फळ साळकरांना मिळते का,हे बघावे लागेल. गोंयचो स्वाभिमानतर्फे स्वप्नेश शेर्लेकर तर राष्ट्रवादीतर्फे गॉडफे डीलिमा, या रिंगणात आहेत. हे दोघेही कोणत्या पक्षाला हानिकारक ठरू शकतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. राष्ट्रवादीची उमेदवारी कॉंग्रेसला त्रासदायक ठरू शकते, यात शंकाच नाही.

मतदारांचे प्रश्‍न; हळर्णकरांची दमछाक !

या मतदारसंघाचा इतिहास पाहता वारंवार बदलणारी समीकरणे लक्षात येतात . कधी कॉंग्रेस (Congress), कधी भाजप, कधी राष्ट्रवादी अशी या मतदारसंघातील स्थिती दिसून येते. हळर्णकर व कविता कांदोळकर त्याचबरोबर रिव्होल्युशनरी गोवन्सचे सर्वेसर्वा मनोज परब हेही ‘एल्गार’ पुकारताना दिसत आहेत. त्यांच्याबरोबर अनेक युवक-युवती फिरत असून त्यांचा छुपा प्रचार चालू असल्याचे प्रत्ययाला येत आहे. आता हा प्रचार प्रत्यक्षात काय निकाल देतो, हे बघावे लागेल. विद्यमान आमदार नीळकंठ हळर्णकर यांची सध्या ‘स्थिती बिकट’ झाल्याचे दिसत आहे. अनेक ठिकाणी त्यांच्यावर प्रश्नांचा भडिमार होत असून या प्रश्नांची उत्तरे देताना त्यांची होणारी दमछाक अधोरेखित होत आहे.

‘गोवा फॉर गोवन्स ठरणार का प्रभावी ?

थिवीत सध्या गोमंतकीयांएवढ्याच बिगर गोमंतकीयांच्या मतांचा भरणा असून ही मते कोणाकडे वळतात, यावरही निवडणुकीचे भवितव्य अवलंबून आहे. सध्या कविता कांदोळकर या आमदारांच्या पक्षांतरावर बोट ठेवत असून ज्यादिवशी आमदारांनी कॉंग्रेसमधून भाजपमध्ये उडी घेतली,त्या दिवशी ते संपले, असा दावा करताना त्या दिसताहेत. मनोज परब हे गोवा फॉर गोवन्सचा नारा बुलंद करताना दिसत आहेत. आता कोणाचा दावा खरा होतो, आणि कोणाचा खोटा ठरतो, हळर्णकर तिसऱ्यांदा विधानसभेत पोहचण्यात यशस्वी ठरतात, का याची उत्तरे निकालातूनच दिसणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: हणजुणेत थार गाडीची दुचाकीला धडक; तिघेजण गंभीर जखमी

ISL 2024-25: आगामी लढतीसाठी FC Goa संघात होणार बदल? मार्केझ यांनी दिले संकेत

Konkan Railway: धावत्या रेल्वेतून कोसळली विद्यार्थ्यांनी, RPF जवानाच्या प्रसंगावधानामुळे थोडक्यात वचावली Video

Mopa Airport: ...तर सरपंचांनी राजीनामे द्यावेत! ‘मोपा’तील नोकऱ्यांवरुन जनसंघटना आक्रमक

Mandrem: सरपंचपदाची माळ कोणाच्या गळ्यात? मांद्रेत ग्रामस्थांच्या चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT