डिचोली : भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखण्यात येणाऱ्या मये मतदारसंघात यावेळीही भाजपने गतवेळेचाच ''फॉर्म्युला'' अंमलात आणला असला, तरी या निवडणुकीत भाजपसमोर विजयी घोडदौड कायम राखण्याचे आव्हान असल्याचे चित्र आहे.२००७ पासून गेल्या सलग तीन निवडणुका मिळून आतापर्यंत मये मतदारसंघात सर्वाधिक म्हणजेच चारवेळा भाजपने विजय संपादन केला आहे. त्यामुळे हा मतदारसंघ भाजपसाठी ''सुरक्षित'' असल्याचा राजकीय अंदाज आहे. यावेळीही इथे भाजपला अनुकूल वातावरण असल्याची हवा असली, तरी मगोसह गोवा फॉरवर्ड आणि ''आप''ने भाजपसमोर कडवे आव्हान उभे केले आहे. त्यामुळे या मतदारसंघातून विजयी घोडदौड कायम राखणे भाजपला तेवढे सोपे नाही. विरोधकांनी निर्माण केलेले आव्हान पाहता, यावेळी या मतदारसंघात भाजपची सत्वपरीक्षा ठरणार आहे. (Pravin Zantye and Premendra Shet in Mayem Constituency News Updates)
या मतदारसंघातून प्रेमेंद्र शेट (भाजप), प्रवीण झांट्ये (मगो), प्रा. राजेश कळंगुटकर (आप), संतोषकुमार सावंत (काँग्रेस-गोवा फॉरवर्ड), श्रीकृष्ण परब (आरजी) यांच्यासह मिलिंद पिळगावकर, रोहन सावईकर, दीपकुमार मापारी आणि शीला घाटवळ मिळून नऊ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. मतदारसंघाचा एकंदरीत कानोसा घेतला असता, भाजप, मगो, गोवा फॉरवर्ड आणि आम आदमी पक्षांमध्येच लढत होणार असल्याचे चित्र जाणवत आहे. मतदारसंघात अपक्षांकडून होणारी मतविभागणी आणि ''सायलंट मतदारांची भूमिकाही निर्णायक ठरणार आहे. जमीन मालकी हक्क प्रश्न आणि खाण अवलंबितांची भूमिकाही महत्वाची ठरणार आहे.
प्रवीण झांट्येंनी दंड थोपटले
भाजपकडून (BJP) आपला 'पत्ता' कट झाल्याची जाणीव होताच प्रवीण झांट्ये यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन मगो पक्षात प्रवेश केला. मगोतर्फे झांट्ये ही निवडणूक लढवत आहेत. त्यांनी प्रचारही धुमधडाक्यात सुरु केला असून, त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. झांट्ये यांनी 'प्रतिष्ठा' पणाला लावली आहे. त्यामुळे भाजपसमोरील चिंता वाढली आहे. त्यामुळे त्यांचे ठराविक मतदार मयेत आहेत. त्यातच त्यांचे वडील स्व.हरिष झांट्ये हेही मयेतून एकदा निवडून आलेले होते. ही त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे.
'आप', गोवा फॉरवर्डचे आव्हान
गेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या (Congress) उमेदवारीवर निवडणूक लढवून जवळपास साडेसात हजार मते मिळवलेले संतोषकुमार सावंत यावेळी काँग्रेस-गोवा फॉरवर्ड युतीचे उमेदवार म्हणून आपले भवितव्य आजमावत आहेत. स्थानिक प्रश्न घेऊन ते मतदारांसमोर जात आहेत. त्यांच्या प्रचारकार्यात काँग्रेससह गोवा फॉरवर्डचे नेते सहभागी होत आहेत. दुसऱ्या बाजूने आपनेही मतदारसंघात आव्हान उभे केले आहे.
अपक्ष उमेदवारांचा प्रचार जोरात
या मतदारसंघात चार अपक्ष निवडणूक लढवत असले, तरी मिलिंद पिळगावकर आणि रोहन सावईकर यांनी प्रचाराला जोर दिला आहे. पैकी मिलिंद पिळगावकर यांनी २००२ साली मयेतून मगोच्या (MGP) उमेदवारीवर निवडणूक लढविली होती. अल्प मतांनी त्यांचा विजय हुकला होता. पिळगावकर हे मतदारांना परिचित आहेत. यावेळी ते भाजपच्या उमेदवारीसाठी प्रयत्नशील होते. त्यादृष्टीने त्यांनी मोर्चेबांधणीही केली होती. मात्र त्यांना उमेदवारी मिळाली नसल्याने ते अपक्ष म्हणून रिंगणात उतरले आहेत.
भाजपकडून जुन्याच फार्म्युल्याचा अवलंब
या निवडणुकीसाठी भाजपने मये मतदारसंघात गतवेळच्याच फॉर्म्यूल्याचा अवलंब केला आहे. यावेळी प्रेमेंद्र शेट हे भाजपतर्फे निवडणूक लढवत आहेत. २००७ ,२०१२ मध्ये स्व.अनंत शेट हे भाजपकडून निवडून आले होते. ही प्रेमेंद्र शेट यांच्यासाठी जमेची बाजू असली, तरी मगोत जाऊन 'सिंहगर्जना' केल्यानंतर त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. २०१७ च्या निवडणुकीत स्व.अनंत शेट यांचा 'पत्ता' कट केला असतानाही, नाराजी लपवत ते शेवटच्या क्षणी भाजपच्या प्रचारात उतरले होते. यावेळी मात्र स्थिती नेमकी उलटी आहे.
मये मतदारसंघात 28,746 एकूण मतदार असून यात 14,072 महिला आणि 14,674 पुरुष मतदारांचा समावेश आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.